हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची उन्हाळी वांग्याच्या लागवडीसाठी (Brinjal Farming) लगबग सुरु आहे. बाजारात वांग्याला सध्या कमी दर मिळतोय, मात्र कमी दराच्या वेळी लागवड केली की काढणीला दरवाढ होते. असा अनेक शेतकऱ्यांचा अनुभव असल्याने, दरवाढीच्या आशेपोटी शेतकरी सध्या वांग्याच्या रोपांची लागवड करत आहेत. तशीही वांग्याला बाजारात वर्षभर मागणी असते. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळाल्यास वांग्याच्या लागवडीतून नक्कीच फायदा होतो. आज आपण वांग्याचे पीक घेताना नेमकी काय काळजी घेतली पाहिजे. जेणेकरून आपल्या वांग्याच्या पिकावर (Brinjal Farming) बुरशीजन्य किंवा कीटकजन्य रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही.
योग्य बियाणे व जमिनीची निवड (Brinjal Farming Water Management)
वांग्याचे पीक (Brinjal Farming) घ्यायचे म्हटले की त्यावर किडीचा प्रादुर्भाव हा सर्वाधिक असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य नियोजन करावे लागते. अन्यथा उत्पादन आणि गुणवत्ता घटून आर्थिक फटका बसतो. मात्र शेतकऱ्यांनी पुढील काही गोष्टी केल्यास त्यांना वांग्याच्या पिकातून नक्कीच फायदा होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, पीक लागवड पद्धतीत बदल करावा अर्थात वारंवार एकाच जमिनीत वांग्याची लागवड करून नये. याशिवाय शेतकऱ्यांनी नर्सरीतून रोपे आणताना बियाण्याची माहिती करून खात्रीपूर्वकच रोपे आणावी. किंवा मग फेब्रुवारीच्या लागवडीसाठी बाजारातुन खात्रीशीर व शिफारस केलेले बियाणे खरेदी करून आपल्या स्वतःची रोपे जानेवारी महिन्यातच तयार करावी. जमिनीत बदल आणि योग्य बियाणे या दोन गोष्टींमुळे वांग्यावरील रोगांवर नियंत्रण मिळवण्यात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात यश मिळते.
वांग्याला पाणी कसे द्यायचे?
वांग्याचे झाड हे असे असते. ज्याला दोन झाडांमध्ये खेळती हवा आणि उत्तम उन्हाची खूप गरज असते. त्यामुळे वांग्याची लागवड करताना विशिष्ट अंतर ठेवावे. कमी अंतर ठेवल्यास किडीचा आणि बुरशीचा प्रादुर्भाव होण्यास वाव मिळतो. याशिवाय वांग्याला गरजेनुसारच पाणी द्यावे. वांग्याला जास्त पाणी देण्यापासून शेतकऱ्यांनी नेहमी सावध असावे. कारण अधिकचे पाणी दिले तर तुमचे वांग्याचे शेत (Brinjal Farming) बुरशी आणि किडीचे घर बनू शकते. त्यामुळे वांग्याच्या पिकाला शक्यतॊ वरतून पाणी देण्याऐवजी ड्रीप पद्धतीने योग्य त्या प्रमाणात पाणी दिल्यास योग्य ठरते. ज्यामुळे शेतामध्ये अनावश्यक ओलावा कमी राहून किडींचा प्रादुर्भाव होत नाही. “वांग्याच्या पिकाला पाटाने भर पाणी पद्धतीने पाणी दिल्याने किडीचा अधिक प्रादुर्भाव होतो.” असे तज्ज्ञांच्या अनुभवातून समोर आले आहे.
‘या’ कीडनाशकांचा करा वापर
योग्य पद्धतीने पाणी देऊनही वातावरणातील बदलामुळे काही प्रमाणात कीड आढळून आल्यास, शेतकऱ्यांनी निंबोळी अर्क, लसूण अर्क किंवा तांबे आधारित जैविक कीटनाशकांचा वापर करावा. यांच्या वापरातून किडीवर नियंत्रण मिळवणे, रामबाण उपाय मानला गेला आहे. याशिवाय शेतकरी ट्राइकोडर्माचा वापर करून देखील किडीवर नियंत्रण मिळवू शकतात. याव्यतिरिक्त तज्ज्ञांच्या मते, वांग्याला झाडाला जमिनीत योग्य प्रमाणात पोषकतत्वे देत राहिल्यास, त्यातूनही किडींचा प्रादुर्भाव होत नसल्याचे आढळून आले आहे.
वेळीच ओळखा बुरशीचा अटॅक!
वांग्याच्या पिकावर बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यास, झाडाच्या पानांवर डाग पडायला सुरुवात होते. याशिवाय वांग्याची पाने कोमेजलेली दिसतात. त्यामुळे वांग्याच्या झाडावर असे परिणाम दिसून आल्यास, ते झाड शेतातून उपटून दूर फेकावे. ज्यामुळे एका झाडापासून दुसऱ्या झाडाला बुरशीची लागण होण्यापासून वाचवले जाऊ शकते. शेतातून उपटलेली रोग संक्रमित झाडे पिकापासून दूर नेऊन टाकावीत.