Banana Export : बारामतीची केळी निघाली नेदरलँडला; पहिला कंटेनर रवाना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : ‘आयएनआय फर्म्स’ या कंपनीने आपल्या ‘किमाये ब्रँड’अंतर्गत केळीचा (Banana Export) पहिला कंटेनर नेदरलँडला पाठवला आहे. त्यामुळे आता भारतीय केळी निर्यातीसाठी (Banana Export) आंतरराष्ट्रीय बाजारात नवीन संधी उपलध होणार आहेत. कृषी व अन्न प्रक्रियाकृत उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणा’चे (अपीडा) अध्यक्ष अभिषेक देव यांच्या हस्ते बारामती येथून या केळीच्या कंटेनर हिरवा झेंडा दाखवण्यात आला. पुढे मुंबई येथील जेएनपीटी बंदरावरून समुद्रमार्गे ही केळी नेदरलँडला पाठवली जाणार आहे.

एपीडाच्या माध्यमातून अमेरिकेतील आघाडीची अन्नप्रक्रिया व वितरण कंपनी असलेल्या ‘डेल मोंटे फूड्स’ आणि ‘आयएनआय फर्म्स’ यांच्यात केळी निर्यातीसाठी सामंजस्य करार झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा पहिला कंटेनर नेदरलँडला पाठविण्यात आला आहे. डेल मोंटे फूड्स ही कंपनी भारतातून पाठवलेल्या केळीची युरोपात विक्री करणार आहे. त्यामुळे आता देशातील केळी निर्यातीसाठी एक समृद्ध बाजारपेठ मिळाली असून, याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

केवळ एक टक्के निर्यात

सर्वात मोठा केळी उत्पादक देश असूनही जगातील केळी निर्यातीत भारताचा वाटा केवळ एक टक्के इतका आहे. जगात होणाऱ्या तीन कोटी ५३ लाख टन केळी उत्पादनात भारताचा वाटा 26.45 टक्के इतका आहे. मागील आर्थिक वर्षात (२०२२-२३) देशातून १७.६ कोटी डॉलरची केळी निर्यात करण्यात आली. मात्र या करारामुळे आगामी ५ वर्षात भारताला युरोपीय बाजारपेठेतून जवळपास एक अरब डॉलरच्या केळी निर्यातीची संधी मिळाली आहे. देशातील २५ हजारांहून अधिक केळी उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

या देशांना होते केळी निर्यात- (Banana Export)

भारतीय केळी ही प्रामुख्याने इराण, इराक, संयुक्त अरब अमिराती, ओमान, उज्बेकिस्तान, सौदी अरेबिया, कतार, कुवैत, बहरीन, अफगाणिस्तान आणि मालदीव या देशांमध्ये पाठवली जातात. मात्र आता अमेरिका, रशिया, जपान, जर्मनी, चीन, नेदरलँड, ब्रिटन आणि फ्रांस या देशांमध्ये केळी निर्यातीसाठी मोठी संधी उपलब्ध झाली असल्याचे अपीडाने म्हटले आहे. चालू आर्थिक वर्षात केळीची निर्यात 30.3 कोटी डॉलर इतकी होण्याची शक्यता आहे.

सर्वाधिक केळी उत्पादक राज्य कोणते

आंध्रप्रदेश हे भारतातील सर्वात मोठे केळी उत्पादक राज्य असून, त्यांनतर महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तरप्रदेश या राज्यांचा क्रमांक लागतो. देशातील एकूण उत्पादनापैकी या पाच राज्यांमध्ये केळीचे ६७ उत्पादन होते. गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, छत्तीसगड, ओडिसा, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये उर्वरित केळी उत्पादन होते.

error: Content is protected !!