Crop Management : हरितक्रांतीनंतर कृषि उत्पादनात सुधारित तसेच संकरित बियाणे, रासायनिक खते, पीकसंरक्षके यांचा वापर खूप झपाट्याने वाढला हे सर्वज्ञात आहेच. असे जरी असले तरी कित्येक शेतकऱ्यांना सुधारित तंत्र म्हणजे काय व त्यासंबंधी माहिती अगर ज्ञान देणाऱ्या संस्था कोणत्या आहेत, कोठे आहेत याची माहिती नाही. कृषिसेवा केंद्र सुरू करणाऱ्या चालकास, युवकांना तर त्यांची माहिती असणे आवश्यक आहे.
सर्वसाधारणपणे अशी माहिती देणाऱ्या संस्थेचे पुढील विभागांत वर्गीकरण करता येईल
(1) शासकीय,
(2) निमशासकीय,
(3) खाजगी.
(1) शासकीय संस्था :
कृषिविषयाचे अद्ययावत ज्ञान अथवा माहिती देणाऱ्या शासकीय संस्थांची यादी फार मोठी होईल. त्यामध्ये कृषी विद्यापीठांमार्फत विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामध्ये कृषी पदवी, कृषी पदविका हे दोन कोर्सेस महत्त्वाचे मानले जातात. महाराष्ट्रात सध्या कृषी विषयाची वेगळी अशी चार कृषी विद्यापीठे अस्तित्वात आहेत. त्यांच्या अधिपत्याखाली ही कृषी महाविद्यालये व शेतकी शाळा असतात. सर्वसाधारणपणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमीत कमी एक कृषी विद्यालय विद्यापीठांचे आहे तर 3-4 विद्यालये खाजगी संस्थांमार्फत चालविली जातात.
3- 4 जिल्हे मिळून एक कृषी महाविद्यालय आहे. येथून नियमितपणे 4 वर्षांसाठी व 2. वर्षांसाठी अनुक्रमे पदवी व पदविका अभ्यासक्रम राबविले जातात. पदवीचा अभ्यासक्रम इंग्रजीमध्ये तर पदविकेचा अभ्यास मराठीमध्ये असतो. पदवी अभ्यासक्रमामध्ये सखोल माहिती मिळते तर पदविकेमार्फत शेतीव्यवसाय प्रात्यक्षिके जास्त प्रमाणात घेतली जातात. अलीकडील काळामध्ये बिगर कृषी विद्यापीठांनीसुद्धा वरील सर्व प्रकारचे कोर्सेस विविध पातळींवर सुरू केलेली आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांचा त्यामध्ये सिंहाचा वाटा आहे.
याशिवाय शासकीय माध्यमातून ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रे, कृषिविज्ञान केंद्रे, इत्यादींमार्फत शेतीव्यवसायासंबंधी प्रशिक्षण आणि माहिती मिळते. याव्यतिरिक्त राज्य कृषिखात्याकडे असणाऱ्या कृषिविभागाच्या विस्तार व प्रशिक्षण योजनेअंतर्गत कृषी चिकित्सालयामध्ये, तालुका बीजगुणन प्रक्षेत्रे, रोपवाटिका, तालुक्यातील कृषिविस्तार अधिकारी, मंडळ अधिकारी व ग्राम पातळीवर शेतकी मदतनीस हे सर्व शेतीव्यवसायासंबंधी संपूर्ण माहिती देण्यास जबाबदार व सक्षम असतात. याशिवाय भारत सरकारचे कृषि मंत्रालय, अन्न व पुरवठा मंत्रालय, मध्यवर्ती वखार महामंडळे, दूरदर्शन, रेडिओ, वर्तमानपत्रे तसेच शेतकरी, सुगी, शेतकरी डायरी, इत्यादी मासिके हेही शेतीव्यवसायाची माहिती देत असतात.
(2) निमशासकीय संस्था :
शेतकऱ्यांचा विश्वास चटकन व जास्त प्रमाणात बसतो तो त्या भागातील ज्या निमशासकीय सहकारी संस्था आहेत त्यांनी दिलेल्या माहितीवर. त्यानुसार खूप अशा निमशासकीय संस्था कृषि उत्पादनासंबंधीची माहिती त्यांच्या सभासदांना, हितचिंतकांना देत असतात. त्यामध्ये प्रामुख्याने पुढील संस्थांचा उल्लेख करता येईल; त्या म्हणजे बियाणे महामंडळ, राष्ट्रीय बीज निगम, नाफेड, अॅपेडा, – महाग्रेप, सहकारी साखर कारखाने, इफको, राज्य शेती महामंडळे, खादी ग्रामोद्योग विभाग, विविध सहकारी शेतकरी संघ, इत्यादी संस्था त्यांच्या सभासदांना विविध माध्यमांतून शेतकरी मेळावे घेऊन, सहली आयोजित करून अथवा प्रात्यक्षिके दाखवून आधुनिक निविष्ठांच्या वापराबाबत अद्ययावत करतात.
(3) खाजगी संस्था :
खाजगी संस्था ह्या त्यांच्याकडील असणाऱ्या निविष्ठांचे स्वरूप, वापर, त्यापासून होणाऱ्या उत्पादनातील वाढ, इत्यादी निविष्ठांची विविध अंगे , प्रात्यक्षिके दाखवून त्याचे किट मोफत देऊन अथवा शेतकरी मेळावे, प्रदर्शने भरवून शेतकऱ्यांना अथवा संबंधितांना सांगतात. कृषिसेवा केंद्र व्यवस्थापकांनी या संधीचा फायदा घ्यावयास हवा. खाजगी संस्थांची नावे उदाहरणादाखल अशी : नाथ सीड्स्, इंडो अमेरिकन कंपनी अशा बियाण्यांच्या विविध कंपन्या, दीपक फर्टिलायझर्स, झुआरी ॲग्रो केमिकल्स, गोदरेज, रानडे मायक्रोन्युट्रियन्ट्स, इत्यादी खतांच्या कंपन्या, नोझील, बायर, एक्सेल, गोदरेज, रॅलीज, घार्डा, ॲस्पा, इत्यादी पीकसंरक्षके उत्पादन करणाऱ्या कंपन्या तसेच खाजगी संस्थांमध्ये विविध ट्रस्ट उदाहरणार्थ, वनराई, भूमाता, इत्यादींचा सहभाग असतो. अशा प्रकारे कृषिसेवा केंद्र सुरू करणाऱ्यास अगर व्यवस्थापकास लागणारी तांत्रिक माहिती व ज्ञान या सर्व स्रोतांतून मिळू शकते.