हॅलो कृषी ऑनलाईन : कापडनिर्मिती उद्योगासोबतच देशातील वैद्यकीय क्षेत्रातही दैनंदिनरित्या कापसाचा (Cotton Variety) मोठ्या प्रमाणात उपयोग होत असतो. हीच गरज लक्षात घेऊन नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने (सीसीआयआर) ‘सर्जिकल कापूस वाण’ विकसित केले आहे. वैद्यकीय व्यवसायाच्या क्षेत्रात घाणविरहित आणि स्वच्छ कापसाला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे या वाणाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण कापसाच्या उत्पादनासह शेतकऱ्यांना आर्थिक फायदा व्हावा, या हेतूने सीसीआयआर या वाणाची निर्मिती केली आहे. सर्जिकल कापूस वाणाची (Cotton Variety) विशेषतः म्हणजे त्यांची पाणी शोधून घेण्याची क्षमता ही अधिक आहे. त्यामुळे ते वैद्यकीय क्षेत्रासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.
कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी उपयुक्त (Surgical Cotton Variety Developed)
सीसीआयआरने विकसित केलेले हे ‘सर्जिकल कापूस वाण’ कोरडवाहू तसेच हलकी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तर स्वच्छतेच्या पातळीवर हे वाण अग्रस्थानी आहे. देशभरातील दवाखाने, क्लिनिक, मेडिकल अशा सर्वच वैद्यकीय ठिकाणी पांढऱ्याशुभ्र कापसाला मोठी मागणी असते. शेतातून वेचून आणलेल्या या कापसावर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर तो वैद्यकीय क्षेत्राच्या मागणीनुसार पाठवला जातो. त्यामुळे स्वच्छ अशा कापसाला वैद्यकीय क्षेत्रातून दरही अधिक मिळतो.
सर्जिकल कापूस वाणाची वैशिष्ट्ये
- या वाणाच्या धाग्याची गुणवत्ता 5.7 ते 6 ‘मायक्रोनेअर’ हून अधिक असते.
- कापडनिर्मिती साठी वापरल्यास या वाणाच्या कापसात 3.5 ते 4.5 मायक्रोनिअर असते.
- या वाणाचा कलर ग्रेड 74 ते 75 इतका आहे. त्यामुळे तो अतिशय पांढरा शुभ्र दिसतो.
- त्याच्या धाग्याची लांबी देखील 23 आहे.
- या वाणापासून मिळालेल्या कापसाची पाणी शोषण क्षमता इतर वाणांच्या तुलनेत 25 टक्के अधिक आहे.
- 120 ते 140 दिवसांमध्ये कापूस वेचणीला येतो.
- हेक्टरी 20 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते.
शेतकऱ्यांसाठी लवकरच उपलब्ध होणार
वैद्यकीय क्षेत्राची हीच गरज लक्षात घेऊन ‘सर्जिकल कापूस वाण’ विकसित करण्यात आले आहे. त्याच्या वैद्यकीय क्षेत्र आणि कापूस उत्पादक शेतकरी असा दोघांनाही मोठा फायदा होणार आहे. वर्षभर मागणी असणाऱ्या या कापसाचे उत्पादन घेतल्यास कोरडवाहू शेतकऱ्यांना नक्कीच चांगले दिवस येतील. नागपुरच्या कापूस संशोधन संस्थेकडून कापसाच्या या वाणाचे बियाणे शेतकऱ्यांसाठी लवकरच उपलब्ध केले जाणार आहे.