Kav Paste : यंदा पाऊस खूप कमी झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. ज्यांच्या फळबागा आहेत त्यांना आता झाडं जिवंत ठेऊन पुढच्या पावसाळ्याची वाट पाहणं कठीण आहे. विहीर, बोअर यांचे पाणी आता किती दिवस पुरेल यावरच अनेकांचे आर्थिक गणित अवलंबून आहे. अशात आता यात भरीत भर होऊन फळबागेतील झाडांना खोड कीड, वाळवी लागू नये म्हणून खबरदारी घेणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला काव पेस्ट कशी बनवतात? ती कधी लावावी तसेच बाजरात कोणकोणत्या काव पेस्ट उपलब्ध आहेत याबाबत माहिती देणार आहोत.
काव पेस्ट म्हणजे काय?
झाडाच्या खोडाला कीड किंवा वाळवी लागू नये तसेच तीव्र उन्हापासून खोडाचे रक्षण व्हावे म्हणून खोडाला एक पेस्ट लावली जाते. तांबड्या किंवा पांढऱ्या रंगाच्या या पेस्टलाच काव पेस्ट असे म्हणतात. अलीकडे बाजारात तयार काव पेस्ट सुद्धा उपलब्ध आहे.
काव पेस्ट कशी बनवतात?
अनेकदा पैशांची बचत करण्यासाठी शेतकरी घरच्या घरी काव पेस्ट बनवतात. काव पेस्ट बनवण्यासाठी खालील साहित्य वापरतात. एका बादलीमध्ये किंवा हौदात हे साहित्य टाकून ते २४ तास भिजत ठेवावे लागते. यानंतर पेस्ट झाडांना ब्रशच्या साहाय्याने लावली जाते.
साहित्य –
वीस किलो खडा काऊ
200 ग्रॅम खडा हिंग
दोनशे ग्रॅम कापूर
दोनशे ग्रॅम डांबर गोळी
हे सगळे 24 तास भिजत घाला व त्यानंतर 200 एम एल हमला औषध याच्यामध्ये मिक्स करून झाडांना ब्रेस्टच्या साह्याने पेस्टिंग करून घ्यावी
काव पेस्टचे प्रकार –
काव पेस्ट घरात बनवता येतेच पण बाजारात तयार काव पेस्टसुद्धा मिळते. काव पेस्टचे तीन प्रकार आहेत. घरी बनवलेली काव पेस्ट, तयार काव पेस्ट, स्प्रे काव पेस्ट. तुमची झाडे मोठी असतील तर स्प्रे काव पेस्ट वापरल्याने वेळेची बचत होते.
काव पेस्ट लावण्याचे फायदे –
फळबागेसह सर्वच मोठ्या झाडांना काव पेस्ट लावण्याचे खूप फायदे आहेत. अनेकदा खोडकीड, वाळवी यामुळे झाडांचे फार नुकसान होते. त्यामुळे वेळीच उपाययोजना केल्या तर होणारे नुकसान टाळता येऊ शकते. काव पेस्ट लावल्याने तीव्र उन्हामध्ये झाडाचे उन्हापासून बचाव होतो.
काव पेस्ट केव्हा लावावी?
काव पेस्ट पावसाळा संपला कि लगेच लावावी. तसेच दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात काव पेस्ट लावावी. एका वर्षात किमान दोन वेळा काव पेस्ट लावणे गरजेचे आहे. जमिनीपासून साधारणपणे ३ फूट उंचीपर्यंत खोडाला ब्रशच्या साहाय्याने पेस्ट लावावी. तसेच जिथे नवीन फांद्या फुटल्यात अशा ठिकाणी काही अंतरापर्यँत पेस्टींग करावे.