Agri Business : आज जगातील सर्वात महाग फळ. त्याची किंमत इतकी जास्त आहे, की त्यात तुम्ही ३० तोळे सोने खरेदी करू शकाल! हे फळ म्हणजे खरबुजाचाच एक प्रकार आहे. जगात या फळाचे उत्पादन फक्त जपानमध्ये होते. तेही फक्त जपानच्या एका बेटावरील एका शहरातच. आपण ज्या खरबूज फळाबद्दल बोलत आहोत त्याचे नाव आहे युबरी किंग मेलन (Yubari King Melon).
असे म्हटले जाते, की हे जगातील सर्वात महाग फळ आहे. हा जपानी खरबूजाचा (डांगर ) एक प्रकार आहे. त्याची लागवड फक्त जपानमध्ये केली जाते. युबारी खरबूजाची लागवड फक्त जपानच्या होक्काइडो बेटावर असलेल्या युबारी शहरातच केली जाते. त्यामुळे याला युबरी खरबूज आणि पुढे फळांचा खरा राजा म्हणून युबरी किंग असे नाव पडले. युबरी शहराचे वातावरण या फळाच्या लागवडीसाठी सर्वात योग्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
फक्त सहा महिने होऊ शकते लागवड युबरी किंगची वर्षभर लागवड होत नाही. त्याचे उत्पादन फक्त ऑक्टोबर ते मार्च महिन्यातच होते. त्याची लागवड देखील वेगळ्या पद्धतीने केली जाते. या खरबुजाच्या शेतात विविध प्रकारची नैसर्गिक खते वापरली जातात. यामुळे युबरी किंग फळावर बरेच दिवस कोणत्याही रोगराईचा काहीही परिणाम होत नाही.
रक्तदाब नियंत्रणात ठेवणारे पोटॅशियमयुक्त फळ
खरबूज खायला सर्वांनाच आवडते. आपल्या नेहमीच्या खरबुजामध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणात आढळते. त्याचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. याशिवाय हृदयाशी संबंधित अनेक आजार बरे होतात. त्यामुळेच बाजारात साध्या खरबुजालाही नेहमीच मागणी असते.
एप्रिल ते मे या कालावधीत हे फळ बाजारात सहज उपलब्ध होत असते. त्याचा दरही साधारणतः ५० ते ६० रुपये किलो असा आवाक्यात असतो; पण आज आपण खरबुजाच्या ज्या प्रकाराबद्दल बोलत आहोत, त्याची गणना जगातील सर्वात महाग फळांमध्ये केली जाते. त्याची किंमत हजारात नाही तर लाखात आहे. या किमतीत तुम्ही आलिशान लक्झरी कार खरेदी करू शकता. त्यात तुम्ही ३० तोळे सोने खरेदी करू शकता.
फक्त श्रीमंत लोकच खातात हे फळ –
युबरी किंग हे संक्रमण विरोधी फळ आहे. अशा स्थितीत याचे सेवन केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. पोटॅशियम व्यतिरिक्त, व्हिटॅमिन सी, फॉस्फरस, व्हिटॅमिन ए आणि कॅल्शियम देखील त्यात भरपूर आढळतात. त्यामुळेच बाजारात त्याला मोठी मागणी आहे; पण उत्पादन अत्यंत मर्यादित असल्याने जगातील श्रीमंत लोकच फक्त ते खाऊ शकतात.