Agricultural Implements : महिलांसाठी सुधारित शेती अवजारे; आता कामे होतील सुखकर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीच्या बहुतांश कामामध्ये महिलांचा सहभाग जास्त असतो. शेतीकामामध्ये (Agricultural Implements) महिलांना जास्त वेळ आणि मानवी ऊर्जा देऊन काम करावे लागते. ज्यामुळे महिलांना पाठीच्या, मणक्याच्या विविध आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे शेतीमध्ये काम करताना महिलांची कामे सुखकर व्हावी. यासाठी कृषी विद्यापीठाने काही अवजारे (Agricultural Implements) विकसित केली आहेत. या अवजारांमुळे महिलांच्या वेळ व श्रम व खर्चातही बचत होते. तसेच त्यांना आरोग्याच्या भेडसावणाऱ्या समस्याही कमी होण्यास मदत होणार आहे.

सुधारित शेती अवजारे (Agricultural Implements For Woman Farmers)

  • वैभव विळा
    गहू, ज्वारी व गवत इ. कापणी जमिनीलगत करता येते. दातेरी पात्यामुळे या विळ्याला धार लावायची गरज नाही. वजनास हलके आणि अधिक चांगली पकड असून, समतोल साधून सहज कापणी होते. एका तासामध्ये 2 गुंठ्याची कापणी करता येते.
  • भेंडी तोडणी कात्री
    भेंडीच्या देठावर एक प्रकारची लव असते. भेंडी काढताना तळहात आणि बोटांना त्यामुळे इजा होते. भेंडी काढण्यासाठी मजूर नाखूष असतात. विद्यापीठाच्या कृषी यंत्र विभागामार्फत भेंडी काढण्यासाठी कात्री विकसित केली आहे. तिचा उपयोग केल्यास हातांना त्रास होत नाही. एका मजुराद्वारे दिवसाला 50 ते 60 किलो भेंडी सहजपणे काढता येते. त्यामुळे भेंडी काढण्याचा खर्च कमी होतो.
  • भुईमुग शेंगा तोडणी चौकट
    यामध्ये उलट्या व्ही आकाराचे दाते लावले आहेत. शेंगा तोडण्यासाठी लागणारी मजूर शक्ती व वेळ यांची बचत होते. चार स्त्रीमजूर एकाच वेळी या शेंगा तोडणी चौकटीवर काम करु शकतात. शेंगा तोडणीची क्रिया शेंगासहित असलेल्या झाडाला तोडणी चौकटीवर ओढता मारा देऊन केली जाते. यामध्ये शेंगा फुटण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. हाताने शेंगा तोडण्यापेक्षा जवळ जवळ चारपट शेंगा तोडणी जास्त होते. साधारणपणे हाताने शेंगा तोडताना एक स्त्री मजूर 30-35 किलो शेंगा एका तासात तोडते. तीच स्त्री मजूर शेंगा तोडणी चौकटीच्या साहाय्याने 120 ते 130 किलो शेंगा एका तासात तोडते.
  • भुईमुग शेंगा फोडणी यंत्र
    एका तासात एक मजूर सरासरी 50 ते 60 किलो शेंगा सहजपणे आणि जास्त श्रम न करता फोडू शकतो. शेंगा फोडण्याचा वेग वाढल्यामुळे शेंगा वेळेत फोडून होतात, त्यामुळे वेळ, श्रम, पैसा वाचतो. यंत्राने शेंगा फोडल्यास 6 ते 8 टक्के फुट होते. मात्र फुटीचे दाने खाण्यायोग्य असतात. यंत्रातून निघालेले पूर्ण शेंगदाणे बियाणे म्हणून वापरता येतात.
  • मका सोलणी यंत्र
    या यंत्राची रचना अगदी साधी असल्यामुळे उपलब्ध साधन सामुग्रीतून खेड्यातील कारागीरही यंत्र तयार करू शकतो. आकाराने लहान व वजनाने हलके, त्यामुळे हातात सहजपणे आणि जास्त श्रम न पडता धरता येते. आठ तासात साधारणपणे दोनशे किलो वाळलेली कणसे सोलून होतात. लहान प्रमाणावर मका सोलण्यासाठी फार उपयोगी, श्रम कमी करणारे आणि वेळेची बचत करणारे असे हे यंत्र आहे.
  • दातेरी हात कोळपे
    पिकाच्या दोन ओळीत निंदनी करण्यासाठी, मजुराला उभ्याने कोळपे दोन्ही हाताने मागे पुढे ढकलून चालविता येते. त्यामुळे कामाचा शीण कमी होतो व मजुराची कार्यक्षमता, उत्साह टिकून काम वेगाने होते. कोळप्याचे पाते 15 से.मी. लांबीचे असते. त्यामुळे दोन ओळींत 15 से.मी. पेक्षा जास्त अंतर असलेल्या पिकातसुधा या कोळप्याने निंदनी, खुरपणी करता येते. कोळप्यामुळे साधारणपणे ३ से.मी. खोलीपर्यंत जमिनीची खुरपणी होते. सर्व प्रकारच्या पिकात आणि सर्व प्रकारच्या हलक्या, मध्यम तसेच भारी जमिनीत कोळपे सारख्या क्षमतेने वापरता येते. एक मजूर दिवसाकाठी 0.2 हेक्टर क्षेत्राची निंदनी-खुरपणी करू शकतो.
  • सायकल कोळपे
    याचा उपयोग 15 से.मी. पेक्षा जास्त अंतर असलेल्या पिकात कोळपणी, निंदनी, खुरपणी करण्याकरता होतो. 5 ते 7 से.मी. पर्यंत जमिनीत खुरपणी करता येते. एक मजूर दिवसाकाठी 0.2 हेक्टर क्षेत्राची निंदनी, खुरपणी सहजपणे करू शकतो.
  • नवीन टोकन यंत्र
    हे एक मनुष्यचलित यंत्र असून मध्यम आकाराच्या बियाणे पेरणीसाठी वापरले जाते. कमी क्षेत्र व डोगराळ भागात सोयाबीन, ज्वारी, मका, इ. पिकाच्या पेरणीसाठी वापरले जाते.
  • चक्रीय टोकन यंत्र
    हे एक मनुष्यचलित यंत्र असून, सायकल कोळप्याप्रमाणे पुढे ढकलून चालवले जाते. या यंत्राद्वारे मोठ्या व मध्यम आकाराच्या बियाण्याची उदा. सोयाबीन, ज्वारी, मका, मुग इ. पेरणी केली जाते.

(संदर्भ : इंजि. वैभव सुर्यवंशी, प्रा. किरण जाधव, डॉ. विशाल वैरागर)

error: Content is protected !!