हॅलो कृषी ऑनलाईन : देशाच्या अनेक भागांमध्ये आपल्याला निरनिराळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी आणि पशु (Animals Breeds) पाहायला मिळतात. शेतकरी या प्राणी आणि पशूंच्या माध्यमातून व्यवसाय करत चांगला नफा कमावत असतात. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पशु आनुवंशिक संसाधन ब्यूरो या संस्थेने नव्याने आठ देशी पशूंची नोंद केली आहे. यामध्ये महाराष्ट्रात आढळणाऱ्या भीमथडी घोड्याचा देखील समावेश करण्यात आला आहे. उर्वरित सात पशूंमध्ये अंजोरी आणि अंदमानी अशा दोन शेळ्यांचा, अंदमानी डुक्कर, अरावली कोंबडी, माचेर्ला मेंढी आणि उत्तरप्रदेश-उत्तराखंडमध्ये आढळणाऱ्या फ्राइजवाल या हायब्रीड जातीच्या गायीचा (Animals Breeds) समावेश करण्यात आला आहे
केंद्र सरकारच्या भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या अखत्यारीत राहून राष्ट्रीय पशु आनुवंशिक संसाधन ब्यूरो (Animals Breeds) ही संस्था काम करते. या संस्थेकडून देशातील स्वदेशी प्राणी, पशु, पक्षी यांची नोंद ठेवली जाते. सध्या संस्थेंकडे जवळपास 220 देशी प्रजातीच्या प्राणी पक्षांची नोंद आहे. यामध्ये 53 देशी गायी, 20 म्हशींच्या जाती, 39 शेळ्यांच्या जाती, 45 मेंढयांच्या जाती, 8 घोड्यांच्या जाती, 9 उंटांच्या जाती, 3 गाढवांच्या जाती, 3 कुत्र्यांच्या जाती, 1 याक गायीची जात, 20 देशी कोंबड्यांच्या जाती, 3 बदक जाती, हंस पक्षाची एक जात आणि हायब्रीड जातीच्या एका गायीची नोंद संस्थेकडून आतापर्यंत अधिकृतरित्या करण्यात आली आहे.
नोंद झालेले आठ प्राणी व पशु (Animals Breeds Newly Registers Species)
#ICAR-NBARG, Karnal, registered 8 new indigenous
breeds. Andamani goat, Andamani pig, Andamani duck Bhimthadi horse, Anjori goat, Macherla sheep, Aravali chicken; and synthetic cattle breed Frieswal
👉https://t.co/YcoKRHbpYa@MundaArjun @PRupala @AgriGoI @Dept_of_AHD pic.twitter.com/i7e1ad6gVY— Indian Council of Agricultural Research. (@icarindia) January 19, 2024
भीमथडी घोडा
महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सातारा आणि अहमदनगर जिल्ह्यात हा भीमथडी घोडा आढळतो. या जातीच्या घोड्याची सरासरी उंची सुमारे 130 सेमी इतकी तर घोडीची उंची ही 128 सेमी इतकी असते. या घोड्याचा रंग डार्क चॉकलेटी असतो. तसेच त्याचा उपयोग प्रामुख्याने धनगर समाजाकडून प्रवासादरम्यान घरगुती सामानाच्या वाहतुकीसाठी केला जातो. या घोड्याचे सरासरी वजन हे 267 किलो असते.
फ्राइजवाल हायब्रीड गाय
फ्राइजवाल ही गायीची जात 37.5 टक्के साहिवाल गोवंश आणि 62.5 टक्के होल्स्टीन फ़्रीशियन गोवंश यांच्या एकत्रित प्रमाणातून तयार झाली आहे. या गायीची निर्मिती मेरठ येथील केंद्रीय गोवंश संशोधन संस्थेकडून करण्यात आली आहे. ही गाय साधारणपणे वार्षिक 7000 किलो दूध देण्यासाठी सक्षम आहे. संस्थेकडून या गायीची निर्मिती देशातील हवामानाअनुरूप करण्यात आली आहे. देशात सध्या 53 देशी गायींची नोंद केंद्र सरकारकडे आहे. फ्राइजवाल हायब्रीड गाय ही हायब्रीड प्रजातीची नोंद झालेली पहिलीच गाय ठरली आहे.
अंजोरी शेळी
अंजोरी शेळी ही मांस उत्पादनासाठी पाळली जाणारी, मध्यम आकाराची शेळी आहे. ही जात प्रामुख्याने छत्तीसगड राज्यातील रायपूर, दुर्ग, राजनांदगाव, कांकेर, धमतरी, महासमुंद जिल्ह्यांमध्ये आढळते. ही शेळी तपकिरी रंगाची असते. पूर्ण वाढ झालेल्या या शेळीच्या बोकडाचे वजन हे सरासरी 35 किलो तर शेळीचे वजन 28 किलो असते. ही शेळी एका प्रजनन काळात 26 किलो इतके दूध देते.
अंदमानी शेळी
अंदमानी शेळी ही एक मध्यम आकाराची, मांस उत्पादनासाठी पाळली जाणारी शेळीची जात आहे. जी प्रामुख्याने मध्य आणि उत्तर अंदमान बेटांवर आढळते. शेळीची ही जात उष्णकटिबंधीय वातावरणात योग्य वाढते. या जातीच्या पूर्ण वाढलेल्या बोकडाचे वजन सरासरी 29 किलो तर शेळीचे वजन 26 किलो इतके असते. ही शेळी आपल्या एका प्रजनन काळात सरासरी 29 किलो दूध देते.
माचेर्ला मेंढी
माचेर्ला मेंढी ही एक मांस उत्पादनासाठी पाळली जाणारी मेंढीची जात आहे. जी आंध्र प्रदेशातील गुंटूर, कृष्णा आणि प्रकाशम जिल्ह्यांमध्ये तसेच तेलंगणातील नगराम, कुरनूल जिल्ह्यांतील पदरा आणि अमराबाद मंडळांमध्ये आढळते. ती साधारणपणे मध्यम ते मोठ्या आकाराची असते. तिचा रंग हा प्रामुख्याने पांढरा असतो आणि शरीरावर आणि पायांवर मोठे काळे किंवा तपकिरी डाग असतात. या जातीच्या पूर्ण वाढलेल्या नर मेंढीचे वजन सरासरी 43 किलो तर मादी मेंढीचे वजन 35 किलो इतके असते.
अरावली कोंबडी
अरवली कोंबडी ही अंडी आणि मांस दोन्हींच्या उत्पादनासाठी पाळली जाणारी कोंबडीची जात आहे. जी गुजरात राज्यातील बनासकांठा, साबरकांठा, अरवली आणि महिसागर जिल्ह्यात आढळते. या जातीचे पक्षी उष्णता सहनशीलता असतात. ज्यामुळे त्यांची अंडी उबवण्याची क्षमता देखील चांगली असते. या जातीच्या पूर्णपणे वाढलेल्या कोंबड्याचे वजन 1990 ग्रॅम तर कोंबडीचे वजन हे 1618 ग्रॅम इतके असते. या जातीची कोंबडी वार्षिक सरासरी 72 अंडी देते.
अंदमानी बदक
अंदमानी बदक ही अंडी आणि मांस दोन्हीच्या उत्पादनासाठी पाळली जाणारी बदकाची जात आहे. जी प्रामुख्याने उत्तर आणि मध्य अंदमानच्या निंबुडेरा ते दिगलीपूर भागात आढळते. या जातीच्या नर आणि मादी दोघांचेही संपूर्ण शरीर काळ्या पिसांनी झाकलेले असते. मानेखालील भागात पांढरे चिन्ह पोटापर्यंत पसरलेले असते. या जातीच्या नर बदकाचे सरासरी वजन 1406 ग्रॅम तर मादी बदकाचे वजन 1265 ग्रॅम असते. एक मादी साधारपणे वार्षिक 266 अंडी देते.
अंदमानी डुक्कर
अंदमान डुक्कर ही अंदमान बेटांवर आढळणारी डुकराची जात आहे. जी मध्यम आकार, काळ्या (बहुतेक) किंवा गंजलेलया तपकिरी रंगाची असते. या जातीचा डुक्कर हा धावण्यात तरबेज असतो. या डुकराचे पालन प्रामुख्याने मांस उत्पादनासाठी केले जाते. नर डुकराचे सरासरी वजन हे 71 किलो तर मादी डुकराचे वजन हे 68 किलो असते.