Buffalo Breeds : कृषी प्रदर्शनात ‘युवराज’ रेड्याचीच हवा; सेल्फीसाठी अनेकांची झुंबड!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा (Buffalo Breeds) या ठिकाणी राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्ताने अभिता ऍग्रो कंपनीज आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच कृषी प्रदर्शन भरवण्यात आले होते. सोमवारी या कृषी प्रदर्शनाची सांगता झाली. या कृषी प्रदर्शनात जिल्ह्यासह आसपासच्या भागातून मोठ्या प्रमाणात शेतकरी आले होते. यावेळी या प्रदर्शनात शेतीसाठीची आधुनिक अवजारे, विविध पीके, फळे या सोबतच पशुधन देखील पाहायला मिळाले. मात्र सर्वांमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला तो ‘युवराज’ हा रेडा. या रेड्याला (Buffalo Breeds) पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.

युवराजची वैशिष्ट्ये (Buffalo Breeds Agricultural Exhibition)

बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील शेतकरी राजेंद्र धोगडे शेती करतात. मात्र कृष्णा व आशीष धोगडे या त्यांच्या मुलांनी शेतीसोबतच घोडे, कुत्रे, दुग्ध व्यवसायासाठी गाय, म्हैस पालनाचा छंद जोपासला आहे. त्यांच्याकडे ‘युवराज’ नावाचा रेडा आहे. ज्याला त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या कृषी प्रदर्शनात ठेवले होते. विशेष म्हणजे केवळ दोन वर्षे वय असलेल्या या रेड्याचे वजन सुमारे 900 किलो इतके तर उंची पाच फूट इतकी आहे. त्यामुळे युवराज हा रेडा सर्वांना आपल्याकडे आकर्षून घेत होता. अनेकजण तर त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी त्यांच्याजवळ थांबलेले होते.

‘युवराज’चा दांडगा आहार

शेतकरी राजेंद्र धोगडे व त्यांच्या दोन्ही मुलांनी युवराज या रेड्याला जीवापाड जपले आहे. त्यांच्याकडे सर्व जनावरांची निगराणी करण्यासाठी सदैव एक गडी असतो. जो युवराजच्या आहारासह त्याची विशेष काळजी घेतो, असे शेतकरी राजेंद्र धोगडे सांगतात. युवराजला दररोज 10 लिटर दूध, 10 किलो ढेप, 1 किलो सफरचंद, 2 किलो पीठ, सोबतच दादर ज्वारीचा हिरवा चारा, गवत, तुरीचे कुटार, असा त्याचा दररोजच खुराक आहे. आपण युवराजवर खर्च करण्यासाठी मागे पुढे पाहत नसल्याचे राजेंद्र धोगडे यांनी म्हटले आहे. युवराजला आपण सध्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ब्रीडसाठी उपलब्ध करत आहोत. बाजारभावाप्रमाणे त्याला अधिकची किंमत मिळू शकते. मात्र त्याला भविष्यात कोटींमध्ये किंमत मिळाली तरी आपण त्याला विकणार नसल्याचे शेतकरी राजेंद्र धोगडे सांगतात.

error: Content is protected !!