Amul Dairy : अमूलच्या कमाईत यंदा 9 टक्के वाढ; दूध उत्पादकांना 525 कोटींचा बोनस देणार!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात शेतीसोबतच (Amul Dairy) अनेक शेतकरी एक किंवा दोन गाय/म्हैस पाळून, दूध उत्पादनाच्या माध्यमातून उदरनिर्वाह करत आहे. तर अनेक शेतकऱ्यांनी गायींची संख्या वाढवत, आपला दुग्ध व्यवसाय विस्तारला आहे. देशातील आघाडीचा दूध उत्पादक संघ असलेल्या अमूलसोबत राज्यातील अनेक शेतकरी जोडले गेले आहेत. अमूल या दूध उत्पादक संघाचा टर्नओव्हर 2023-24 या गेल्या आर्थिक वर्षात विक्रमी 12,880 कोटींपर्यंत पोहचला आहे. अमूलकडून याबाबतची आकडेवारी जाहीर करण्यात आली असून, यावर्षी आपल्या टर्नओव्हरमधील 525 कोटींची रक्कम दूध उत्पादक शेतकऱ्यांना बोनस म्हणून दिली जाणार असल्याचे अमूलने (Amul Dairy) म्हटले आहे.

कमाईत वार्षिक 9 टक्के वाढ (Amul Dairy Turnover 2023-24)

अमूलच्या स्थापनेनंतर आतापर्यंतच्या इतिहासात हा सर्वाधिक टर्नओव्हर आहे. 2022-23 या मागील वर्षीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2023-24 या चालू आर्थिक वर्षात अमूलच्या एकूण कमाईमध्ये 9 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. याबाबत अमूल डेअरीचे अध्यक्ष विपुलभाई पटेल यांनी सर्व सदस्य, दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष, सचिव, व्यवस्थापक, संघासाठी शेवटच्या पातळीवर काम करणाऱ्यांसह दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आभार व्यक्त केले आहे. याशिवाय दूध उत्पादनात आधुनिकता, गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि शेतकऱ्यांच्या साथ या जोरावरच अमूलला हे यश मिळवता आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पुण्यात लवकरच अमूलचा प्लांट

अमूल डेअरीचे (Amul Dairy) अध्यक्ष विपुलभाई पटेल यांनी म्हटले आहे की, अमूल दूध विक्रीसोबतच आपल्या अनेक दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीसाठी काम करतो. याशिवाय महाराष्ट्राबाबत बोलताना त्यांनी म्हटले आहे की, लवकरच अमूलकडून महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आधुनिक प्लांट उभारण्याची संघाची योजना आहे. याशिवाय आंध्रप्रदेशातील चिंतुर या ठिकाणी देखील एक प्लांट उभारला जाणार आहे.

अमूलची आजपर्यंतची वाटचाल

1946 मध्ये आणंद सहकारी दुग्ध उत्पादक संघ अर्थात अमूलची स्थापना झाली. अमूल हा दूध उत्पादक संघ गुजरात को-ऑपरेटिव मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडच्या (जीसीएमएमएफ) अखत्यारीत येतो. अमूलमुळे भारताला जागतिक पातळीवर सर्वात मोठा दूध उत्पादक देश म्हणून ओळख निर्माण करण्यात यश मिळाले आहे. आज देशभरात अमूलसोबत 15 दशलक्षहुन अधिक दूध उत्पादक जोडले गेले असून, देशात अमूलच्या 1,44,500 समित्या दूध गोळा करतात. हे सर्व दूध देशातील 184 जिल्हा केंद्रांमध्ये संकलित केले जाते. ज्यामुळे अमूल हा लाखो शेतकऱ्यांसोबत थेट जोडला गेला आहे.

error: Content is protected !!