AI Technology : ऐकावं ते नवलंच, टोमॅटोच्या झाडाला बटाटे; अल्पभूधारकांना फायदा होणार!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी (AI Technology) असून, ते आता एकाच झाडावर टोमॅटो आणि बटाटा असे दोन्ही पिके घेऊ शकणार आहे. टोमॅटोच्या झाडाला वरती टोमॅटो लागतील आणि खाली मुळांना बटाटा लागेल. असे संशोधन कृषी वैज्ञानिकांनी विकसित केले आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात टोमॅटोच्या झाडाला बटाटे येण्याचे हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असून, सध्या सुरु असलेल्या कृषी प्रात्यक्षिक प्रदर्शनात (AI Technology) ते सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे.

वांग्याच्या झाडाला भोपळा

बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हे ‘कृषी प्रात्यक्षिक प्रदर्शन’ भरविण्यात आले आहे. 18 ते 22 जानेवारी या कालावधीत या भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी टोमॅटोच्या झाडाला बटाटे आल्याची किमया पाहून येणारे-जाणारे सर्वच अचंबित होत असल्याचे पाहायला मिळत आहे. याशिवाय कृषी वैज्ञानिकांनी वांग्याच्या झाडावर भोपळ्याचे उत्पादन घेण्याचे देखील यशस्वी संशोधन केले आहे.

काय आहे ‘हे’ तंत्रज्ञान? (AI Technology In Farming)

शेतीमध्ये सुरूवातीला बटाटा लावला जातो. त्यानंतर बटाटा वीस दिवसांचा झाला की, त्याच्यावर संकरित टोमॅटोचे झाड कलम केले जाते. हे झाड 30-40 दिवस नर्सरीमध्ये ठेवले जाते. त्यानंतर हे शेतात लावण्यायोग्य होते. या पद्धतीने 700 ग्रॅम ते दीड किलोपर्यंत वजनाचे बटाट्याचे पीक घेता येते. त्याच सोबतीला टोमॅटोचे प्रति झाड 5 ते 6 किलोपर्यंत उत्पादन घेता येते. विशेष म्हणजे या पिकाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाच्या मदतीने वातावरणानुरूप खते, पाणी आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये दिली जातात.

उत्पादन वाढीसाठी मदत

शेतीमध्ये हळूहळू आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाचा (AI Technology) वापर वाढत असून, त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा देखील होत आहे. याच एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात या टोमॅटोच्या झाडाला बटाटे आल्याची किमया घडली आहे. त्यामुळे आता भविष्यात शेतकऱ्यांच्या शेतामध्येही एकाच झाडाला टोमॅटो आणि बटाटे आल्यास नवल वाटायला नको. अल्प-भूधारक शेतकऱ्यांना कमी जागेमध्ये आणि कमी पाण्यामध्ये पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा मोठा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!