हॅलो कृषी ऑनलाईन : काळ्या सोन्याचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूरमध्ये (Colorful Cotton Variety) एक नवीन संशोधन समोर आले आहे. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वरोरा येथील कृषी संशोधन केंद्रात विद्यापीठाच्या संशोधकांनी रंगीत कापसाची नवीन जात विकसित केली आहे. केंद्राच्या आवारात या नवीन जातीच्या रंगीबेरंगी कापसाची (Colorful Cotton Variety) लागवड करण्यात आली असून, हे कापसाचे वाण पाहण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे.
‘हे’ आहेत तीन नवीन वाण (Colorful Cotton Variety Developed)
विद्यापीठाच्या वरोरा येथील कृषी संशोधन केंद्रात यावर्षी या रंगीत जातीच्या वाणाची लागवड करण्यात आली असून, हे वाण पांढऱ्या कापसापेक्षा अधिक उत्पादन मिळवून देते. केंद्रात प्रामुख्याने रंगीत कापसाचे तीन वाण नव्याने लागवड करण्यात आले असून, यामध्ये नॉनबीटी आणि बीटी असा दोन्ही वाणांचा समावेश आहे. या तीन वाणांमध्ये वैदेही, सीएनएच 17395 हे दोन वाण अमेरिकन कापूस प्रकारामधील आहेत. तसेच तिसरे वाण सीएनएच 17552 हे देशी कापूस वाण आहे.
खरिपात मिळणार बियाणे
यावर्षीच्या खरीप हंगामात हे कापूस बियाणे विद्यापीठाकडून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. सीएनएच 17552 हे वाण थोडेसे फिक्कट पिवळसर रंगाचे असून, या तीन वाणांची वैशिष्ट्ये म्हणजे या वाणांची लागवड ही विलगीकरण करत करावी लागते. तीनही वाणांच्या एका झाडाला जवळपास 50 ते 60 कापूस बोंडे लागतात. परिणामी या वाणांच्या मदतीने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेणे शक्य होणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भात मोठ्या प्रमाणात कापूस लागवड केली जाते. पांढरा सोने असलेल्या या कापूस पिकामुळे या भागातील शेतकऱ्यांचा आर्थिक स्तरही उंचावला आहे. त्यातच आता अकोला कृषी विद्यापीठाने नव्याने तीन रंगीत कापूस वाणांची निर्मिती केल्याने विदर्भासह राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. या कापसाला पांढऱ्या कापसापेक्षा अधिक दर मिळत असल्याने, शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळण्यास मदत होणार आहे.