Animal Feed : पशुधनाच्या चाऱ्यासाठी शेवगा उत्तम पर्याय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Animal Feed : शेवगा ही जगातील अतिशय उपयुक्त वनस्पती आहे. ही वनस्पती जलद वाढणारी आहे. उष्णकटिबंधीय प्रदेशात मानवी अन्न, पशुधनाचा चारा, औषधी उपयोग, जलशुद्धीकरण आणि रंगद्रव्ये इत्यादी करिता या वनस्पतीची लागवड करण्यात येते. शेवग्याचे हे सर्व उपयोग लक्षात घेता, शेवग्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. शेवग्याची पाने ही पशुधनासाठी उत्तम प्रकारचा चारा आहे.

शेवग्याचे पोषणमूल्य

शेवग्याची लागवड कोरडवाहू क्षेत्रातही करता येते. या वनस्पतीत टँनिन, ट्रायपीसीन आणि अमायलेज या घटकांचे प्रमाण अतिशय कमी असते. शेवगा या वनस्पतीचे उत्पादन (शुष्क) 24 टन प्रति हेक्टर, प्रति वर्ष मिळते. या वनस्पतीतील प्रथिनांचे प्रमाण 19.3 ते 26.4 टक्के असते. शेवग्याच्या ताज्या पानांचा विविध पशुधनाच्या आहारामध्ये समावेश करता येतो. पशुधनास शेवग्याची पाने खाऊ घातल्याने मेंढ्यांच्या वजनामध्ये वाढ, दुध उत्पादनात वाढ आणि शेळ्यांच्या पचनशक्तीमध्ये सुधारणा आढळून आलेली आहे. शेवग्याची पाने वाळवून सुद्धा पशुधनास खाऊ घालता येऊ शकतात. शेवग्याच्या पानामध्ये सर्वसाधारणपणे 21.8 टक्के प्रथिने, 22.8 टक्के तंतुमय पदार्थ, 4.12 टक्क स्निग्ध पदार्थ, 21.12 टक्के कर्बोदके आढळून येतात.

शेवगा वनस्पतीमध्ये चांगल्याप्रकारे रोगप्रतिकारक शक्ती असते. तथापि, खूप दाटीने लागवड केल्यास, रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. असिफिड्स, पांढरी माशी, पाने खाणारी अळी या किटकांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. कडूनिंबाच्या बियापासून तयार केलेल्या अर्काची फवारणी केल्यास या किटकांचा प्रादुर्भाव आटोक्यात येतो.

पशुधनाच्या चाऱ्यासाठी चांगला पर्याय – (Animal Feed)

शेवगा ही वनस्पती पशुधनाच्या चाऱ्यासाठी (Animal Feed) चांगला पर्याय आहे. शेवगा या वनस्पतीची बियापासून व कलमापासून लागवड करता येते. या वनस्पतीला तुलनात्मकदृष्ट्या पाण्याची व मूलद्रव्यांची गरज कमी असते. या वनस्पतीपासून चांगल्या प्रमाणात व उत्तम गुणवत्तेचा चारा उपलब्ध होतो. कमी पर्जन्यकाळात शेवगा या वनस्पतीपासून मिळणारा चारा पशुधनाची गरज भागवू शकतो. शेवगा या वनस्पतीची लागवड बांधावर आंतरपीक म्हणून, उष्णप्रदेशात व कमी पर्जन्यमानात करता येऊ शकते. त्यामुळे शेवगा ही वनस्पती पशुधनाच्या चाऱ्यासाठी (Animal Feed) उत्तम पर्याय आहे.

खत व्यवस्थापन

शेवगा या वनस्पतीपासून जास्तीत जास्त उत्पन्नासाठी चांगल्या प्रकारे कुजलेले शेणखत शेतात पसरणे आवश्यक आहे. 10 ते 15 मे. टन शेणखत प्रतिहेक्टरी देण्यात यावे. शेवगा या वनस्पतीची उंची अडीच फूट (75 सें.मी.) झाल्यानंतर, प्रत्येक रोपास 100 ग्रॅम युरिया, 100 ग्रॅम सुपर फॉस्फेट आणि 50 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश देण्यात यावे.

कापणी कधी करावी

शेवग्याच्या पानाची कापणी ही वनस्पतीची सर्वसाधारण उंची 1.5 ते 2 मीटर (लागवडीनंतर 60 ते 90 दिवस) झाल्यानंतर करण्यात यावी. कापणी करीत असताना जमिनीपासून 20 ते 45 सें.मी. उंचीवर कापणी करावी. त्यामुळे नवीन अंकूर फुटण्यासा वाव मिळतो. त्यानंतरची कापणी प्रत्येकी 35 ते 40 दिवसांनी घेण्यात यावी. शेवगा या वनस्पतीची आंतरपीक म्हणून लागवड केल्यास, 2 ते 4 महिन्याच्या अंतराने कापणी करावी. अशावेळी कापणी करताना, दुसऱ्या आंतरपीकावर शेवगा या वनस्पतीच्या सावलीचा विपरीत परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी.

सुधारित जाती

तमिळनाडू कृषि विद्यापीठ, कोईमतूर या संस्थेने केलेल्या शेवगा या वनस्पतीच्या सीओ-1 आणि पीकेएम या सुधारीत जाती आहेत. याशिवाय जाफना मोरिंगा, चिंवचेरी मोरिंगा, चोमोरिंगा, याजपणाम मोरिंगा, पानमोरिंगा आणि धनराज या जाती आहेत.

error: Content is protected !!