हॅलो कृषी ऑनलाईन: कृषी क्षेत्रात दिवसेंदिवस वाढत चाललेली समस्या म्हणजे पिकांचे वाढते उत्पादन खर्च (Agriculture Expenses) हा खर्च प्रामुख्याने बियाणे व रासायनिक खतांच्या वाढत्या किमती, नैसर्गिक आपत्तिमुळे दुबार पेरणी यासारख्या समस्या यामुळे वाढतो. तर बरेचदा शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतील जमाखर्च (Agriculture Expenses) यांचा तपशील समजत नसल्यामुळे त्यांचा एकूण खर्च किती झाला आहे हेच त्यांना माहित नसते.
पण काही शेतकरी वर्षानुवर्षे शेती करताना दरवर्षी काहीतरी नवीन शिकतात आणि त्या शिकवणीचा वापर आपल्या कृषी व्यवसायात करतात. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील दत्त साखर कारखान्याचे अर्जुनवाड गावातील शेतकरी ज्योतिबा गंगाधर असेच एक शेतकरी आहेत ज्यांनी शेतीचे अर्थशास्त्र किती गरजेचे आहे हे सांगीतले आहे.
हॅलो कृषी सोबत बोलतांना ज्योतिबा गंगाधर यांनी सांगितलं की ते सुरुवातीला शेतीत भरमसाठ खर्च करायचे परंतु त्यामानाने पिकांचे उत्पादन मात्र खूप कमी यायचे. त्यामुळे मोठ्या नुकसानीला सामोरा जावे लागायचे. विचार केल्यावर त्यांच्या लक्षात आले की शेतावर होणार्या खर्चाचा त्यांच्याकडे काही हिशोबच नाही आहे. त्यामुळे एकूण नफा झाला की तोटा हे कळायला मार्गच नाही. हे लक्षात येताच त्यांनी शेतीचा जमाखर्च लिहायला सुरुवात केले. शेतीच्या कामासाठी होणारा कमीतकमी ते जास्तीत जास्त खर्च सुद्धा ते त्यांच्या जमाखर्च वहीत लिहायला लागले.
या सवयीमुळे त्यांच्या शेतात ते अनावश्यक खर्च कुठे करतात हे त्यांच्या लक्षात आले. शिवाय पीक पोषण ते पीक संरक्षण यासाठी कमी खर्चिक पद्धती यांचा सुद्धा ते वापर करू लागले त्यामुळे साहजिकच त्यांना पूर्वीच्या आणि आताच्या खर्चात होणारी तफावत जाणवायला लागली. त्यानंतर त्यांनी दरवर्षी शेतीवर होणार्या खर्चाचा हिशोब वहीत लिहून ठेवणे ही स्वत:ला एक सवय लावून घेतली. या सवयीमुळे शेतीचे योग्य नियोजन करणे त्यांना सोपे झाले व आता ते फायद्याची शेती करायला लागले.
हे सुद्धा पहा: स्वतःच्या शेतीचे जमाखर्च दाखविताना ज्योतिबा गंगाधर
शेतीचे जमाखर्च (Agriculture Expenses) यांचा योग्य मेळ ठेवल्यास कमी खर्चात सुद्धा आपण चांगले उत्पादन घेऊ शकतो आणि उत्पन्न वाढवू शकतो हे ज्योतिबा गंगाधर यांनी त्यांच्या कृतीतून सिद्ध केले आहे. शेतकर्यांनी त्यांच्या या कृतीतून प्रेरणा घेतल्यास नक्कीच शेती फायद्याची करता येईल यात शंका नाही.