Agriculture Exhibition : शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी, 26 जानेवारीपासून भीमा कृषी व पशु प्रदर्शन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि भव्य असे ‘भीमा कृषी व पशु प्रदर्शन 2024’ (Agriculture Exhibition) हे 26 ते 29 जानेवारी 2024 या कालावधीत कोल्हापुरातील ‘मेरी वेदर मैदान’ येथे आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे आता शुक्रवारपासून राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही मोठी सुवर्णसंधी असणार आहे. या प्रदर्शनाचे हे 15 वे वर्ष असून, आधुनिक पद्धतीची शेती अवजारे, सेंद्रिय खते, बी-बियाणे, तणनाशके, कीटकनाशके, स्प्रे-पंप, सौर-ऊर्जा पंप, फळझाडांसाठी टॉनिकस, ट्रॅक्टर्स अशा सर्व वस्तू या कृषी प्रदर्शनात (Agriculture Exhibition) एकाच छताखाली शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे, असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

काय असेल प्रदर्शनात? (Agriculture Exhibition In Kolhapur)

‘भीमा कृषी व पशु प्रदर्शन 2024’ या प्रदर्शनात (Agriculture Exhibition) शेतकऱ्यांना देश-विदेशातील नामांकित कंपन्यांची अनेक उत्पादने उपलब्ध असणार आहे. यासाठी विविध कंपन्यांना शेती, उत्पादन वाढीसाठी विविध तंत्रज्ञान असलेले स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहे. यावेळी प्रदर्शनात जवळपास विविध प्रकारचे 400 पेक्षा अधिक स्टॉल्स असणार आहेत. यापैकी 200 स्टॉल्स हे महिला बचत गटांना मोफत दिले जाणार आहे. याशिवाय या प्रदर्शनात देशभरातील विविध जातीच्या पाळीव जनावरांचा समावेश असणार आहे. याशिवाय दररोज विविध विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने असतील. तर सायंकाळी उपस्थित शेतकऱ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी देखील असणार आहे. असेही प्रदर्शनाच्या आयोजकांनी म्हटले आहे.

‘गोलू 2’ रेडा ठरणार आकर्षण

उत्तरेकडील हरियाणा राज्यातील ‘गोलू 2’ हा दहा कोटींचा रेडा हा प्रदर्शनाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणार आहे. ‘गोलू 2’ या रेड्याने बिहार आणि उत्तर प्रदेशातील विविध कृषी प्रदर्शनांमध्ये लाखोंची बक्षिसे जिंकलेली आहे. या रेड्याच्या सिमेन्स विक्रीतून महिन्याला 15 लाख रुपये मिळतात. त्यामुळे हा रेडा पाहण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रासह आसपासच्या जिल्ह्यांतून मोठी गर्दी होणार असल्याचे सांगितले आहे. त्या दृष्टीने आयोजकांकडून तयारी सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय प्रदर्शनात शेतकऱ्यांना विविध जातीचे बैल, गायी, पक्षी देखील पाहायला मिळणार आहे.

‘भीमा कृषी व पशु प्रदर्शन 2024’ या प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. 26) दुपारी तीन वाजता होणार आहे. तर 29 जानेवारीला सायंकाळी चार वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचा समारोप होणार आहे. या प्रदर्शनात पाच महिला जिजामाता शेतीभूषण पुरस्कारासह, शेतकरी, कृषी सहाय्यक, संशोधन शास्त्रज्ञ, भीमा जीवन गौरव पुरस्कार देऊन काहींना गौरवण्यात येणार आहे. असेही आयोजकांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!