Cow Breeds : ‘या’ आहेत 9 प्रमुख विदेशी प्रजातीच्या गायी; एचएफ, जर्सी गायींची संख्या भारतात अधिक!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशातील डेअरी व्यवसायात (Cow Breeds) सध्या आमूलाग्र बदल पाहायला मिळत आहे. यापूर्वी देशात देशी गायींच्या मदतीने दूध उत्पादन होत होते. मात्र, गेल्या दशकभरात सोशल माध्यमांच्या अविष्कारामुळे अवघे जग जवळ येण्यास मदत झाली आहे. ज्यामुळे आता देश-विदेशातील माहिती एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. ज्यामुळे दूध उत्पादनासाठी शेतकऱ्यांना काही विदेशी गायींची माहिती मिळण्यास मदत होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण काही विदेशी गायींच्या प्रजातीबद्दल (Cow Breeds) जाणून घेणार आहोत.

काय असते वेगळेपण? (Cow Breeds For Dairy Farming)

विशेष म्हणजे भारतातील देशी गायी आणि विदेशी गायी (Cow Breeds) यांच्या शारीरिक ठेवणमध्ये वेगळेपण पाहायला मिळते. पशुपालन व्यवसायातील तज्ज्ञांच्या मते, विदेशी गायींचे कंबर हे पाठीसह सरळ असते. तर देशी गायींचे कंबर हे हाडांसह काहीसे वरती आलेले असते. आणखी एक विरोधाभास म्हणजे देशी गायीच्या मानेखाली पोळ लोंबकळत असते. तर विदेशी गायींना अशी पोळ लोंबकळताना दिसत नाही. देशभरात नोंदणीकृत 51 देशी गायी असून, त्यात गीर, साहीवाल, ब्रदी, राठी, कांकरेज, थारपारकर या प्रमुख गायीच्या जाती आहेत.

विदेशी गायी आणि त्यांची ओळख

1. एचएफ (होल्स्टीन फ्रिजियन) गाय – होल्स्टीन फ्रिजियन ही गायीची युरोपियन विदेशी जात (Cow Breeds) असून, ती सर्वसाधारणपणे दररोज 25 ते 50 लिटर इतके दूध देते. या प्रजातीच्या गायीच्या शरीरावर पांढरे आणि काळे ठिपके असतात. तिचे वजन 450 ते 650 किलोपर्यंत असते.

2. जर्सी गाय : जर्सी गाय ही गायीची ब्रिटिश विदेशी जात असून, ती दररोज 25 ते 35 लिटर इतके दूध देते. जर्सी गायीचा रंग हलका लाल आणि पिवळा असतो. तसेच तिचे वजन 400 ते 580 किलोपर्यंत असते.

3. चियानिना गाय – चियानिना जातीची विदेशी गाय इटलीची असून, ती प्रामुख्याने दररोज 12 ते 20 लिटर दूध देते. तिचा रंग पांढरा आणि राखाडी रंग असतो. तर अधिक उंच असलेली गाय म्हणून चियानिना गायीची ओळख आहे. तिचे वजन साधारणपणे 800 ते 1000 किलोपर्यंत असते.

4. ब्राउन स्विस गाय – ब्राउन स्विस ही अमेरिकन विदेशी गाय असून, ती दररोज 21 ते 29 लिटर दूध देते. तिचा रंग तपकिरी असतो. तर तिचे एकूण वजन हे 590 ते 640 किलोपर्यंत असते.

5. आयर शायर गाय – आयर शायर ही विदेशी गाय मूळची स्कॉटलंड देशातील असून, ती दररोज 20 ते 25 लिटर दूध देण्यास सक्षम असते. तिचा शरीरावर प्रामुख्याने पांढऱ्या रंगावर तपकिरी किंवा लाल ठिपके असतात. तर तिचे एकूण वजन हे 450 ते 600 किलोपर्यंत असते.

6. ग्वेर्नसे गाय – ग्वेर्नसे ही विदेशी गाय ब्रिटनमधील ग्वेर्नसी बेटावरील असून, ती दररोज 17 ते 23 लिटर दूध देते. तिचा रंग सोनेरी असतो. तर तिचे वजन हे 400 ते 500 किलोपर्यंत असते.

7. रेड डेन – रेड डेन ही विदेशी गाय उत्तर युरोपमधील असून, ती दररोज 12 ते 15 लिटर दूध देते. तिचा रंग गडद लाल असतो. तर तिचे एकूण वजन हे 600 ते 660 किलोपर्यंत असते.

8. गिरलांडो गाय – गिरलांडो ही विदेशी गाय ब्राझीलमधील असून, ती दररोज 50 ते 100 लिटर दूध देते. तिच्या पांढऱ्या रंगाच्या शरीरावर काळे डाग असतात. तर तिचे एकूण वजन हे 400 ते 500 किलोपर्यंत असते.

9. अमेरिकन ब्राह्मण गाय – अमेरिकन ब्राह्मण गाय ही दररोज दोन ते चार लिटर दूध देते. तिच्या शरीरावर मागील बाजूस उंच कुबड्या आणि मजबूत शरीर ही तिची सर्वात मोठी ओळख आहे.

भारतात एचएफ, जर्सी गायी सर्वाधिक

विदेशी गायींच्या वरील 9 प्रमुख जाती असल्या तरी भारतात प्रामुख्याने सर्वाधिक दूध उत्पादक शेतकरी एचएफ आणि जर्सी या जातीच्या गायी (Cow Breeds) पाळतात. विदेशी गायी या अधिक दूध देण्यास सक्षम असल्याने, त्यांच्या पालनाकडे भारतीय शेतकऱ्यांचा ओढा वाढत आहे. एचएफ आणि जर्सी या विदेशी प्रजातीच्या गायी प्रामुख्याने 50 ते 70 लीटरपर्यंत दूध देण्यास सक्षम असतात. मागील काही काळामध्ये देशातील प्रमुख स्पर्धांमध्ये एचएफ आणि जर्सी या जातींच्या गायींनी आतापर्यंत 76-77 लीटर दूध दिल्याचे समोर आले आहे. मात्र, गुणवत्तेच्या पातळीवर देशी गायींच्या तुलनेत विदेशी गायींचे दूध कमजोर मानले जाते.

error: Content is protected !!