Raju Shetti : तुम्ही ऊस आंदोलन करून दर 3000 रुपयांवर आणला नसता तर आम्हाला शिक्षण अर्धवट सोडावं लागलं असतं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी एका आगळ्यावेगळ्या स्वागताचा व्हिडीओ सोशल मीडियात शेयर केला आहे. शेट्टी दिल्ली येथे कामानिमित्त गेले असताना त्यांना एक फोन आला आणि आमच्या घरी जेवायला याल काय असा प्रश्न समोरून विचारला गेला. आपल्या मतदार संघातील कोणी प्रेमाने बोलावतंय म्हटल्यावर शेट्टींनीही लगेच होकार दिला अन ते गुडगावला पोहोचले. यावेळी आमंत्रण दिलेल्या तरुणानं तुम्ही ऊस आंदोलन करून दर ३००० रुपयांवर आणला नसता तर आम्हाला शिक्षण अर्धवट सोडावं लागलं असतं अशी भावना व्यक्त केली.

राजू शेट्टी यांची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी आम्ही काही जोडली आहे –

काही कामानिम्मीत्त तीन दिवसाचा दिल्ली दौरा करण्याचा योग आला. ही माहिती कळताच एका व्यक्तीचा मला फोन आला “साहेब, आपण माझ्या गुडगांव येथील घरी जेवायला येणार का ?” मी या निमंत्रणाला नाकारु शकलो नाही आणि त्याच्या विनंतीनुसार काल संध्याकाळी गुडगांव येथील पंचतारांकित डीएलएफ सोसायटीतील घरी गेलो. दारात सुंदर रांगोळी , फुलांचा सडा घालून केलेल्या औक्षणाने मन भारावून गेले. यानंतर आम्ही सर्वजण त्याच्या कुटुंबीयांसोबत भाकरी, खर्डा, दही असा गावराण बेत असलेल्या जेवणाचा आस्वाद घेतला. भरपेट जेवण आणि मनमोकळ्या संवादानंतर त्यांनी शाल व श्रीफळ देवून माझा कौटुंबिक सत्कार केला. या सत्कारावेळी त्यांनी माझ्या हातात ‘लोकसभा २०२४’ साठी २५ हजार रूपयाचा धनादेश दिला.

हा सगळा पाहूणचार करणारी व्यक्ती म्हणजे “अभिजीत पासाण्णा”. तो म्हणाला “साहेब आम्ही शिक्षण घेत असताना तुम्ही उसाच्या आंदोलनातून ७०० रुपयांचा दर ३००० रुपयांवर आणला नसता तर माझ्या वडिलांना आम्हा भावंडांचे शिक्षण पूर्ण करता आले नसते आणि आज मी जिथं आहे तिथं स्वप्नात देखील पोहचू शकलो नसतो.” अभिजीतचे आयआयटी चेन्नई मधून इंजिनीअरिंगचे पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण झाले, ८ वर्षे जनरल मोटर्स व पीएसए ग्रुप या कंपन्यांमध्ये नोकरी केली. गेल्या तीन वर्षापासून तो दिल्ली गुडगांव येथील डायको या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये इंजिनिअरींगचा विभागप्रमुख म्हणून काम करत आहे. त्याचा भाऊ अमेरिकेत ‘मर्सिडीझ बेन्झ’ कंपनीमध्ये कार्यरत आहे. एका सामान्य ऊस उत्पादकाच्या मुलांचा हा दैदीप्यमान प्रवास पाहून चळवळीसाठी ३० वर्षे निस्वार्थपणे घरावर तुळशीपत्र ठेवून खर्च केलेले तरुणपण सार्थकी झाल्याची भावना आज मनात दाटून आली.

error: Content is protected !!