हॅलो कृषी ऑनलाईन: या वर्षी उन्हाळी हंगाम (Animal Care During Summer Season) लवकर सुरू होत असल्याचे हवामान विभागाचे अंदाज आहे. त्यातच पाणी आणि चारा टंचाई यासारख्या समस्यांमुळे उन्हाळ्यात जनावरांसाठी योग्य नियोजन करणे गरजेचे असणार आहे. वाढत्या उन्हामुळे जनावरे भरपूर पाणी पितात. अंगाची लाही लाही झाल्याने कोरडा चारा खात नाहीत. जनावरांच्या हालचाली मंदावतात. तसेच जनावरे सावलीकडे धाव घेऊन सावलीत स्थिरावतात. जनावरांच्या शरीराचे तापमान वाढते, जोरात श्वास घेणे, भरपूर घाम येणे, अशी लक्षणे दिसू लागतात. दुभत्या जनावरांची उत्पादन क्षमता कमी होते. प्रजनन क्षमता आणि रोगप्रतिकारक शक्तीदेखील कमी होते. यासाठी जनावरांचा आहार आणि पाणी नियोजन, गोठ्याचे व्यवस्थापन, रोग प्रतिबंधक लसीकरण याविषयी योग्य ती काळजी घेणे गरजेचे असणार आहे (Animal Care During Summer Season).
उन्हाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापन (Animal management in summer)
- उन्हाळ्याच्या दिवसांत जनावरांना शक्यतो सकाळी व संध्याकाळी उन्ह कमी असताना चरण्यास सोडावे.
- हवामानपूरक सुधारित गोठे बांधावेत. गोठ्याची उंची जास्त असावी जेणेकरून गोठ्यात हवा खेळती राहील.
- छपराला शक्यतो पांढरा चुना अथवा रंग लावावा. तसेच त्यावर पालापाचोळा, तुराट्या, पाचट टाकावे. यामुळे सूर्याची किरणे परावर्तित होऊन गोठा थंड राहील.
- परिसर थंड राहण्यासाठी गोठ्याच्या सभोवताली झाडे लावावीत. मुक्तसंचार गोठ्याचा अवलंब करावा.
- गोठ्यामध्ये वातावरण थंड राहण्यासाठी पाण्याचे फवारे, स्प्रिंकलर्स यासोबत पंख्याचा वापर करावा.
- जनावरांना दिवसातून किमान एकदा तरी खरारा करावा. त्यामुळे जनावरास थोडे तरतरीत वाटते व अंगावरील गोचीड व मरकट केस गळून पडतात.
- दुपारच्या वेळेस गोठ्याच्या भोवती बारदाणे, शेडनेट लावावेत व शक्य असल्यास त्यांना पाण्याने भिजवावे, जेणेकरून उष्ण हवा गोठ्यात येणार नाही व आतील वातावरण थंड राहील (Animal Care During Summer Season).
- जनावरांना मुबलक प्रमाणात थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करावे.
- जनावरांना जास्त चावावा लागणारा चारा हा सकाळ किंवा सायंकाळी, म्हणजे ज्यावेळी उन्हाचा तडाखा असेल अशा वेळेस देऊ नये. कारण असा चारा चावण्यासाठी जनावराच्या शरीरात अतिरिक्त उष्णता तयार होते.
- जनावरांना दिवसभरात लागणारा चारा एकाच वेळी देण्याऐवजी समान विभागणी करून तीन ते चार वेळेस द्यावा
- वाळलेल्या गवतावर किंवा कडब्यावर मिठाचे किंवा गुळाचे पाणी शिंपडावे म्हणजे जनावरे आवडीने चारा खातात.
- चाऱ्याची कमतरता असल्यास खाद्यामध्ये कडुनिंब, अंजन, वड, पिंपळ, शेवरी इत्यादी झाडांची ओली पाने, हरभरा, भुईमुगाची टरफले, गव्हाचा भुस्सा, उसाचे वाढे यांचा योग्य प्रमाणात वापर करावा.
- माजावर असलेल्या गाई, म्हशींना सकाळी, सायंकाळी कृत्रिम रेतन करावे.
- दूध देणार्या जनावरास दोन्ही वेळी दूध काढण्यापूर्वी थंड पाण्याने धुतल्यास त्यावरील शारीरिक ताण हा कमी होतो. दूध उत्पादनात वाढ होते.
- जनावरांना वेळोवेळी जंतनाशक औषधे पाजावी.
- जनावरांचे नियमितपणे लाळखुरकुत, घटसर्प, फऱ्या, पीपीआर, आंत्रविषार इत्यादी रोगप्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे (Animal Care During Summer Season).