हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी सरासरीच्या तुलनेत पाऊसमान कमी राहिले. त्यामुळे देशातील अनेक पिकांना (Agri Export) याचा फटका बसला आहे. त्यातच केंद्र सरकारने देशातंर्गत बाजारात दर स्थिर ठेवण्यासाठी अनेक कृषी उत्पादनांच्या निर्यातीवर बंधने (Agri Export) घातले आहे. परिणामी यावर्षी देशातील शेतमालाच्या निर्यातीत मोठी घट नोंदवली गेली आहे. एकट्या सप्टेंबर महिन्यात केवळ 17.93 लाख टन कृषी मालाची निर्यात होऊ शकली आहे. अशी माहिती एपीडा अर्थात अन्न आणि विकास प्राधिकरणाच्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे.
केंद्र सरकारकडून निर्बंध (Agri Export Decreases In First Half)
अन्न आणि विकास प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार, यावर्षी (एप्रिल ते सप्टेंबर 2023) या पहिल्या सहामाहीत 172.27 लाख टन कृषी उत्पादनांची निर्यात करण्यात आली आहे. या काळात कांदा निर्यातीसह, तुकडा तांदूळ, बिगरबासमतीसह अन्य उत्पादनांच्या निर्यातीवर केंद्र सरकारकडून निर्बंध घालण्यात आले. परिणामी, सप्टेंबर महिन्यात 17.93 लाख टन, ऑगस्ट महिन्यात 27.94 लाख टनांसह कृषी उत्पादनांच्या निर्यातीत मोठी घसरण झाली आहे. ऑगस्ट महिन्यातील शेतमाल निर्यात मूल्याच्या दृष्टीने विचार करता 18 हजार 128 कोटी इतकी नोंदवली गेली आहे. ज्यात सप्टेंबर महिन्यात 14,153 कोटीपर्यंत घसरण झाली आहे.
सप्टेंबर महिन्यातील निर्यातीमध्ये प्रामुख्याने गैर-बासमती 4.25 लाख टन, बासमती तांदूळ 1.21 लाख टन, कांदा 1.51 लाख टन आणि म्हशीच्या मांसाची 1,21,427 टन निर्यात नोंदवली गेली होती. दरम्यान बांग्लादेश सरकारने 2019 मध्ये संत्र्यावर प्रति किलो 20 रुपये आयात शुल्क लावले होते. मात्र आता ते शुल्क यावर्षी 88 रुपये प्रति किलो करण्यात आले आहे. त्यामुळे नागपुरी संत्र्याची निर्यात देखील 60 टक्क्यांनी घटल्याचे एपीडाच्या आकडेवारीतून समोर आले आहे.
खाद्यतेल आयात, सरकीच्या दरात घसरण!
कापसाच्या बाबतीतही सरकीचे दर कमी झाल्याने तसेच खाद्यतेलाची आयात केली जात असल्याने सरकीचे दर उतरले आहेत. कापसाच्या कमी गाठींच्या आयात करून देशांतर्गत अधिक गाठींचे दर दबाव ठेवण्याचे कारस्थान कापड उद्योजक करत असल्याचा आरोप केला जात आहे. तर सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्क 35 टक्क्यांनी कमी केले असून, पाम सूर्यफूल व सोयाबीनच्या कच्च्या तेलाचे आयात सुरू आहे. गेल्या आठवड्यात सोयाबीनचा भाव 5300 प्रतिक्विंटल होता. तो घसरून आता 4900 पर्यंत खाली आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.