Biological Methods of Pest and Disease Control: जैविक पद्धतीने करा पिकांवरील किडी आणि रोगांचे नियंत्रण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: जैविक कीड नियंत्रणाच्या (Biological Methods of Pest and Disease Control) पद्धतीत वेगवेगळे जीवाणू, बुरशी आणि विषाणूंचा वापर करून कीड नियंत्रण केले जाते. साथीचे रोग पसरवणाऱ्या या सूक्ष्म जीवजंतूंचे प्रयोगशाळेत मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून त्यापासून रोगजंतूयुक्त जैविक कीड-रोगनाशके (Biological Methods of Pest and Disease Control) तयार केली जातात आणि त्याचा शेतात वापर केला जातो. जाणून घेऊ याबद्दल सविस्तर.

जीवाणू

  • बॅसिलस थुरीनजेन्सीस (बीटी): या जीवाणूंचा उपयोग पतंगवर्गीय किडी उदा. कापसावील बोंडअळी, घाटेअळी, कोबीवरील चौकोनी ठिपक्याचा पतंग, पाने गुंडाळणारी अळी, तंबाखूवरील अळी इत्यादीच्या नियंत्रणासाठी होतो. भाजीपाला, नगदी पिके, फळझाडे, फुलझाडे इ. पिकांमध्ये वापर करता येतो.                       प्रमाण: 0.8 ते 1 किलो/एकर फवारणीसाठी वापरावे  
  • स्युडोमोनास फ्ल्युरोसंस: याचा उपयोग सर्व पिकांवरील बुरशीजन्य व जीवाणूजन्य कुज, मूळकुज, फळकुज, पानांवरील ठिपके इ. रोगांच्या नियंत्रणासाठी होतो. डाळींबावारील नुकसानकारक तेलकट डाग रोगाच्या नियंत्रणासाठी हा जीवाणू अत्यंत उपयुक्त आहे.                                प्रमाण: 10 ग्रॅम/किलो बियाणे (बीज प्रक्रियेसाठी), 25 ग्रॅम/10 लिटर (फवारणीसाठी) किंवा 4 किलो/एकर जमिनीमधून फवारणीसाठी                                                    ०.5 ते 1 किलो स्युडोमोनास पावडर 5 लिटर पाण्यात मिसळून घ्यावी. हे द्रावण गाळून घेतल्यानंतर 40 मिली स्टीकर/स्प्रेडर मिसळावे. हे द्रावण 195 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर क्षेत्रावर वापरावे.                                                                      जमिनीतून वापरासाठी 2 किलो स्युडोमोनास शेणखतात मिसळून जमिनीत द्यावे. रोगाचा प्रादुर्भाव दिसताच 8 ते 10 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.                             जमिनीत देताना वर्षातून किमान 2 वेळा (3 महिने अंतराने) द्यावे.

बुरशी                                                                   बुरशीची लागण झाल्यास सुरुवातीला किटकाच्या त्वचेवर लहानसा ठिपका दिसतो. रोगबाधीत कीटक बैचेन होऊन हालचाल मंदावते. मरण पावलेले कीटक कडक होतात. किटकाच्या बाह्य शरीरावरदेखील बुरशीची वाढ होते.

  • व्हर्टीसिलीयम लेकॅनी: ही बुरशी रस शोषक किडी उदा. मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, लाल कोळी, पिठ्या ढेकूण व खवले कीड या मृदू शरीरवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. फळझाडांवरील पिठ्या ढेकूण व उसावरील लोकरी मावा, पांढरी माशीच्या जैविक नियंत्रणासाठी ही एक प्रभावी बुरशी आहे.

प्रमाण: 5 ग्रॅम/लिटर पाणी किंवा 0.8 ते 1 किलो/एकर (फवारणीसाठी)

1 किलो व्हर्टीसिलीयम लेकॅनी पावडर 5 लिटर पाण्यात मिसळून 4 ते 6 तास भिजवून नंतर वस्त्रगाळ करून घ्यावे. दुसऱ्या 5 लिटर कोमट पाण्यात मिसळून घ्यावे. थंड झाल्यास दोन्ही द्रावणे एकत्र करून 40 मिली स्टीकर/स्प्रेडर मिसळावे. सदर 10 लिटर द्रावणात 190 लिटर पाण्यातून मिसळून प्रति एकर क्षेत्रावर फवारणीसाठी वापरावे.

शेतात किडीचा प्रादुर्भाव दिसू लागताच पहिली फवारणी करावी. किडीचे प्रमाण कमी होईपर्यंत 10 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 वेळा फवारणी करावी. या बुरशीच्या वाढीस 90 टक्के सापेक्ष आर्द्रता व 20 ते 25 अंश सेल्सिअस तापमान उपयुक्त ठरते.

  • बिव्हेरिया बॅसियाना: ही बुरशी पतंगवर्गीय किडी, भुंगेरे, हुमणी, सोंडकिडे, पाने खाणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी, घाटेअळी, केसाळ अळी, वाळवी इ.च्या नियंत्रणासाठी उपयोगी आहे.

प्रमाण: 5 ग्रॅम/लिटर पाणी, 0.8 ते 1 किलो एकरी (फवारणीसाठी) किंवा 8 किलो/एकरी (जमिनीतून)

  • मेटारायझीयम अॅनिसोप्ली: या बुरशीचा उपायोग पाने खाणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी, घाटे अळी, केसाळ अळी, पायरीला, खोडकीड, हुमणी, वाळवी इ. तीनशे प्रकारच्या किडींच्या नियंत्रणासाठी होतो.

प्रमाण: 5 ग्रॅम/लिटर पाणी, 0.8 ते 1 किलो एकरी (फवारणीसाठी) किंवा 8 किलो/एकरी (जमिनीतून)

  • न्युमोरीया रीलाई: ही बुरशी मुख्यत्वे सोयाबीन, बटाटा, कापूस व इतर पिकांवर येणाऱ्या स्पोडोप्टेरा व इतर अळ्यांच्या प्रभावी नियंत्रणासाठी उपयुक्त आहे.

प्रमाण: 5 ग्रॅम/लिटर पाणी, 0.8 ते 1 किलो एकरी (फवारणीसाठी)

  • पॅसिलोमायसीस लीलासिनस: पिकामध्ये मुळांवर गाठी करून नुकसान करणाऱ्या सूत्रकृमींच्या नियंत्रणासाठी ही बुरशी वापरतात.

प्रमाण: 10 ग्रॅम/किलो बियाणे (बीजप्रक्रीयेसाठी), 50 ग्रॅम/झाड (आळवणीसाठी) किंवा 4 किलो/एकरी शेणखतासोबत 1:40 या प्रमाणात.

जमिनीतून देण्यासाठी 10 किलो पॅसिलोमायसीस पावडर 400 किलो शेणखतात मिसळून त्यावर 1 किलो गुळाचे द्रावण करून शिंपडावे. 4 ते 6 तासांपर्यंत तसेच ठेवावे. त्यानंतर जमिनीतून गादी वाफ्यावर मिसळून किंवा फळझाडांना रिंग पद्धतीने द्यावे. वर्षातून किमान दोनवेळा (6 महिने अंतराने) द्यावे.

  • ट्रायकोडर्मा: या बुरशीचा उपयोग जमिनीत वाढणाऱ्या मर, मूळकुज, खोडकुज, रॉट इ. रोगकारक बुरशी उदा. पिथियम, फ्युजारीयम, स्क्लेरोशियम, रायझोक्टोनिया, फायटोप्थोरा, कॉलेटोट्रिकम, बोट्रायटीस इ.च्या नियंत्रणासाठी होतो.

प्रमाण: 250 ग्रॅम/10 किलो बियाणे (बीजप्रक्रिया), 20 ते 25 ग्रॅम/ 10 लिटर पाणी, 400 ते 800 ग्रॅम/एकरी (फवारणीसाठी), 50 ग्रॅम/झाड (आळवणीसाठी), 2 किलो प्रति एकरी (जमिनीमधून)

विषाणू

अळीच्या शरीरात विषाणूची लागण झाल्यास विषाणूची वाढ सुरु होते. विषाणूच्या वाढीसाठी लागणारे अन्नघटक उदा. प्रथिने हे अळीच्या शरीरातील पेशीतून शोषून घेतले जातात. कीटकाच्या शरीरातील सर्व पेशी नष्ट होतात.

  • एचएएनपीव्ही: या विषाणूचा वापर घाटेअळी, शेंगा पोखरणारी अळी, फळे पोखरणारी अळी, कळी व बी खाणारी अळी, बोंडअळी इ.च्या नियंत्रणासाठी हरभरा, तूर, टोमॅटो, कापूस, सुर्यफुल इ. पिकामध्ये होतो.

प्रमाण: हरभऱ्यावरील घाटेअळी, तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीसाठी 200 मिली/एकर, टोमॅटोवरील फळे पोखरणाऱ्या अळी, सूर्यफुलाच्या फुल व बी खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी 100 मिली/एकर, कपाशीवरील बोंडअळीच्या नियंत्रणासाठी 200 मिली/एकर

  • एसएलएनपीव्ही: या विषाणूचा उपयोग पाने खाणारी अळीच्या (स्पोडोप्टेरा) नियंत्रणासाठी सोयाबीन, कापूस, एरंडी इ. पिकांमध्ये होतो.

प्रमाण: सोयाबीन, कापूस, एरंडी इ. पिकामध्ये पाने खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी 100 ते 200 मिली/एकर

  • एसएएनपीव्ही: केसाळ अळीच्या नियंत्रणासाठी या विषाणूचा उपयोग होतो.

प्रमाण: सुर्यफुल, भुईमुग पिकावरील केसाळ अळीच्या नियंत्रणासाठी 200 मिली/एकर

error: Content is protected !!