Goat Farming Business Plan : मेंढीपालनाचा व्यवसाय करण्याचा विचार करतायं? मग एकदा वाचाच, पैसे छापाल..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Goat Farming Business Plan : महाराष्ट्रातील जिरायत व अवर्षणप्रवण क्षेत्रात शेतीस जोडधंदा म्हणून मेंढीपालन किफायतशीर ठरते. सर्वसाधारणपणे मेंढपाळाला मेंढी-व्यवसायापासून मिळणाच्या उत्पादनापैकी मांस, लोकर व खताच्या विक्रीतून आर्थिक उत्पादन मिळते. महाराष्ट्रात मेंढीपालन हा व्यवसाय प्रामुख्याने धनगर समाज करतो. त्यात अगदी अल्प प्रमाणात शेतकरी शेतीबरोबर मेंढ्या पाळतात. महाराष्ट्रात दख्खन्नी जातीच्या मेंढ्या आढळतात. या मेंढ्या मुख्यत्वे मांसासाठी पाळल्या जातात.

किफायतशीर मेंढीपालनामध्ये पैदास व संगोपन या दोन गोष्टींचा प्रामुख्याने विचार केला जातो. त्यासाठी मेंढपाळांनी खालील सूचनांचा कटाक्षाने विचार करून त्या अमलात आणल्यास त्यांच्याकडील मेंढ्यापासून जास्त उत्पादन देणाऱ्या मेंढ्या तयार करता येतील व हा धंदा अधिक किफायतशीरपणे करता येईल.

पैदास –

मेंढ्यांचे प्रजनन मोसमी असते. मोसमाच्या सुरुवातीच्या दिवसात जावळी (मेंढा) सोडल्यास या माजावर येण्यास मदत होते. त्या वेळी दोन आठवडे आधी मेंढ्यांना खुराक सुरू केल्यास त्या लवकर माजावर येतात. ह्याला इंग्रजीत फ्लशिंग असे म्हणतात. यासाठी 200 ते 250 ग्रॅम मका, बाजरी किंवा ज्वारी यांपैकी कोणतेही एक धान्य खुराक म्हणून द्यावे.

प्रजननासाठी वापरल्या जाणाऱ्या नर मेंढ्यास (जावळी) रोज 200 ते 300 ग्रॅम भरडा द्यावा व त्या काळात मोड आलेली मटकी 100 ते 120 ग्रॅम दररोज द्यावी. त्यामुळे पैदाशीचा जोम व वीर्याची गुणवत्ता टिकवली जाते.

जावळी (नर मेंढा) जातिवंत असावा व पैदाशीयोग्य ( 18 ते 24 महिने वयाचा झाल्यावरच कळपात सोडावा. 20 ते 30 मेंढीमध्ये एक जावळी अशा प्रमाणे कळपातील मेंढ्यांमध्ये सोडावा व निवड पद्धतीमध्ये पैदास करावी.
एक मेंढा एका कळपात दोन वर्षांपेक्षा जास्त काळ ठेवू नये. तो ताबडतोब बदलावा. अंतःप्रजननामुळे (निकटचा संबंध) कळपात दोष उत्पन्न होण्याचा धोका असतो. त्यासाठी जावळी बदलणे अत्यंत महत्त्वाचे असते.

आहार –

गाभण मेंढ्यांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष करू नये. गाभण काळात 3 महिन्यांपासून मेंढ्यांना 200 ते 250 ग्रॅम भरडा गर्भरोपणासाठी देणे जरुरीचे आहे. कॅल्शिअम, फॉस्फरस, आयोडीन, तांबे, कोबाल्ट या खनिजद्रव्यांची जरुरी असते. या खनिजांनी युक्त अशा विटा (चाटण्याच्या क्षारविटा) बाजारात मिळतात, त्या वाडग्यात (गोठ्यात) बांधाव्यात. मेंढ्या रात्री / दिवसा त्यांच्या शारीरिक गरजेप्रमाणे चाटतात.

मेंढी व्यायल्यानंतर मेंढीला कोकरू चाटू द्यावे. त्यामुळे मेंढीचा मातृभाव वाढविण्यास उपयोग होतो. कोकरू 1 ते 2 तासांत उठून मेंढीला पिऊ लागते. कोकराला चिक पाजणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे कोकराला आईपासून रोगप्रतिकारक शक्ती मिळते व पोटातील घाण बाहेर पडून कोकरू ताजेतवाने दिसते. व्यालेल्या मेंढीला 100 ते 150 ग्रॅम उकडलेली बाजरी 3 दिवस द्यावी.

कोकरे 2 ते 3 महिने मेंढीला पाजावीत. त्या काळात 15 दिवसांत कोकरे कोवळे हिरवे गवत व पाने कुरतडून खाण्याचा प्रयत्न करावयास लागतात. वयाच्या 5 ते 8 आठवड्यांपासून थोडेथोडे खाद्य खाण्याची सवय होते. कोकरांना वयाच्या 8 ते 12 आठवड्यांनंतर मेंदीपासून वेगळे करावे. त्यानंतर त्यांना खुराक व सकस हिरवा चारा यावर वाढवावे. संशोधनाच्या निष्कषांती असे दिसून आले आहे, की 2 महिन्यांनंतर कोकरे मांसासाठी वाढविली तर कोकरे 130 ते 145 दिवसांत 25 किलोपर्यंत वजनाची होतात व त्यांची बाजारात चांगली किंमत मिळते.

मांसोत्पादनासाठी पाळलेल्या कोकरांना मेंढीला पिणे बंद झाल्यापासून भरडा सुरू करावा. त्यामध्ये धान्य 20 भाग, गव्हाचा भुसा 7 भाग, पेंड 20 भाग, मीठ भाग व खनिज व जीवनसत्त्व मिश्रण 2 भाग असे प्रमाण असावे. असा भरडा 100 ग्रॅम ते 300 ग्रॅम वय / वजनाप्रमाणे देण्यात यावा.

error: Content is protected !!