उन्हाळी सोयाबीन लागवड : वाणाची निवड ते खत, पाण्याचं नियोजन; A-Z माहिती एका क्लीकवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । महाराष्ट्रात सोयाबीन उत्पादक (Soyabean Cultivation) शेतकऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. अनेक ऊस उत्पादक शेतकरीसुद्धा सोयाबीन पिकाकडे वळले आहेत. सध्या सोयाबीनला चांगला दर (Soyabean Rate Today) मिळत असल्याने यंदा अनेक शेतकरी उन्हाळी सोयाबीन करण्याच्या विचारात आहेत. उन्हाळी सोयाबीन लागवड (Unhali Soyabean Lagvad) हि प्रामुख्याने खरिपातील बीजोत्पादनासाठी केली जाते. पण आज काल काही शेतकरी उन्हाळी सोयाबीन करून त्यातून चांगला नफाही कमावत आहेत. उन्हाळी सोयाबीनची लागवड नक्की कधी करावी? कोणतं वाण निवडावं? अन उन्हाळी सोयाबीनचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत शेतकऱ्यांमध्ये बऱ्याचदा संभ्रम असतो. आज आपण उन्हाळी सोयाबीन लागवडीबाबत A-Z माहिती जाणून घेणार आहोत.

त्यापूर्वी अजून एक महत्वाची गोष्ट आम्हाला तुमच्यासोबत शेअर करायची आहे. तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल ऍप डाउनलोड करा. इथे शेतीविषयक बातम्या, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज आदी गोष्टींची माहिती मिळते. हॅलो कृषी मोबाईल ऍपच्या मदतीने तुम्ही तुमची जमीन मोजू शकता, तसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, डिजिटल सातबारा सोप्प्या पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच ऍप मधील शेतकरी दुकान मधून तुमच्या जवळील खत दुकानदार, रोपवाटिका यांच्याशी संपर्क करू शकता, तुमचा शेतमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकाला विकू शकता. तसेच जुनी वाहने, जमीन, जनावरे यांची खरेदी विक्रीही करू शकतो. आजच तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi Mobile App डाउनलोड करून घ्या.

१ ) जमीन : सोयाबीन लागवडीसाठी मध्यम ते भारी जमीन आवश्यक आहे . अत्यंत हलक्या जमीनीत सोयाबीनचे अपेक्षित उत्पादन येत नाही . जास्त आम्लयुक्त , क्षारयुक्त तथा रेताड जमीनीत सोयाबीनचे पीक घेऊ नये . जमीनीत सेंद्रिय कर्बाची मात्रा चांगल्या प्रमाणात असली पाहिजे

२ ) हवामान : सोयाबीन हे पीक सुर्यप्रकाशास संवेदनशील आहे . सोयाबीन पीकासाठी समशितोष्ण हवामान अनुकूल असते . त्यामुळे उन्हाळी हंगामामध्ये पिकाची कायिक वाढीची अवस्था थोडीफार लांबण्याची शक्यता असते . सोयाबीन पीक २२ ते ३० अंश सेल्सिअस तापमानात चांगले येते ; परंतू , कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाले तर फूले व शेंगा गळतात . शेंगाची योग्य वाढ होत नाही आकार कमी होतो

३ ) वाण : पेरणीसाठी किमान ७० टक्के उगवणक्षमता असलेले बियाणे आवश्यक आहे. पेरणीसाठी वनामकृवि, परभणीने विकसीत केलेल्या एमएयुएस ७१, एमएयुएस १५८ व एमएयुएस ६१२ या वाणांची किंवा महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीने विकसीत केलेल्या केडीएस ७२६ , केडीएस ७५३ या वाणांची किंवा जवाहरलाल नेहरु कृषी विश्वविद्यालय, जबलपूर ने विकसीत केलेल्या जेएस ३३५, जेएस ९३-०५, जेएस २०-२९, जेएस २०-६९, जेएस २०-११६ या वाणांची निवड करावी.

४ ) जमीनीची पूर्व मशागत : खरीप हंगामातील पिकाच्या काढणीनंतर नांगरणी करुन विरुध्द दिशेने मोगडणी करावी व नंतर पाटा मारुन जमीन समतोल करावी .

५ ) बिजप्रक्रिया, पेरणी , खते व आंतरमशागत : बिजप्रक्रिया: सोयाबीनवर विविध रोग येतात व त्यामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते . रोग आल्यानंतर बुरशीनाशकाची फवारणी घेण्यापेक्षा पेरणीपूर्वीच बिन प्रक्रिया केल्यास रोगाचे व्यवस्थापन व्यवस्थीतरित्या होते . सोयाबीन बियाण्यास पेरणीपूर्वी मिश्न उत्पादन कार्बोक्झीन ३७.५ % + थायरम ३७.५ % ची ( व्यापारी नाव – व्हिटावॅक्स पॉवर) ३ ग्रॅम प्रति कि.ग्रॅ . बिज प्रक्रिया करावी.

बीज प्रक्रियेमुळे सोयाबीनचे कॉलर रॉट, चारकोल रॉट व रोपावस्थेतील इतर रोगांपासून संरक्षण होते. या शिवाय बिजप्रक्रियेसाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी ( ८-१० ग्रॅम / कि.ग्रॅ . बियाणे ) चा वापर सुध्दा करावा. या बुरशी नाशकांच्या बिज प्रक्रियेनंतर बियाण्यास रायझोबियम जिवाणू खत ( ब्रेडी रायझोबियम ) + स्फुरद विरघळणारे जिवाणू खताची ( पीएसबी ) २५० ग्रॅम प्रति १० कि.ग्रॅ . किंवा १०० मिली / १० कि.ग्रॅ. ( द्रवरुप असेल तर ) याची बिजप्रक्रिया करावी.

पेरणी :

पेरणीची वेळ : उन्हाळी हंगामी सोयाबीनच्या बिजोत्पादनाकरिता डिसेंबरचा शेवटचा आठवडा ते जानेवारीच्या पहिल्या पंधरवाड्या पर्यंत पिकाची पेरणी करावी . जर पेरणीस उशीर झाला तर पिक फुलोऱ्यात असतांना व दाणे भरण्याच्या अवस्थेत असतांना म्हणजेच मार्च व एप्रिल महिन्यात जास्त तापमानामुळे फुले शेंगा गळ होते व दाण्याचा आकार लहान होतो. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होऊ शकते. जर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किमान तापमान १० अंश सेल्सीअसच्या खाली गेले असेल तर पेरणी थोडी लांबवून तापमान साधारणत: १५ अंश झाल्यास पेरणी करावी. कमी तापमानात पेरणी केल्यास उगवणीसाठी १० ते १२ दिवस लागतात.

लागवडीचे अंतर व पध्दत : सोयाबीनची पेरणी ४५ x ५ सें.मी. अंतरावर व २.५ ते ३.० सें.मी. खोलीवर करावी . पेरणीच्या वेळेस बियाणे जास्त खोलीवर पडल्यास व्यवस्थित उगवण होत नाही . बियाण्याचे प्रमाण : सोयाबीन लागवडीसाठी हेक्टरी ६५ कि.ग्रॅ . बियाणे वापरावे ( एकरी २६ किलो ) .

खते :
शेणखत / कंपोस्ट खत : सोयाबीनसाठी हेक्टरी २० गाड्या ( ५ टन ) शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकून जमिनीत चांगले मिसळावे .
रासायनिक खते : सोयाबीनला हेक्टरी ३० कि.ग्रॅ.नत्र + ६० कि.ग्रॅ . स्फुरद + ३० कि.ग्रॅ . पालाश + २० कि.ग्रॅ . गंधक पेरणीच्या वेळेसच द्यावे . पेरणी करतेवेळी खते ही बियाण्याच्या खालीच पडतील व त्यांचा बियाण्याशी सरळ संपर्क येणार नाहो . याची काळजी घ्यावी . गंधकाचा वापर सोयाबीनसाठी अत्यंत आवश्यक आहे . त्याच प्रमाणे हेक्टरी २५ किलो झिंक सल्फेट आणि १० कि.ग्रॅ . बोरॅक्स द्यावे. या पिकास नत्र, स्फुरद, पालाश, मॅग्नेशिअम, गंधक, कॅल्शियम, मॉलिब्डेनम, बोरॉन, लोह, जस्त व मँगनीज ही अन्नद्रव्ये वाढीसाठी, फुलधारणेसाठी व शेंगात दाणे भरण्यासाठी आवश्यक असतात.

उन्हाळी हंगामात पाणी देण्यामध्ये खंड पडल्यास पोटॅशियम नायट्रेटच्या दोन फवारण्या अनुक्रमे ३५ व्या व ५५ व्या दिवशी १०० ग्रॅम पाण्यामध्ये टाकून फवारणी करावी . पेरणीनंतर नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा तसेच माती परिक्षण अहवालानुसार रासायनिक खतांची मात्रा कमी जास्त करावी . पिक २० ते २५ दिवसाचे असतांना जर सुक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिवळे पडल्यास मायक्रोला ( ग्रेड -२ ) या सुक्ष्मअन्नद्रव्यांची ५० ते ७५ मि.ली. प्रति १० लिटर पाण्यामध्ये फवारणी करावी . पिक शेंगा लागण्याच्या अवस्थेत असतांना १ ९ : १ ९ : १ ९ या लिक्विड रासायनिक खताची १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये टाकून फवारणी करावी तसेच शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतांना ०:५२:३४ या लिक्विड रासायनिक खताची १०० ग्रॅम प्रति १० लिटर १० लिटर

पाण्यामध्ये टाकून फवारणी करावी . रासायनिक खते देण्यासाठी खालील पैकी कोणत्याही एका पर्यायाचा वापर करता येईल. आंतरमशागत : पिक २० ते ३५ दिवसाचे असतांना दोन कोळपण्या ( १५ ते २० दिवस पहिली आणि ३० ते ३५ दिवसांनी दुसरी ) व एक निंदणी करुन शेत तणविरहित ठेवावे. एकदा सोयाबीनला फुले लागली की कोळपणी करु नये अन्यथा सोयाबीनच्या मुळा तुटून नुकसान होते.

पाण्याचे नियोजन (Water management) : पेरणीच्या अगोदर तुषार सिंचनाने पाणी देवून पेरणी करावी. थंडीमुळे तापमान कमी असेल तर पूर्णत: उगवणीसाठी १० ते १२ दिवस लागू शकतात . चांगल्या उगवणीसाठी पेरणीनंतर ५ दिवसांनी पुन्हा तुषार सिंचनाने हलके पाणी द्यावे. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात १० ते १२ दिवसांच्या अंतराने तसेच मार्च व एप्रिल महिन्यात ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. सोयाबीनमध्ये रोप, फुलोऱ्याची व शेंगा भरण्याची अवस्था या पाण्याचा ताणास संवेदनशील असल्यामुळे या कालावधीत पाटाने पाणी द्यावे. ज्या शेतात बिजोत्पादन घ्यावयाचे आहे त्या शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. पिक पेरणी ते काढणी या कालावधीत साधारणत : जमीनीच्या मगदुराप्रमाणे ८ ते १० पाणी पाळ्याची आवश्यकता आहे.

भेसळ काढणे : सोयाबीन पिकामध्ये झाडांची उंची , पानांचा आकार , झाडावरील लव , पान , खोड व फुलांचा रंग इत्यादी लक्षणांनुसार भेसळ ओळखून नष्ट करावी .

पीक संरक्षण (Crop Insurance): उन्हाळी सोयाबीन पिकावर तंबाखुवरील पाने खाणारी अळी, घाटेअळी, वाटाण्यावरील शेंगा पोखरणारी अळी तसेच पांढरी माशी व तुडतुडे इ. किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. सदर किडींच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस ५० ईसी ( २० मिली ) किंवा लँबडा सायहॅलोथ्रीन ४.९ सी.एस. ( ६ मिली ) किंवा थायमिथोक्झाम १२.६० % + लँबडा सायहॅलोथ्रीन ९ .५ % झेडसी ( २.५ मिली ) किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल १८.५ एस सी ( ३ मिली ) या किटकनाशकांचा वापर करावा. सदर किटकनाशकांचे प्रमाण हे १० लीटर पाणी ( साधा पंप ) यासाठी असून पॉवर स्प्रे साठी किटकनाशकाची मात्रा तीनपट करावी. उन्हाळी सोयाबीन पिकावर रोगांचा प्रादुर्भाव फारसा होत नाही; परंतु, येलो व्हेन मोझेक या विषाणू रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. प्रादुर्भावग्रस्त झाडे आढळून आल्यास ती उपटून नष्ट करावी . पांढऱ्यामाशीचा प्रादुर्भाव वाढल्यास या रोगाचा प्रसार वेगाने होतो . त्यामुळे पांढयमाशीचे नियंत्रण करणे आवश्यक आहे . त्यासाठी थायमिथोक्झाम १२.६० % + लँबडा सायहॅलोथ्रीन ९ .५ % झेडसी ( २.५ मिली / १० लीटर पाणी ( साधा पंप ) या किटकनाशकाचा वापर करावा .

काढणी व मळणी :

शेंगा पिवळ्या पडून पक्व होताच पीकाची काढणी करावी. कापणी नंतर पिकाचे छोटे छोटे ढीग करुन २-३ दिवस उन्हात चांगले वाळवून मळणी यंत्राची गती कमी करुन मळणी करावी व बियाण्याच्या बाह्य आवरणाला ईजा पोहचणार नाही याकडे लक्ष द्यावे. मळणी करतांना बियाण्यातील आर्द्रता १४ टक्के पर्यंत असेल तर मळणी यंत्राच्या फेऱ्यांची गती ४०० ते ५०० फेरे प्रति मिनीट इतकी ठेवावी व बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण १३ टक्के पर्यंत असेल तर गती ३०० ते ४०० फेरे प्रति मिनीट इतकी ठेवावी . साधारणत : उन्हाळी हंगामामध्ये तयार झालेल्या बियाण्याचा रंग पिवळसर हिरवट असतो .

साठवण (Storage Facility): मळणी नंतर बियाणे ताडपत्री / सिमेंटच्या खळ्यावर पातळ पसरुन बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण १० ते १२ टक्के पर्यंत आणावे . बियाणे स्वच्छ करुन पोत्यात भरुन साठवण करावी . साठवणीचे ठिकाण थंड , ओलावारहित व हवेशीर असले पाहिजे . साठवण करतांना एकावर एक चार पेक्षा जास्त पोती ठेवू नये .
उत्पादन : उन्हाळी सोयाबीनचे एकरी ३ ते ५ क्विंटल पर्यंत सरासरी उत्पादन येऊ शकते .

टिप : उन्हाळी सोयाबीनचे उत्पादन खरीप हंगामासारखे होत नाही . दाण्याचा आकार लहान असतो . १०० दाण्याचे वजन ८ ते १० ग्रॅम असते . उन्हाळी सोयाबीनचा हंगाम फक्त घरच्याघरी बिजोत्पादन करण्यासाठी चांगला आहे. शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीन बिजोत्पादन घेण्यास हरकत नाही .

लेखक :
१ ) डॉ . एस.पी. म्हेत्रे प्रभारी अधिकारी , सोयाबीन संशोधन योजना, वनामकृवि, परभणी. मो . क्र . – ७५८८१५६२१०.
२ ) डॉ. आर. एस. जाधव- सहाय्यक प्राध्यापक ( किटकशास्त्र ), सोयाबीन संशोधन योजना, वनामकृवि, परभणी.
३ ) श्री व्ही. आर. घुगे – सहाय्यक प्राध्यापक, सोयाबीन संशोधन योजना, वनामकृवि, परभणी. मो.क्र . – ७५८८१५६२१३.

error: Content is protected !!