Biofertilizers: रासायनिक खताची कमतरता आणि वाढलेल्या किंमती यामुळे पिकांचे उत्पादन खर्च तर वाढतेच शिवाय अतिरिक्त रसायनांच्या वापरामुळे पिकांचे सुद्धा नुकसान होते. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातून अपेक्षित उत्पादन मिळवायचे असल्यास जीवाणू खते (Biofertilizers) हा अतिशय किफायतशीर आणि परिणामकारक पर्याय सध्या उपलब्ध आहे.
जीवाणू खतांचे फायदे: (Benefits of Biofertilizers)
- जीवाणू खतांमुळे (Biofertilizers) रासायनिक खताचा कार्यक्षम वापर होऊन, त्यात बचत होऊ शकते.
- पर्यावरणपूरक जीवाणू खते जमिनीचा पोत सुधारतात व पीक उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ करण्यास मदत करतात.
- जीवाणू खतांमुळे बियाण्यांची उगवणशक्ती वाढते.
- जैविक खते सूक्ष्म अन्नद्रव्याबरोबरच जिब्रेलिक ऍसिड, सायटोकायनिन इन्डॉल ऍसिटीक ऍसिड, यासारखी संप्रेरके व विटामीन बी’ झाडांना मिळवून देतात.
- जैविक खतांद्वारे जमिनीत प्रतिजैविके सोडली गेल्याने काही प्रमाणात बुरशीजन्य रोगांचे देखील नियंत्रण होते.
जीवाणू खते (Biofertilizers)जमिनीत आढळणाऱ्या उपयुक्त जीवाणूपासूनतयार केलेली असतात.त्यापैकी अझोटोबॅक्टर,अॅझोस्पीरिलम, निळी हिरवी शेवाळे आणि ऍ़झोला पिकास नत्र पुरवितात. बॅसीलस पॉलिमिक्स जीवाणू स्फुरदाची उपलब्धता वाढवितात तर मायकोराईझा सारखे जीवाणू पिकास स्फुरद, पालाश, नत्र, कॅल्शियम, सोडियम, जस्त, तांबे, यासारखी अन्नद्रव्ये जमिनीतून शोषण करण्यासाठी मदत करतात. यापैकी अझोटोबॅक्टर आणि रायझोबियम ही संवर्धने प्रचलित असून इतर जीवाणू खताच्या अधिक वापरासाठी कृषी खाते व कृषी विद्यापीठे प्रयत्नशील आहेत.
जीवाणू संवर्धनाचा (Biofertilizers) निरनिराळ्या पिकांसाठी वापर आणि उत्पादनात होणारी वाढ
जीवाणू संवर्धन प्रकार – पिकांसाठी वापर – उत्पादनात होणारी वाढ (टक्के)
अझॅटोबॅक्टर – एकदल पिके: ज्वारी, बाजरी, गहू – १४ ते ३३
रायझोबियम – द्विदल पिके: तूर, उडीद, सोयाबीन, मूग, हरभरा, भूईमुग – १९ ते ६२
अॅझोस्पीरीलम – ज्वारी, बाजरी, मका, गहू, भात – १५ ते २०
निळे-हिरवे शेवाळ – भात – १० ते १५
अॅझोला – भात – १२ ते ५१
व्ही ए मायकोराईझा – बाजरी, ज्वारी, मका, तूर, भुईमुग – २२ ते २५
जीवाणू खत (संवर्धन) वापरण्याची पद्धती (Methods of application of Biofertilizers)
- अझॅटोबॅक्टर अथवारायझोबियम जीवाणू संवर्धन (Biofertilizers) वापरायचे असल्यास संवर्धनाचे १ पाकिट (२५० ग्रॅम) ५०० लिटर पाण्यात मिसळून केलेले द्रावण बियाण्यांवर शिंपडून हलक्या हाताने चोळावे.
- जीवाणू संवर्धन लावलेले बियाणे स्वच्छ कागदावर किंवा पोत्यावर सुकवावे आणि लगेच पेरणीसाठी वापरावे. एका पाकीटातील संवर्धन (२५० ग्रॅम)१० ते १५ किलो बियाणांवर प्रक्रिया करण्यासाठी पुरेसे होते. गुळाचे पाणी (५० ते १०० ग्रॅम गूळ + ५०० मिली पाणी) वापरल्यास जास्त परिणामकारक ठरते.
- उसाची एक एकर लागवण करण्यासाठी ५० लिटर अॅसीटॉबॅक्टरची ८ पाकीटे आणि स्फुरद विद्राव्य जीवाणूंची (पीएसबी) ८ पाकीटे मिसळून द्रावण तयार करुन उसाच्या कांडया या द्रावणामध्ये बुडवून लगेच लावणी करावी.
- बटाट्याच्या एक एकर लागणाऱ्या बेण्यासाठी अझोटोबॅक्टरची ८ पाकीटे व स्फुरद विद्राव्य जीवाणूंची (पीएसबी) ८ पाकीटे ५० लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे व द्रावणात बेणे बुडवून लावणी करावी.
- हळद, आले (अद्रक) एक एकरा करीता लागणाऱ्या बेण्यासाठी अझोटोबॅक्टरची ८ पाकीटे व स्फुरद विद्राव्य जीवाणूंची (पीएसबी) ८ पाकीटे ५० लिटर पाण्यात मिसळून द्रावणात बेणे बुडवून लागवड करावी.
- मिरची, तंबाखू, कांदा, फळे आणि भाजीपाला पिकांसाठी अॅझोटोबॅक्टरची १० पाकीटे आणि स्फुरद विद्राव्य जीवाणूंची (पीएसबी) १० पाकीटे २० लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. रोपाची लावणी करते वेळी रोपाची मुळे या द्रावणामध्ये ५ मिनीटे बुडवून नंतर लावणी करावी.
- ज्वारी पिकास अॅझोस्पीरिलम व स्फुरद विद्राव्य जीवाणू संवर्धनाची आणि हरभरा पिकास रायझोबियम व स्फुरद विद्राव्य जीवाणू संवर्धनाची एकत्रित (२५० ग्रॅम प्रत्येक जिवाणू संवर्धन प्रति १ किलो बियाणास) बिजप्रक्रिया करावी, अशी शिफारस करण्यात येते.
- सोयाबीन पिकास रायझोबियम व स्फुरद विद्राव्य जीवाणू संवर्धनाची आणि करडईस अझोटोबॅक्टर व स्फुरद विद्राव्य संवर्धनाची (२५० ग्रॅम प्रत्येक जीवाणू संवर्धनाची प्रति १० किलो बियाणास) एकत्रित बिजप्रक्रिया करावी.
जीवाणू संवर्धन वापरतांना घ्यावयाची काळजी (Precautions to be taken while using Biofertilizers)
- जीवाणू संवर्धने पाकिटावर नमूद केलेल्या पिकांसाठी सूचनेप्रमाणे अंतिम दिनांकापूर्वी वापरावीत.
- बियाण्यांस बुरशीनाशके किंवा कीटकनाशके अगोदर वापरावीत व त्यानंतर जीवाणू संवर्धन लावावे.
- जीवाणू संवर्धन अथवा संवर्धनाची प्रक्रिया केलेले बियाणे खतात मिसळू नये.
- जीवाणू संवर्धन (Biofertilizers)खरेदी करताना वापरासंबंधी अंतिम तारीख तसेच पिकाचे नाव पाहूनच खरेदी करावे व पाकिटास सावलीत थंड जागी ठेवावे.
- वेगवेगळ्या व्दिदल पिकासाठी वेगवेगळे रायझोबियम वापरावे/