खांडसरी साखर माहिती आहे का? 150 रुपये किलो दर, तुम्हीसुद्धा प्रक्रिया उद्योग उभारून कमवू शकता चांगले पैसे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


Khandsari Sugar : खांडसरी साखरेत 94 ते 98 टक्के सुक्रोज असते. सध्या दोन प्रकारच्या खांडसरी कार्यान्वित आहेत. पहिला प्रकार म्हणजे परंपरागत खांडसरीचा; जेथे रस शुद्धीकरणासाठी वनस्पतिजन्य पदार्थांचा वापर केला जातो. गूळ तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांचा वापर करून राब बनविले जाते व त्यापासून खांडसरी साखर तयार केली जाते. बाजारातील मालाच्या दराचे चढउतार व मागणी लक्षात घेऊन खांडसरी साखर अथवा गूळ बनविला जातो. अशा प्रकारच्या खांडसरीमध्ये यांत्रिकीकरणाच्या अभावी मजुरीचा खर्च वाढतो. शिवाय साखरेचा उतारा फारच कमी म्हणजे 4-5 टक्के पर्यंतच पडतो. दुसऱ्या प्रकारच्या खांडसरीमध्ये (ओ. पी. एस.) भेंडी वनस्पतीचा ठेचा न वापरता सल्फिटेशन पद्धतीचा अवलंब केला जातो. तसेच स्फटिकीकरण, साखरेचे कण वेगळे करणे, वाळविणे या प्रक्रिया यंत्राच्या साहाय्याने केल्या जातात. साहजिकच साखर उतारा थोडा जास्त म्हणजे साधारणपणे 7 ते 8.5 टक्के इतका पडतो. सध्या काही खांडसरी व्ही.पी.एस. पद्धतीचाही अवलंब करू लागल्या आहेत. अशा प्रकारच्या खांडसरीची गाळपक्षमता 300 ते 400 टन प्रतिदिन इतकी आहे.

खांडसरी साखरप्रक्रिया

गाळप करण्यासाठी 3 लाट्यांपासून 9 लाट्यांपर्यंतच्या आडव्या चरकांचा वापर केला जातो. गाळप चांगले होण्यासाठी श्रेडरचे 2 संच तसेच यांत्रिकी दाब देण्याची सोय केलेली असते. त्यामुळे रसगाळप 75 % पर्यंत मिळते. साखर कारखान्यामध्ये जसे 2-3 वेळा गरम पाण्याचा चोयट्यांवर शिडकाव करून गाळप केले जात असल्याने जास्तीत जास्त सुक्रोज पिळून काढले जाते तशी सोय खांडसरीमध्ये केली जात नाही. कारण असे केले तर रसातील पाण्याचे प्रमाण वाढल्याने रस आटविण्यासाठी जास्त सरपणाची आवश्यकता तर भासतेच, शिवाय रस आटविण्यासाठी वेळही जास्त लागत असल्याने साखरेची प्रत बिघडण्याचा संभव असतो. रस शुद्धीकरणासाठी सल्फिटेशन पद्धतीचा अवलंब केला जातो. त्यासाठी एका बंदगोलाकृती टाकीमध्ये रस घेऊन त्यात चुन्याची निवळी मिसळली जाते व नंतर त्यात सल्फर डायऑक्साईड वायू सोडला जातो. ही क्रिया साधारणपणे 15 मिनिटे चालते, त्यामुळे मूळ रसाची आम्लता कमी होऊन रस अल्कली होऊन विद्राव्य पदार्थ मळीच्या रूपाने बाहेर पडतात आणि रस शुद्ध होतो. साठवणूक हौदामध्ये हा रस स्थिर ठेवल्याने मातीचे कण आणि इतर जड पदार्थ खाली तळाला साचतात. बॅग फिल्टरचा उपयोग करून रसाची गाळणी केली जाते.

रस आटविण्यासाठी उघड्या काहिलीचा उपयोग केला जातो एका चुल्हाणावर 3 ते 5 काहिलीतील रस आटविला जाईल अशी व्यवस्था केली जाते. शुद्ध रस पहिल्या काहिलीत घेतला जातो आणि नंतर हा रस आटविण्यासाठी दुसऱ्या, तिसऱ्या अशा क्रमाने शेवटच्या काहिलीत पूर्णपणे रसाचा ‘राब’ तयार होतो. खांडसरीमध्ये राब अचूक पकडणे फार महत्त्वाचे असून निष्णात व जाणकार व्यक्तीच अचूकपणे राब पकडतात. राब स्फटिकीकरण यंत्रात घालून घुसळण केली जाते, त्यामुळे राबापासून स्फटिक तयार होता. या वेळचे तापमान साधारणपणे 70 अंश सेल्सिअस इतके असते. स्फटिकीकरण झाल्यानंतर साखरेचे कण मळीपासून अलग करण्यासाठी सेंट्रिफ्युज मशीनचा उपयोग केला जातो. साखरेचे कण पाण्याने धुऊन ड्रायरच्या साहाय्याने किंवा उन्हात वाळवून साखर तयार केली जाते. प्रतवारी, पोत्यात भरणे, वजन करणे या सर्व प्रक्रिया मजुरांकरवी पार पाडल्या जातात. .त्यामुळे मजुरीचा खर्च वाढतोच शिवाय साखरेची हानीही होत असते.

error: Content is protected !!