हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. द्राक्षपंढरी नाशिक जिल्ह्यातील ‘सह्याद्री फार्म्स’च्या ‘आरा’ (Arra Grapes) या नवीन रंगीत द्राक्ष वाणाला यावर्षी सर्वाधिक 260 रुपये प्रति किलोचा दर मिळाला आहे. सह्याद्री फार्म्स’च्या पुढाकारातून या रंगीत वाणाची निर्मिती करण्यात आली असून, चवीला गोड आणि खायला कुरकुरीत असलेल्या या द्राक्षांना ग्राहकांमधून व खरेदीदारांकडून मोठी मागणी होत आहे. ‘सह्याद्री फार्म्स’कडून कंपनीचे संचालक कैलास माळोदे (रवळगाव, ता.जि. नाशिक) यांच्या शेतात ‘आरा’ या रंगीत द्राक्ष वाण (Arra Grapes) पाहणी व विक्रीचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ऑनलाईन लिलाव पद्धतीने उपस्थित व्यापाऱ्यांकडून त्यांचा वाणाला हा दर मिळाला आहे.
ऑनलाईन लिलाव (Arra Grapes 260 Rupees Kg)
ऑनलाइन द्राक्ष लिलावात शेतकरी कैलास माळोदे यांच्या ‘आरा’ रंगीत द्राक्षांच्या (Arra Grapes) 4.8 किलोच्या एका बॉक्सला 1250 रुपये, अर्थात प्रती किलोस 260 रुपये दर मिळाला आहे. या ऑनलाईन आरा वाणाच्या नवीन द्राक्ष खरेदीसाठी लुधियाणा, मुंबई, काठमांडू, सिलिगुडी, गुवाहाटी, कोलकाता, अहमदाबाद येथील खरेदीदार व्यापाऱ्यांना आधीच माहिती देण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी ऑनलाईन खरेदीला उपस्थित राहत हा लिलाव केला आहे. देशातील द्राक्ष शेतीच्या इतिहासात प्रथमच अशा पद्धतीने ऑनलाईन द्राक्ष लिलाव व्हिडीओ कॉन्फरन्स कॉलद्वारे करण्यात आला आहे. असे ‘सह्याद्री फार्म्स’ शेतकरी उत्पादक कंपनीने म्हटले आहे.
किती द्राक्षाची विक्री
थेट शेतातून विक्री करण्यात आलेल्या या ऑनलाईन द्राक्ष लिलावात, ‘सह्याद्री फार्म्स’ या शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक कैलास माळोदे यांच्या शेतातून अवघ्या 2 तासांमध्ये 2 टनांहून अधिक आरा द्राक्षाची खरेदी व्यापाऱ्यांनी केली. तर 336 किलो द्राक्षांची खरेदी नाशिक जिल्ह्यातील ग्राहकांनी केली आहे. त्यामुळे आता आगामी काळात या ऑनलाईन लिलाव व ऑनलाईन द्राक्ष खरेदी-विक्री पद्धतीवर अधिक भर देणार असल्याचे कैलास माळोदे यांनी म्हटले आहे.
पुढील विक्री 26 जानेवारीला
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ‘सह्याद्री फार्म्स’चे शेतकरी भास्कर कांबळे यांच्या द्राक्ष प्लॉटवर पुढील लिलाव 26 जानेवारीला ठेवण्यात आला आहे. या लिलावात कांबळे यांच्या आरा वाणाची विक्री होणार आहे. शेतकऱ्यांना द्राक्ष विक्रीसाठी मुख्य समस्या ही व्यापारी न मिळणे ही असते. मात्र आता हा ऑनलाईन लिलाव पद्धतीचा पायंडा समोर येत असल्याने, त्याचा शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होणार आहे.