Cotton Crop : शेतकऱ्यांनो, कपाशीमध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालाय का? करा हे उपाय; होईल फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Cotton Crop : काही शेतकऱ्यांच्या वेळेवर लागवड झालेल्या कपाशीला फुले,बोंडे लागली असून त्यावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. सद्या वातावरण ढगाळ असल्याने व कापसाला पाते, फुले व काही प्रमाणात बोंडे लागत असल्याने गुलाबी बोंडअळीचे पतंग सक्रीय झालेले आढळून येत आहे. मादी पतंग पाते, फुले, बोंडे यावर अंडी घालतात, तसेच यावर्षी कपाशी पिकाची लागवड एकाच वेळी न होता टप्याटप्याने झालेली आहे, त्यामुळे किडीला सतत खाद्य उपलब्ध होत असल्याने गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. म्हणून कपाशीच्या पिकात कामगंध सापळे लावण्याची ही योग्य वेळ आहे जेणेकरून होणारा प्रादुर्भाव आतापासूनच निरीक्षणाद्वारे कमी करता येईल आणि पुढे होणारे नुकसान कमी करता येईल. (Cotton Crop 🙂

खालील पद्धतीचा वापर करून करा गुलाबी बोंडअळीवर नियंत्रण

 • कपाशीच्या पिकात नियमित सर्वेक्षण करुन डोमकळ्या दिसून आल्यास त्या आतील अळीसह तोडून जमा करून जाळून अथवा जमिनीत पुरून नष्ट कराव्यात.
 • गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे हेक्‍टरी 05 या प्रमाणात पिकाच्या उंचीच्या एक ते दीड फूट उंच लावावीत़.
 • मोठ्या प्रमाणात पतंग जमा करून नष्ट करण्यासाठी एका एकर क्षेत्रामध्ये गुलाबी बोंडअळीचे 8 ते 10 कामगंध सापळे लावावेत.
 • ट्रायकोग्रामा बॅक्ट्री या परोपजीवी गांधीलमाशी ने परोपजीवीग्रस्त झालेले ट्रायकोकार्ड प्रति एकरी 2-3 ( 60,000 अंडी)या प्रमाणात पीक 60 दिवसांचे झाल्यावर दोन वेळा लावावे.
 • ट्रायकोकार्ड शेतामध्ये लावल्यानंतर कमीत कमी 10 दिवसापर्यंत रासायनिक कीटकनाशकाची फवारणी टाळावी.
 • कपाशीचे शेतात पक्षांना बसण्यासाठी हेक्टरी किमान 25 पक्षी थांबे लावावेत, म्हणजे पक्षी त्यावर बसून शेतातील
  अळया खाऊन नष्ट करतील.
 • 5 टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडिरेक्टीन 1500 पीपीएम 500 मिली किंवा बिव्हेरिया बॅसियाना या बुरशीयुक्त जैविक कीटकनाशकाची जमिनीत ओल व हवेत आर्द्रता असताना 800 ग्रॅम प्रति एकर याप्रमाणात फवारणी करावी

कामगंध सापळ्यामध्ये सलग तीन दिवस 8 ते 10 पतंग प्रति सापळा किंवा 1 अळी प्रति 10 फुले किंवा 10 बोंडे किंवा 10 टक्के प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या किंवा बोंडे दिसून आल्यास खालीलपैकी एका रासायनिक कीटकनाशकांची ची फवारणी करावी.

 1. प्रोफेनोफॉस 50 टक्के 400 मिली प्रती एकर किंवा
 2. इमामेक्टिन बेंझोएट 5 टक्के 88 ग्रॅम प्रती एकर किंवा
 3. प्रोफेनोफोस 40 टक्के + सायपरमेथ्रीन 4 टक्के (पूर्व मिश्रित कीटकनाशक) 400 मिली प्रती एकर आलटून पालटून फवारावे.

शेतकऱ्यांनो वरील कीटकनाशका सोबत कुठल्याही प्रकारचे इतर कीटकनाशके, बुरशीनाशके, विद्राव्य खते,सूक्ष्म मूलद्रव्ये अथवा रसायने मिसळू नये. लागोपाठ एकच एक कीटकनाशक फवारू नये. याबाबत अधिक माहितीसाठी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

error: Content is protected !!