मागणीनुसार एकरकमी एफआरपी देऊ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सांगली

आम्ही एकरकमी ‘एफआरपी’बाबत यापूर्वीही स्पष्ट केले आहे; मात्र एफआरपी तीन हप्त्यांत द्यावी, अशी ‘क्रांती’च्या सभासदांचीच मागणी आहे. जे शेतकरी एकरकमी एफआरपीची मागणी करतील, त्यांना एकरकमी देऊ, अशी माहिती आमदार अरुण लाड यांनी दिली. क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या २६ व्या अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार लाड बोलत होते.

यावेळी बोलताना आमदार लाड म्हणाले, की गेल्या वर्षी केवळ ३५ शेतकऱ्यांनीच एकरकमी एफआरपी नेली. राज्यातील एफआरपीपेक्षा जास्त दर देणारा कारखाना ‘क्रांती’ आहे. यावर्षी एफआरपीपेक्षा ८० रुपये जास्त रक्कम शेतकऱ्यांना देत आहोत.यातील ४० रुपये भागविकास निधी व उर्वरित ४० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर दीपावलीपूर्व जमा करत आहोत. कारखान्याची २९७५ रुपये एफआरपी असताना या वेळी शेतकऱ्यांना ३०५५ रुपये देत आहोत. आजवर कारखान्याने शेतकऱ्यांना जशी हवी तशी एफआरपी दिली आहे.

यापूर्वी बहुतांश ऊस उत्पादकांनी तीन हप्त्यांत एफआरपीची रक्कम द्यावी, असे सांगितले, त्यानुसार दिली आहे. आज रोजी १४ हजार एकर ऊस नोंद आहे. यातून आपण १२ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. शासनाने साखरेचा हमीभाव प्रतिक्विंटल ३६०० रुपये करावा. कारखान्‍याने शेतकऱ्यांची, बँकांची देणी व कर्मचाऱ्यांच्या बोनससह पगार व तोडणी वाहतूक कमिशन डिपॉझिट अशी सर्व देणी वेळेत दिली आहेत.

यावेळी उपाध्यक्ष उमेश जोशी, उद्योजक उदय लाड, क्रांती दूध संघाचे किरण लाड, दिलीप लाड, जिल्‍हा परिषद सदस्‍य शरद लाड, जयवंत कुंभार, निवृत्ती पाटील, प्रशांत चौगुले यांच्यासह कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्‍हाणे, सचिव अप्‍पासाहेब कोरे उपस्थित होते. दिलीप पार्लेकर यांनी सूत्रसंचालन केले.

 

error: Content is protected !!