हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील जळगाव जिल्हा केळी उत्पादनासाठी (Banana Farming) विशेष प्रसिद्ध आहे. जळगावच्या केळीला भौगोलिक मानांकन (जीआय टॅग) देखील मिळाले आहे. मात्र, सध्या राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांकडून केळीची लागवड केली जाते. त्यातून त्यांना अपेक्षित उत्पन्न देखील मिळत आहे. विशेष म्हणजे युरोपीय देशांमध्ये भारतीय केळीला मोठी मागणी असते. याशिवाय देशांतर्गत बाजारात देखील केळीला बाराही महिने मोठी मागणी असते. मात्र, तुम्हांला देशातील प्रमुख पाच केळी उत्पादक राज्य माहितीयेत का? जी सर्वाधिक केळीचे उत्पादन (Banana Farming) करतात. आज आपण सर्वाधिक पाच केली उत्पादक राज्यांबद्दल जाणून घेणार आहोत…
महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर (Banana Farming In India)
राष्ट्रीय फळबाग महामंडळाच्या आकडेवारीनुसार, देशात सर्वाधिक केळी उत्पादन हे आंध्रप्रदेश या राज्यात होते. आंध्रप्रदेशातील शेतकरी दरवर्षी विक्रमी केळीचे उत्पादन (Banana Farming) घेतात. ज्यामुळे देशातील एकूण उत्पादनापैकी आंध्रप्रदेशचा वाटा 17.99 टक्के इतका आहे. केळीच्या उत्पादनात देशात महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक आहे. महाराष्ट्रातील शेतकरी देशातील एकूण केळी उत्पादनापैकी 14.26 टक्के उत्पादन घेतात. तिसऱ्या क्रमांकावर गुजरात हे राज्य असून, त्या ठिकाणी देशातील एकूण केळी उत्पादनापैकी 12.04 टक्के केळी उत्पादन होते.
70 टक्के उत्पादन पाच राज्यांमध्ये
याशिवाय तामिळनाडू हे राज्य केळी उत्पादनात चौथ्या स्थानावर असून, त्या ठिकाणी एकूण 12 टक्के केळी उत्पादन होते. तर पाचव्या क्रमांकावर कर्नाटक राज्य असून, त्या ठिकाणचे शेतकरी देशातील एकूण उत्पादनापैकी 11.44 टक्के केळीचे उत्पादन घेतात. अर्थात देशातील पहिल्या पाच राज्यांमध्येच देशातील एकूच केळीच्या उत्पादनापैकी 70 टक्के उत्पादन नोंदवले जाते.
केळीचे विशेष गुणधर्म
दरम्यान, केळीमध्ये कार्बोहायड्रेट आणि व्हिट्यामिनचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. याशिवाय नियमित केळीच्या सेवनाने हृदयविकाराचा धोका देखील कमी संभवतो. त्यामुळे केळी आरोग्यास फायदेशीर मानली जाते. याशिवाय केळी सांधेवात आणि किडनीच्या आजारांवर देखील खूप फायदेशीर आहे. केळीमध्ये असणाऱ्या पोषक तत्त्वांमुळे आणि त्यात असलेल्या गुणधर्मांमुळे त्यास बाजारात नेहमीच मोठी मागणी असते. ज्यामुळे केळीच्या उत्पादनातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो.