Coloured Cauliflower: रंगीबेरंगी फुलकोबीची लागवड पद्धती; विक्रीतून मिळू शकतो ‘एवढा’ नफा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Table of Contents

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकरी बंधुंनो, तुम्ही रंगीबेरंगी फुलकोबी (Coloured Cauliflower) बद्दल वाचाल असेल.  शरीरासाठी आरोग्यदायी आणि बाजारात जास्त दरात विकली जाणारी रंगीबेरंगी फुलकोबीच्या (Coloured Cauliflower) लागवडी विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

हे सुद्धा वाचा- आरोग्यपूर्ण आणि जास्त नफा देणारी रंगीत फुलकोबी!  

 

रंगीबेरंगी फुलकोबीची लागवड पद्धती (Coloured Cauliflower)

रोपे लागवड (Cultivation Method)

रंगीत फुलकोबीच्या लागवडीसाठी 4 ते 5 आठवड्याच्या रोपांची शेतात 60X 60 सें.मी. आणि 60X45 सें.मी. अंतरावर लागवड करावी. रोपे पुनर्लागवड नंतर पि‍काला हलके सिंचन देणे आवश्यक आहे.

खत व्यवस्थापन (Fertilizer Management)

कुजलेले शेणखत उपलब्ध असल्यास लागवडीच्या 15 दिवस अगोदर 100 क्विंटल शेणखत आणि कंपोस्ट खताची संपूर्ण मात्रा शेतात मिसळावी. 45 ते 50 किलो नत्र, 25 किलो स्फुरद आणि 15-16 किलो पालाश प्रति एकर वापरावे.

स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा आणि अर्धी नत्राची मात्रा लागवडीच्या 15 दिवस आधी शेतात टाकून चांगले मिसळावे. नत्राची उर्वरित मात्रा दोन समान भागांमध्ये विभागून पुनर्लागवडीनंतर 30-35 आणि 45 ते 50 दिवसांनी टॉप ड्रेसिंग म्हणून द्यावे.

याशिवाय जमिनीत तण काढताना व मशागत करताना 600 ग्रॅम अमोनियम मॉलिब्डेट आणि 5 किलो बोरॉन प्रति एकर जमिनीतून द्यावे.

सिंचन आणि तण नियंत्रण (Water Management And Weeding)

पिकाच्या यशस्वी लागवडीसाठी रोपाची लागवड केल्यानंतर गरजेनुसार 10 ते 15 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. रंगीत फुलकोबी लागवडीनंतर तीन आठवड्यांनी खुरपणी करून मातीची भर द्यावी. यानंतर गरजेनुसार खुरपणी करावी.

कीड आणि रोगांचे व्यवस्थापन (Diseases And Pest Control)

Ø  रंगीबेरंगी फुलकोबीमध्ये (Coloured Cauliflower), डायमंड बॅक मॉड आणि मस्टर्ड फ्लाय या मुख्य किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सेंद्रिय औषध बॅसिलस थूरिंगिएन्सिसच्या द्रावणाची फवारणी करावी, असे प्रौढ कीटक पकडण्यासाठी फेरोमोन सापळ्यांचा वापर करावा.  

Ø  रंगीत फुलकोबीमध्ये मर रोगास प्रतिबंध करण्यासाठी ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. शेतात 20 ग्रॅम प्रति चौरस मीटर या दराने जमिनीत कंपोस्ट खत मिसळून वापरा. हा रोग आढळल्यास रोपवाटिकेला पाणी देऊ नका.

Ø  इतर प्रमुख रोगात काळी सड रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास रोगट झाडे गोळा करून नष्ट करावीत. हा रोग टाळण्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड आणि स्ट्रेप्टोसायक्लिन 200 पीएम या द्रावणाची फवारणी करावी.

काढणी आणि उत्पादन (Harvesting And Yield)

रंगीबेरंगी फुलकोबीचे पीक लागवडीनंतर 100 ते 110 दिवसांनी काढणीसाठी तयार होते. पिकाचे सरासरी एकरी 100 ते 125 क्विंटल उत्पादन मिळते.

एक एकरात फुलकोबीची (Coloured Cauliflower) लागवड केल्यास सुमारे 50 हजार रुपये खर्च येतो. बाजारात ते 25 रुपये किलोने सहज विकले जाते. अशा प्रकारे 100 क्विंटलपासून एकूण उत्पन्न सुमारे अडीच लाख रुपये होईल. निविष्ठा खर्च कमी केल्यास शेतकर्‍याला 2 लाख रूपयांचा निव्वळ नफा मिळेल.

error: Content is protected !!