हॅलो कृषी ऑनलाईन : ‘2023-24 च्या कापूस हंगामात (ऑक्टोबर 2023 ते सप्टेंबर 2024) देशातील शेतकऱ्यांकडून (Cotton Purchase) आतापर्यंत 2.50 लाख गाठी (1 गाठ = 170 किलो) कापूस खरेदी केला असून, यासाठी शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतींच्या दराने (Cotton Purchase) 900 कोटी रुपये देण्यात आले आहे.’ अशी माहिती भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) जाहीर केली आहे.
भारतीय कापूस महामंडळाने म्हटले आहे की, यावर्षीचा कापूस हंगाम सुरु झाल्यानंतर सुरुवातीच्या दोनच महिन्यात सरकारी खरेदीच्या (Cotton Purchase) माध्यमातून 900 कोटी रुपयांचा शेतकऱ्यांचा कापूस सरकारने खरेदी केला आहे. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र, मध्यप्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांतील शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किमतीद्वारे हा कापूस खरेदी करण्यात आला आहे. दरम्यान, यावर्षी केंद्र सरकारने उच्च प्रतीच्या कापसासाठी 7020 रुपये प्रति क्विंटल किमान आधारभूत किंमत जाहीर केली आहे. तर मध्यम दर्जाच्या कापसासाठी 6620 रुपये प्रति क्विंटल किमान आधारभूत किंमत निर्धारित करण्यात आली आहे.
हमीभावापेक्षा कमी दर (Cotton Purchase By Central Government)
गुजरात राज्य वगळता अन्य 10 प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये कापसाचे दर हे किमान आधारभूत किमतीपेक्षा खाली आले आहेत. त्यामुळे भारतीय कापूस महामंडळाने या राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात किमान आधारभूत किमतीने कापूस खरेदी केला आहे. कोरोना काळातही अशीच काहीशी परिस्थिती उद्भवली होती तेव्हा कापूस महामंडळाने तब्बल 65 हजार कोटी रुपयांचा कापूस हमीभावाने शेतकऱ्यांकडून खरेदी केला होता. जो नंतर बाजारात विक्री करण्यात आला. अशी माहिती भारतीय कापूस महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ललित कुमार गुप्ता यांनी दिली आहे. दरम्यान, देशात यावर्षी कापूस उत्पादनात घट होणार असून, ते 295 लाख गाठी इतके होण्याची शक्यता आहे. उत्पादनातील घटीमुळे दरात आगामी तेजी पाहायला मिळू शकते.