हॅलो कृषी ऑनलाईन : अयोध्येत श्रीराम चंद्राच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा असल्याने, आज राज्यातील अनेक बाजार (Bajar Bhav News) समित्या बंद होत्या. काही बाजार समित्यांमध्ये सकाळच्या सत्रात लिलाव सुरु होते. परिणामी, आज बाजार समित्यांमध्ये कांदा, सोयाबीन, कापूस, तूर या प्रमुख पिकांची व्यापाऱ्यांकडून नेहमीपेक्षा अल्प दरानेच खरेदी झाल्याचे पाहायला मिळाले. कांद्याला आज सरासरी 800 ते 1500 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. जो नेहमीपेक्षा खूपच कमी असल्याचे पाहायला मिळाले. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची कमी भावात (Bajar Bhav News) लूट करण्यात आल्याने, शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली.
आजचे कांदा-सोयाबीन बाजारभाव (Bajar Bhav News Today 22 Jan 2024)
आज नाशिक जिल्ह्यातील विंचूर या एकमेव बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरु होते. त्या ठिकाणी कांद्याची 7380 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1400 ते किमान 400 तर सरासरी 1300 रुपये प्रति क्विंटल, पुणे बाजार समितीत आज कांद्याची 11435 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1700 ते किमान 500 तर सरासरी 1100 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. तर विंचुर बाजार समितीत आज सोयाबीनच्या दरात 50 रुपये प्रति क्विंटलची घसरण नोंदवली गेली. शनिवारी बाजार समितीत सोयाबीनला कमाल 4625 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. जो आज 4571 प्रति क्विंटलपर्यंत खाली आला. अगदी याच पद्धतीने राहता बाजार समितीत आज सोयाबीन दरात 100 रुपये प्रति क्विंटलने घसरण झाली आहे. शनिवारी कमाल 4641 रुपये प्रति क्विंटल असलेला सोयाबीनचा दर आज कमाल 4550 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरलेला पाहायला मिळाला.
आजचे कापूस-तूर बाजारभाव
आज राज्यातील एकाही बाजार समितीने शेतकऱ्यांचा कापूस 7020 रुपये प्रति क्विंटल या हमीभावाच्या वरती खरेदी (Bajar Bhav News) केलेला नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, नागपूर जिल्ह्यातील भिवापूर आणि बीड जिल्ह्यातील वडवणी बाजार समितीत कापसाला कमाल 6870 ते 6910 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास दर मिळाला आहे. लातूर जिल्ह्यातील जळकोट या एकमेव बाजार समितीत आज तुरीचा लिलाव झाला असून, त्या ठिकाणी 516 क्विंटल इतकी तुरीची आवक झाली. तर तुरीला बाजार समितीत कमाल 9925 ते किमान 9451 तर सरासरी 9731 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे.
अनेक बाजार समित्या बंद
आज नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, येवला, पिंपळगाव बसवंत आदी प्रमुख कांद्याच्या बाजार समित्या बंद होत्या. जिल्ह्यातील विंचूर बाजार समिती सुरु असल्याने शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी कांदा विक्रीसाठी आणला होता, मात्र व्यापाऱ्यांची कमी संख्या आणि माल अधिक या सूत्रामुळे उपलब्ध व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या कांद्याची लयलूट केली. तर सोयाबीन, कापूस, तूर या प्रमुख पिकांबाबतही त्या-त्या बाजार समित्यांमध्ये असाच काहीसा प्रकार दिसून आला.