Cotton Market Rate : जागतिक बाजारात कापूस दरात वाढ; पहा… महाराष्ट्रात काय आहे परिस्थिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतासह जागतिक कापूस उत्पादनात घट होणार असल्याने, आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात (Cotton Market Rate) काहीशी वाढ पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारात सध्यस्थितीत कापसाला 56 हजार 740 रुपये प्रति कँडी (1 कँडी = 356 किलो) दर (Cotton Market Rate) मिळत आहे. लागवडीखालील क्षेत्रात झालेली घट आणि उत्पादनावर अल-निनोचा झालेला प्रभाव यामुळे दरात वाढ झाल्याचे बोलले जात आहे.

महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव (Cotton Market Rate 24 November 2023)

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर वाढले असले तरी महाराष्ट्रात मात्र कापूस दरात गेल्या चार ते पाच दिवसांत काहीशी नरमाई आल्याचे पाहायला मिळत आहे. गुरुवारी (ता.23) राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये नोंदवले गेलेले दर पुढीलप्रमाणे आहेत. परभणी जिल्ह्यातील मनवत बाजार समितीत कापसाला कमाल 7375 ते किमान 7100 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. जो मागील आठवड्याच्या शेवटी शनिवारी (ता.18) कमाल 7475 ते किमान 7100 रुपये प्रति क्विंटल इतका नोंदवला गेला होता. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा बाजार समितीत गुरुवारी कापसाला कमाल 7250 ते किमान 7100 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. जो मागील आठवड्याच्या शेवटी शनिवारी कमाल 7350 ते किमान 7000 हजार रुपये प्रति क्विंटल इतका नोंदवला गेला होता. वर्धा जिल्ह्यातील सेलू बाजार समितीमध्ये गुरुवारी कापसाला कमाल 7201 ते किमान 7150 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. जो मागील आठवड्याच्या शेवटी कमाल 7272 ते किमान 7200 रुपये प्रति क्विंटल इतका नोंदवला गेला होता.

खानदेशात 25 टक्क्यांनी घट

2023-24 या वर्षात देशात कापसाच्या उत्पादनात 7.5 टक्क्यांनी घट होऊन, ते 29.5 दशलक्ष गाठी इतके होण्याची शक्यता भारतीय कापूस महामंडळाकडून (सीएआय) याआधीच व्यक्त करण्यात आली आहे. तर यावर्षी भारतात 2.2 दशलक्ष गाठी इतकी आयातीत वाढ होऊ शकते. जी मागील वर्षीच्या तुलनेत 1.25 मिलियन गाठींनी अधिक आहे. असेही सीएआयकडून यापूर्वी सांगितले गेले आहे. तर भारतीय कापूस महामंडळाच्या आकडेवारीतून दिसते की, देशात 2022-23 मध्ये प्राथमिक अंदाजानुसार 31.8 दशलक्ष गाठींचे उत्पादन झाले आहे. जे तिसऱ्या आगाऊ अंदाजाच्या तुलनेत 34.3 मिलियन गाठींहून कमी आहे. विशेष म्हणजे यंदा पावसाच्या कमतरतेमुळे उत्तर महाराष्ट्रात कापसाचे उत्पादन 25 टक्क्यांनी घटणार असल्याचा अंदाज आहे. ज्याचा देशातील कापूस उत्पादनावर परिणाम होऊन, देशातील एकत्रित कापूस उत्पादनाला यंदा 20 लाख टनांचा फटका बसू शकतो.

error: Content is protected !!