Bedana Rate : बेदाणा बाजारात मंदीची शक्यता नाही; उत्पादन वाढणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकाला (Bedana Rate) सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे आता राज्यातील काही भागांमध्ये नुकसान झालेल्या आणि निर्यात गुणवत्ता गमावलेल्या द्राक्षांपासून शेतकरी बेदाणा विक्रीकडे (Bedana Rate) वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात आणि पंढरपूर(सोलापूर), सांगली जिल्ह्यासह तासगाव परिसरात बेदाण्याचे सर्वाधिक उत्पादन होते. मात्र सद्यस्थिती पाहता बेदाणा दरात मंदीची शक्यता नसल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.

राज्यातील नाशिक, सांगली हे जिल्हे द्राक्ष उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. या दोन जिल्ह्यांमध्ये द्राक्षासह बेदाण्याचे (Bedana Rate) मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. मात्र आता अवकाळी पावसामुळे या जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येत्या आठवडाभरात द्राक्ष पिकाच्या एकूण नुकसानीबाबत आकडेवारी समोर येऊ शकेल. बेदाणा बाजारात सध्या मंदीची कोणत्याही शक्यता नसून, याउलट पुढील दोन आठवडे आणखी हवामान खराब राहिल्यास बेदाण्याच्या प्रति किलो दरामध्ये 10 ते 20 रुपयांची वाढ होऊ शकते, असे सांगितले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर बेदाणा बाजाराचा घेतलेला हा थोडक्यात आढावा…

किती मिळतोय दर (Bedana Rate In Maharashtra Market)

व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, यावर्षी ऑगस्ट आणि ऑक्टोबर महिन्यात पावसाने दिलेली उघडीप आणि आता झालेल्या अवकाळी पावसामुळे 2024 मध्ये मागील वर्षीच्या तुलनेत द्राक्ष उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. यावर्षीच्या हंगामातील नवीन बेदाणा जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये बाजारात येण्याची शक्यता आहे. तर मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात आवकेचा जोर वाढण्यास सुरुवात होईल. सध्या तासगाव येथील बेदाणा बाजारात 20 गाड्यांची (प्रति गाडी 10 टन) आवक होत आहे. तर लिलावात बेदाण्याला 160 ते 190 रुपये प्रति किलो दरम्यान दर मिळत आहे. तर दिल्ली येथील बाजारात बेदाण्याला सध्या 160 ते 260 रुपये प्रति किलो दरम्यान दर मिळत असल्याचे सांगितले जात आहे.

उत्पादनात वाढ होणार

मागील दोन वर्षात देशातील बेदाणा उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. निर्यात घटल्याने शेतकरी या कालावधीमध्ये बेदाणा निर्मितीकडे वळल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे 2021 मध्ये महाराष्ट्रातील बेदाणा उत्पादन 14 ते 15 हजार गाडी (प्रति गाडी 10 टन) इतकी नोंदवले गेले होते. ज्यात 2022 मध्ये वाढ होऊन, ते 18 ते 20 हजार गाडी इतकी नोंदवले गेले होते. तर आता यावर्षी यात पुन्हा वाढ होऊन, 23 ते 25 हजार गाडीहून अधिक नोंदवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निर्यातक्षम द्राक्षांमध्ये घट होणार असल्याने उत्पादनात ही वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे.

error: Content is protected !!