हॅलो कृषी ऑनलाईन : कापूस (Blue cotton) हे महाराष्ट्रातील प्रमुख पिकांपैकी एक आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाडा, खानदेश या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादन घेतले जाते. राज्यात कापसाला प्रामुख्याने ‘पांढरे सोने’ म्हणून ओळखले जाते. मात्र शेतकऱ्यांचे हेच पांढरे सोने आता निळ्या रंगाचे होणार असून, त्याला पांढऱ्या कापसापेक्षा दरही अधिकचा असणार आहे. संशोधकांकडून निळ्या रंगाच्या (Blue cotton) कापसाची जात विकसित करण्याबाबत युद्धपातळीवर संशोधन सुरु असल्याचे सांगितले जात आहे.
मिळते अधिक उत्पादन (Blue cotton Researchers Create Variety)
सध्या युनायटेड स्टेट्स (अमेरिका), चीन, पेरू आणि इस्राईल हे देश रंगीत कापसाचे उत्पादन घेत आहे. तर तीन ते चार दिवसांपूर्वी अकोला कृषी विद्यापीठाच्या वरोरा (जि. चंद्रपूर) येथील संशोधन केंद्रातही रंगीत कापसाच्या (ब्राऊन कलर) वाणाची निर्मिती करण्यात आल्याचे समोर आले होते. विद्यापीठाने विकसित केलेले हे वाण पांढऱ्या कापसापेक्षा अधिक उत्पादन मिळवून देते. ब्राऊन कलरच्या कापसाच्या विद्यापीठाने वैदेही, सीएनएच 17395 हे दोन वाण विकसित केले आहे. विद्यापीठाकडून हे वाण शेतकऱ्यांना चालू खरीप हंगामासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यानंतर आता कृषी संशोधकांकडून निळ्या रंगाचे (Blue cotton) देखील वाण विकसित करण्यात येत असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
‘जीन्स’ व्यवसायाला उभारी मिळणार
दरम्यान, याआधीही कर्नाटकातील धारवाड कृषी विद्यापीठात 2021 मध्ये ‘डीडीसीसी-1’ आणि ‘डिएमबी-225’ या ब्राऊन रंगाच्या दोन वाणांची निर्मिती धारवाड कृषी विद्यापीठाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आता निळ्या रंगाच्या कापसाच्या वाणाची निर्मिती ही क्रांतिकारी पाऊल ठरणार आहे. कारण देशामध्ये सध्या पुरुषच नाही महिला देखील मोठ्या प्रमाणात जीन्स वापरतात. परिणामी या जीन्स निर्मिती व्यवसायाला या कापूस वाणामुळे मोठा हातभार लागणार असल्याचे बोलले जात आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या कापसालाही मागणी राहत चांगला दर मिळण्यास मदत होणार आहे.
कालानुरूप बदल
उपलब्ध माहितीनुसार, सध्याच्या घडीला देशामध्ये उत्पादित होत असलेला कापूस हा इतका पांढराशुभ्र नव्हता. तर स्वात्रंत्र्यापूर्वी भारतातही रंगीत कापसाची शेती होत होती. आंध्रप्रदेश या राज्यात तर खाकी रंगाचा कापूस पिकत असल्याचेही बोलले जाते. मात्र कालानुरूप यात बदल होत गेला. सध्या भारतीय केंद्रीय कापूस संशोधन संस्थेकडे कापसाच्या 6000 जातींचा संग्रह आहे. त्यामध्ये अंदाजे 40 जाती रंगीत कापसाच्या आहेत.