Sapodilla Cultivation : चिकूच्या लागवडीसाठी कसं पाहिजे वातावरण? सुधारीत जाती कोणत्या?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील सर्वच जिल्यातील चिकूची लागवड (Sapodilla Cultivation) यशस्वी होऊ शकते. मूळच्या उष्ण प्रदेशातील ह्या फळाला उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. चिकूच्या पिकाच्या फुलोऱ्याच्या काळात तापमान 43 अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास फुलोरा गळतो, तसेच किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास झाडाची वाढ खुंटते. अशा वेळी लहान झाडांची विशेष काळजी घ्यावी लागते. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या उत्तर भागात उन्हाळयात चिकूच्या पिकाला पाण्याच्या जास्त पाळया द्याव्या लागतात. कमी पावसाच्या प्रदेशात बागेला पाण्याच्या पाळ्या वाढवून चिकूची लागवड करता येते. चिकूच्या पिकाला सर्व प्रकारची जमीन मानवते.

तथापि नदीकाठची, गाळवट, पोयट्याची, समुद्र किनाऱ्याजवळची जमीन अधिक चांगली असते. काळया व भारी जमिनीत निवन्यासाठी चर खणून चिकूची लागवड करावी. पाणथळ भागात किंवा जमिनीत ते 15 मीटरच्या खाली पक्का कातळ असलेल्या भागात अथवा अती हलक्या उथळ जमिनीत चिकूच्या झाडाची वाढ चांगली होत नाही. पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसलेल्या आणि चुनखडीचे प्रमाण जास्त असलेल्या जमिनीत चिकूची लागवड करू नये.

सुधारित जाती –

महाराष्ट्रात चिकूच्या कालीपत्ती व क्रिकेट बॉल ह्या प्रमुख जाती लागवडीखाली (Sapodilla Cultivation) आहेत. कालीपत्ती या जातीच्या झाडाची पाने गडद हिरव्या रंगाची आणि रुंद असतात. झाड पसरत वाढते. या जातीची फळे मोठी, अंडाकृती आणि भरपूर गरयुक्त असतात. फळांचा गर मऊ आणि गोड असतो. फळात बियांचे प्रमाण कमी असून प्रत्येक फळात 2 ते 4 बिया असतात. फळाची साल पातळ असते. महाराष्ट्रात ह्या जातीच्या लागवडीसाठी शिफारस केली आहे. क्रिकेट बॉल या जातीच्या झाडाची पाने गडद हिरव्या रंगाची असतात. फळे आकाराने मोठी असतात; परंतु फळांचा गर दाणेदार व कमी गोड असतो. या जातीच्या फळांची प्रत मध्यम असून उत्पादन कमी येते.

अभिवृद्धी, कलमांची निवड आणि लागवड पद्धती- (Sapodilla Cultivation)

चिकूची अभिवृद्धी बियांपासून, तसेच शाखीय पद्धतीने, गुटी कलम, भेट कलम व मृदकाष्ठ कलम अशा प्रकारे करता येते. चिकूची बियांपासून अभिवृद्धी केल्यास फळे लागण्यास अधिक काळ लागतो आणि सर्व झाडे सारख्या गुणवत्तेची निपजत नाहीत. म्हणूनच शाखीय पद्धतीने अभिवृद्धी करावी. गुटी कलम पद्धतीत चिकूची अभिवृद्धी करता येत असली तरी या पद्धतीने यश कमी प्रमाणात मिळते. भेट कलम किंवा मुदुकाष्ठ कलम लावून केलेली लागवड ही झाडापासून मिळणारे उत्पादन वाढविस्तार व कणखरपणा या दृष्टीने अधिक फायद्याची असल्यामुळे ह्या पद्धतीने चिकूची अभिवृद्धी मोठ्या प्रमाणावर केली जाते. भेट कलम आणि मृदुकाष्ठ कलम या दोन्ही पद्धतीत खिरणी (रायणी) या खुंटाचा चिकूची कलमे बांधण्यासाठी उपयोग करतात. खिरणीची रोपे अतिशय हळू वाढतात.

खिरणीच्या रोपाला भेट कलम करण्यायोग्य जाडी येण्यासाठी साधारणपणे दोन वर्षे लागतात. कलम बांधणीसाठी खुंटरोपाची कमतरता तसेच कलम तयार होण्यासाठी लागणारा काळ ह्यामुळे चिकूची कलमे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीत.
चिकूच्या कलमांची खरेदी करताना पुढील काळजी घ्यावी.

1) खुंट आणि डोळकाडी सारख्याच जाडीचे असावेत.

2) कलम सरळ वाढलेले आणि त्यावर भरपूर निरोगी पाने असावीत.

3) कलम केलेला भाग (सांधा) हा एकरूप झालेला असावा. कलमांची उंची अर्धा मीटर असावी.

4) कलम खिरणीच्या (रायणी) खुंटावरच केलेले असावे, मोहाच्या रोपावरील चिकूची कलमे खरेदी करू नयेत.

5) स्वतः तयार केलेली कलमे अथवा शासकीय किंवा कृषी विद्यापीठाच्या किंवा मान्यताप्राप्त नामांकित रोपवाटिकेतील चिकूची कलमे लागवडीसाठी वापरावीत.

error: Content is protected !!