शेतकऱ्याला 5 एकरात वर्षाला किती उत्पन्न मिळतंय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

तिसरा डोळा : माणसाला जिवंत राहण्यासाठी लागणारा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे अन्न. हे अन्न तयार करण्याचं काम शेतकरी करतात. शेतकऱ्याने उगवलेलं धान्य देशातील सर्वजण दिवसात 3 वेळ खातात आणि आयुष्य जगतात. मात्र देशाला पोसणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था वर्षानुवर्षेपासून अत्यंत वाईट आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या धान्यापासून विविध पदार्थ बनवून लोक लाखो रुपये कमवतात. पण शेतकऱ्याला किती मोबदला मिळतो? (PM Kisan)

लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे; मात्र शेती आहे तेवढीच आहे. परिणामी सध्या महाराष्ट्रातील तसेच देशातील बहुतांश शेतकरी अल्प भू-धारक बनले आहेत. एखाद्या शेतकऱ्याकडे 5 एक्कर शेती असेल तर त्याला एक पीक उदाहरणार्थ सोयाबीनचे पीक घेण्यासाठी नांगरणी 12 हजार रुपये, मोगडा 6 हजार, धसकट वेचणी 6 हजार, पेरणी 6हजार, बी – बियाणे 20 हजार, खत 7हजार, कोळपणी, खुरपणी 10 हजार, फवारणी 3हजार, काढणी 25 हजार, गाळणी.. असा जवळपास एकूण एक लाख रुपये खर्च (+ शेतकरी कुटुंबाचे कष्ट ) केल्यावर जर निसर्गाने पूर्ण साथ दिली तर जवळपास 35 क्विंटल पीक येण्याची शक्यता आहे. 5हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला तर 1 लाख 75 हजार रुपये (निव्वळ नफा 75 हजार रुपये ) उत्पन्न मिळेल. मात्र हल्ली निसर्ग साथ देत नसल्याने शेतकऱ्याने पीक उगविण्यासाठी केलेला खर्चही निघत नाही अशी परिस्थिती आहे.

सध्या पाऊस नसल्याने राज्यातील बहुतांश भागातील 30-40टक्के पीक नुकसान झाले आहे. अजून काही दिवस पाऊस नाही पडला तर 100टक्के पीक वाया जाईल. केलेला खर्चही निघणार नाही. देशाला जगवण्यासाठी शेतकरी दरवर्षी हा जुगार खेळतात. आणि देशाला जेऊ घालणारे शेतकरी या जुगारात सतत नापिकी आणि पिकाला मिळणाऱ्या कमी भावामुळे हतबल होऊन आपले जीवन संपविण्याच्या घटना घडतात. सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणारी मदत ही अत्यंत तुटपुंजी आहे. शेतकऱ्याच्या पिकाला हमीभाव द्यायचा नसेल तर सरकारने अल्पभूधारक शेतकरी कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी घेतली पाहिजे. शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी, जीवनावश्यक वस्तू, सर्व बाबी पूर्णतः मोफत दिल्या पाहिजे. देशाला अन्न पुरवणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रति महिना 500 रुपये असणारा सन्मान निधी 5हजार रुपये केला पाहिजे..

हजारो कोटी रुपयांचे घोटाळे करून काही लोक विदेशात पळून गेले, हजारो लोकांनी लाखो कोटींचे घोटाळे केल्याचे उघड झाले आहे. देशातील काही ठराविक लोकांकडे करोडो, अब्जावधी संपत्ती आहे. श्रीमंत लोक अधिक श्रीमंत होत आहेत; मात्र देशातील बहुतांश शेतकरी बांधव आर्थिक परिस्थितीने तळा, गाळात आहेत. शेतकऱ्यांना घरावरील पत्रे काढून स्लॅप टाकण्यासाठी पिढ्या जाव्या लागतात. शेतकऱ्यांची मतं घेऊन आमदार, खासदार झालेले मंडळीची संपत्ती पाच वर्षात शेकडो पटीने वाढते ; आणि शेतकरी मात्र अधिकच आर्थिक गरीब होत जातो. शेतकरी गरिबीचा आपल्या नशिबाला दोष देतात. देवाला दोष देतात. मात्र हे खरे आहे की शेतकऱ्याच्या पिकाला योग्य भाव न देऊन सरकार त्याला अधिक गरीबच ठेवत आहे. याचे परिणाम येत्या काळात शेतकऱ्यांना गरीब ठेवण्यासाठी जबाबदार असलेल्यांना नक्की भोगावे लागणार आहेत.

-ज्ञानेश्वर फड
7498611088

error: Content is protected !!