हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना (Agricultural Machinery) राबवल्या जातात. त्यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी देखील दिला जातो. मात्र हा निधी अधिकारी आणि कर्मचारी वर्गच हडप करत असल्याचे अनेक प्रकार समोर येतात. अशातच आता पंजाब या शेती क्षेत्रातील आघाडीच्या राज्यामध्ये देखील कृषी मशिनरी घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. जवळपास 900 कृषी अधिकाऱ्यांना कृषी मशिनरीच्या घोटाळ्या प्रकरणी (Agricultural Machinery) पंजाब सरकारकडून नोटीस पाठवण्यात आली असून, पंधरा दिवसांत या नोटिशीवर आपले उत्तर द्यावे, असे पंजाब सरकारकडून सांगण्यात आले आहे.
11,000 मशिनरी गायब (Agricultural Machinery For Farmers)
पंजाबमध्ये ‘पीक अवशेष व्यवस्थापना’साठी केंद्र सरकारकडून 90,422 कृषी मशिनरी अनुदान तत्वावर देण्यात आल्या आहे. मात्र यातील 11,000 मशीन गायब आहेत. 2018-19 आणि 2021-22 असे दोन वर्ष केंद्र सरकारकडून अनुदानावर शेतकऱ्यांना मशिनरीचे वाटप करण्यात आले होते. विशेष म्हणजे 140 कोटी रुपयांची मशिनरी शेतकऱ्यांपर्यंत पोहचली नसून, या मशिनरीचा निधी अधिकाऱ्यांनी संगनमताने हडप केल्याचे तपासात उघड झाले आहे. याबाबत तपासात यंत्रे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसतानाही बनावट बिले सादर करून, अनुदान हडप करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही बाब केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या एका पथकाने क्षेत्र सर्वेक्षण केल्यानंतर उघड झाली असून, त्यानंतर पंजाब सरकारकडून या कृषी अधिकाऱ्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
केंद्राकडून 1178 कोटींचा निधी
केंद्र सरकारने 2018-19 आणि 2021-22 असे दोन वेळा पंजाब सरकारला शेतकऱ्यांना अनुदानावर मशिनरी उपलब्ध करून देण्यासाठी 1178 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मात्र, फरीदकोट, फिरोजपुर, अमृतसर, गुरदासपुर, बठिंडा, मोगा आणि पटियाला या भागातील अनेक शेतकऱ्यांना ही मशीन देण्यातच आलेली नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनेचा निधी अधिकारी हडप करत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या 900 अधिकाऱ्यांमध्ये कृषी सहायक उपनिरीक्षक, कृषी विकास अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी अशा उच्च पद असलेल्या कृषी अधिकाऱ्यांच्या नावांचाही देखील समावेश आहे.