हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून कापूस पिकाची (Cotton Production) ओळख आहे. राज्यात यवतमाळ जिल्ह्याला ‘पांढऱ्या सोन्याचा जिल्हा’ म्हणून ओळखले जाते. याशिवाय राज्यातील विदर्भ-मराठवाडा पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कापूस पिकाचे उत्पादन घेतले होते. काही प्रमाणात खान्देश पट्टयातही कापूस पिकतो. मात्र, तुम्ही कधी विचार केलाय का? भारतातील सर्वाधिक कापूस पिकवणारी पहिल्या पाच क्रमांकाची राज्य कोणती आहेत. यात महाराष्ट्राचा क्रमांक कितवा लागतो? आणि महाराष्ट्र देशातील एकूण कापूस उत्पादनापैकी (Cotton Production) किती कापूस उत्पादित करतो? आज आपण तुमच्या मनातील या सर्व प्रश्नांची उत्तरे या पोस्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्र प्रथम स्थानी (Cotton Production In India)
कापूस या पिकाला काळी कसदार जमीन आवश्यक असते. परिणामी, देशातील सर्वाधिक कापूस पिकाखालील क्षेत्र हे महाराष्ट्रात आहे. राज्यातिल शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड करतात. याच लागवडीमुळे महाराष्ट्र हा देशातील एकूण कापूस उत्पादनापैकी (Cotton Production) 27.10 टक्के उत्पादनासह प्रथम क्रमांकावर आहे. जे एक चतुर्थांश भागापैकी अधिक आहे. कापडनिर्मिती उद्योगात कापसाचा उपयोग केला जातो. त्यामुळे देशातंर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाला मोठ्या प्रमाणात मागणी असते.
‘ही’ आहेत अन्य आघाडीवरील राज्य?
गुजरात हे राज्य देशातील कापूस उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असून, त्या ठिकाणी देशातील एकूण कापूस उत्पादनापैकी 20.55 टक्के कापूस उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्राप्रमाणेच गुजरातमध्ये देखील मोठ्या प्रमाणात शेतकरी कापूस पिकाची लागवड करतात. तर तिसऱ्या क्रमांकावर तेलंगणा हे राज्य असून, त्या ठिकाणी देशातील एकूण कापूस उत्पादनापैकी 16.94 टक्के कापूस उत्पादन घेतले जाते. याशिवाय देशातील एकूण कापूस उत्पादनापैकी 9.06 टक्के उत्पादनासह राजस्थान हे राज्य चौथ्या तर 6.56 टक्के कापूस उत्पादनासह कर्नाटक हे राज्य पाचव्या क्रमांकावर आहे.
5 राज्यांमध्ये 80 टक्क्यांहून अधिक उत्पादन
दरम्यान, देशातील वरील पाचही राज्यांमधील कापूस लागवडीखाली क्षेत्र हे दिवसेंदिवस विस्तारत असून, शेतकरी अधिकाधिक कापूस पिकाचे उत्पादन घेत आहेत. त्यामुळे देशातील एकूण कापूस उत्पादनापैकी या पाच राज्यांमध्ये दरवर्षी जवळपास 80 टक्क्यांहून अधिक कापूस उत्पादन मिळते. कापूस वेचणीनंतर त्यातील बिया काढल्यानंतर कापूस हा कापडनिर्मितीसाठी वापरला जातो. तर त्याच्या बियांपासून तेलनिर्मिती केली जाते.