Cotton Rate : कापसाला हमीभाव मिळेना; राज्यात शेतकऱ्यांचा साठवणुकीवर भर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सध्या अपेक्षित दर (Cotton Rate) मिळत नाहीये. ज्यामुळे शेतकऱ्यांनी आपला कापूस साठवून ठेवण्यावर भर दिला आहे. मागील वर्षीही अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस साठवून ठेवला होता. मात्र गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांना सहा ते सात हजारांच्या आसपास दर मिळत आहे. 2021, 2022 मध्ये कापसाचे दर 12000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत वाढले होते. त्यामुळे सध्या राज्यात काही निवडक शेतकरी ठेवण्यास जागा नसल्याच्या मजबुरीमुळे आपला कापूस विक्री (Cotton Rate) करत असून, अनेक शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवण्यास प्राधान्य दिले आहे.

उत्पादन घटण्याची शक्यता (Cotton Rate Not Get MSP)

जगातील एकूण कापूस उत्पादनापैकी 22 टक्के कापसाचे उत्पादन होते. मात्र देशातील शेतकऱ्यांना आपल्या कापसाला योग्य दर न मिळणे ही शोकांतिका आहे. शेतकऱ्यांना येणाऱ्या काळात कापूस दरात तेजीची अपेक्षा असून, यावर्षी देशात कापूस उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय कापूस महामंडळाच्या आकडेवारीनुसार, देशात 2023-24 मध्ये 295.10 गाठी कापूस उत्पादन नोंदवले जाण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षी याच कालावधीत 318.90 लाख गाठी इतके नोंदवले गेले होते. अर्थात कापूस उत्पादनात 24 लाख गाठींनी कापूस उत्पादन घटणार आहे. परिणामी, अंदाजानुसार शेतकऱ्यांना आगामी काळात कापूस दरात तेजीची अपेक्षा असून, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी आपला कापूस साठवून ठेवला आहे.

एकरी उत्पादनातही घट

राज्यातील शेतकऱ्यांनी कापूस साठवणुकीचा पर्याय अवलंबण्यामागे उत्पादनात घट हे कारण आहेच. याशिवाय यावर्षी शेतकऱ्यांच्या एकरी उत्पादनातही यावर्षी घट नोंदवली गेली आहे. राजस्थान, हरियाणा, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश अशा सर्वच राज्यांमध्ये यंदा कापसाचे एकरी उत्पादन घटले आहे. त्यामुळे भविष्यात कापसाच्या दरवाढीला बळ मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

कापसाचा हमीभाव?

केंद्र सरकारने यावर्षी उत्तम प्रतीच्या कापसासाठी 7020 रुपये प्रति क्विंटल तर सामान्य दर्जाच्या कापसाला 6620 रुपये प्रति क्विंटल किमान आधारभूत दर निश्चित केला आहे. असे असले तरी सध्या राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कापसाला 5500 ते 6500 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे. हा दर शेतकऱ्यांना मान्य नसल्याने, परिणामी शेतकऱ्यांनी कापसाच्या साठवणुकीवर भर दिला आहे.

error: Content is protected !!