राज्यातील ओला दुष्काळ कृषिमंत्र्यांना दिसेना : राजू शेट्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी सोमवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारवर सडकून टीका केली. राज्यात ऊस वगळता सर्व पिकांचे अतिवृष्टीने संपूर्ण नुकसान झाले आहे. तरीही राज्याच्या कृषिमंत्र्यांना राज्यातील ओला दुष्काळ दिसत नाही. त्यांचा अनुभव कदाचित आमच्यापेक्षा जास्त असावा, ते म्हणत त्यांनी सरकरावर टीका केली.

पुढे बोलताना ते म्हणाले, पीकविमा कंपन्यांनी दिवाळीसाठी आधी नुकसानीचा अग्रिम द्यायला हवा होता. पण या कंपन्या देखील काहीच करत नाहीत. तलाठी या स्थितीत पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांना पैसे मागत आहेत. राज्य सरकारला याचे गांभीर्य दिसत नाही. शंभर दिवस झाले, तरी राज्य सरकार शेतकऱ्यांकडे पाहण्यास तयार नाही. गोविंदाला नोकऱ्या, डॉल्बीला परवानगी अशा सवंग घोषणा करण्यात सरकार मग्न आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

उसाच्या वजनात डिजीटलायझेशन का नाही ?

राज्यातील २०० साखर कारखान्यांनी उसाच्या वजनात काटामारी करत ऊस उत्पादकांची लूट सुरू केली. प्रत्येक कारखान्यातील वजन काटे हे संगणकीकृत करावेत, अशी आमची पूर्वीपासून मागणी आहे. आम्ही वजने व मापे खात्याचे महानियंत्रक रवींद्र सिंघल यांच्याकडेही केली आहे. त्यांनी एक समिती त्यासाठी स्थापनली आहे. सगळ्या कामात डिजीटलायझेशन जमते, तर उसाच्या वजनात का जमत नाही, अंदाजे दहा टक्के उसाची चोरी काटामारीद्वारे केली जाते. या चोरीच्या उसातून ४ हजार ५०० कोटी रुपयांची साखर उत्पादित करून त्याचा मोबदला स्वतःच्या खिशात टाकतात, हा शेतकऱ्यांच्या पैशावर दरोडा नाही का, असा प्रश्न शेट्टी यांनी केला. या वेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, अध्यक्ष अमोल हिप्परगे, युवा आघाडीचे अध्यक्ष विजय रणदिवे, सचिन पाटील आदी उपस्थित होते.

गुऱ्हाळ हा पारंपरिक उद्योग शेतकरी ग्रामीण उद्योग म्हणून करतात. सध्या सरकार गावपातळीवर उद्योगांना चालना देण्याचे धोरण चालवते. त्याप्रमाणे गावपातळी गुऱ्हाळ उत्पादक शेतकऱ्यांनाही इथेनॉल निर्मितीची परवानगी द्यावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

 

 

error: Content is protected !!