Bedana Bajar Bhav : पिंपळगाव मार्केटला नवीन बेदाणा दाखल; पहा… मुहूर्ताचा दर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील नाशिक आणि सांगली हे दोन जिल्हे द्राक्ष उत्पादनासाठी (Bedana Bajar Bhav) विशेष प्रसिद्ध आहेत. या दोनही जिल्ह्यात सध्या द्राक्ष काढणी हंगाम जोरात सुरु आहे. मागील आठवड्यात सांगली व तासगाव बाजार समितीत चालू हंगामातील नवीन बेदाणा दाखल झाला होता. त्यानंतर आता नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बाजार समितीत देखील आज नवीन हंगामातील बेदाणा दाखल झाला असून, आजच्या मुहूर्ताच्या बेदाण्यास सरासरी १७० रुपये प्रति किलोचा दर मिळाला आहे. निफाडचे आमदार व बाजार समिती सभापती दिलीप बनकर यांच्या हस्ते नवीन बेदाणा विक्रीचा (Bedana Bajar Bhav) शुभारंभ करण्यात आला.

तासगावमध्ये 120 रुपये दर (Bedana Bajar Bhav Today 3 Feb 2024)

आज पिंपळगाव बाजार समिती आवारात झालेल्या नवीन बेदाणा विक्रीचा लिलाव (Bedana Bajar Bhav) कमाल 355 ते किमान 100 रुपये तर सरासरी 170 रुपये किलो असा दर मिळाला आहे. मागील आठवड्यात सांगली जिल्ह्यातील तासगाव बाजार नवीन बेदाण्याला मुहूर्ताच्या विक्रीस सरासरी 150 ते 170 रुपये प्रति किलोचा दर मिळाला होता. त्यामुळे आता चालू फेब्रुवारी महिन्यात दोन्ही जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बेदाण्याची आवक होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. आज तासगाव बाजार समितीत बेदाण्याला सरासरी 120 रुपये प्रति किलोचा दर मिळाला आहे.

अवकाळी पावसाचा फटका

दरम्यान, नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नाशिक व सांगली या दोन्ही जिल्हयातील द्राक्ष पिकाला मोठा फटका बसला होता. ज्यामुळे सध्या बाजार दाखल होत असलेल्या नवीन बेदाण्याच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे. बेदाणा व्यापारातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार, यावर्षी द्राक्ष पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसल्याने बेदाणा उत्पादन हे मागील वर्षीच्या तुलनेत कमी राहण्याची शक्यता आहे.

उत्पादनात घट होणार

उपलब्ध आकडेवारीनुसार, वर्ष 2021 मध्ये महाराष्ट्रातील बेदाणा उत्पादन 14 ते 15 हजार गाडी (प्रति गाडी 10 टन) इतके नोंदवले गेले होते. 2022 मध्ये बेदाणा उत्पादन 18 ते 20 हजार गाडी इतके नोंदवले गेले होते. 2023 मध्ये राज्यात बेदाणा उत्पादन 24 ते 25 हजार गाडी इतके नोंदवले गेले होते. मात्र, मागील दोन वर्षांमध्ये बेदाण्याचे वाढलेले उत्पादन यावर्षी काहीसे घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 2024 यावर्षी राज्यातील बेदाणा उत्पादन 18 ते 20 हजार गाडी इतके राहण्याची शक्यता आहे. बेदाणा बाजारातील व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, चालू फेब्रुवारी महिन्यात बेदाणा दर सामान्य असतील. कारण या महिन्यात अवकाळी पावसामुळे फटका बसलेला कमी गुणवत्तेचा माल बाजारात येऊ शकतो. तर मार्च महिन्यात बाजारात चांगल्या दर्जाच्या बेदाण्याची आवक सुरु होताच, दरात सुधारणा पाहायला मिळू शकते.

error: Content is protected !!