हॅलो कृषी ऑनलाईन : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अशा नुकसानग्रास्त शेतकऱ्यांना पिक विमा (Crop Insurance) योजनेच्या माध्यमातून मिळणारा विम्याचा लाभ पिक विमा कंपनीने तत्काळ वाटप करावा. जेणे करून शेतकऱ्यांना योग्य वेळेत आर्थिक मदत प्राप्त होईल अशी अंमलबजावणी करावी, अशा सूचना नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी पीक विमा योजनेच्या (Crop Insurance) आढावा बैठकीत संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.
सर्व बँकांनी नियोजन करावे (Crop Insurance In Nashik District)
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना व पीक विमा योजना (Crop Insurance) या योजनांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री भुसे बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील ज्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणीमुळे लाभ मिळाला नव्हता, त्यांना निकषानुसार लाभ देण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. त्या अनुषंगाने सर्व बँकांनी शाखा निहाय या योजनेचा लाभ आवश्यक त्या सर्व शेतकरी लाभार्थ्यांना होईल, यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात यावे. असेही पालकमंत्री दादा भुसे यांनी म्हटले आहे. यावेळी जिल्ह्याच्या कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते.
याशिवाय मुख्य बँकेने सर्व बँकांना सूचित करावे की, विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व इतर लाभार्थ्यांना मिळणाऱ्या लाभाची रक्कम ही इतर कोणत्याही कारणास्तव वळती करू नये. त्याचप्रमाणे पंतप्रधान पिक विमा योजनेत जिल्ह्यातील साधारण 5 लाख 88 हजार 648 शेतकरी सहभागी झाले आहे. यातील काही शेतकऱ्यांना आतापर्यंत पिक विमा कंपनीने 57 कोटी 46 लाखंची विमा रक्कम वाटप केली आहे. यातील उर्वरित शेतकऱ्यांना देखील लवकरात लवकर विमा रकमेचे वाटप करण्यात यावे. अशा सूचनाही दादा भुसे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. याशिवाय सोयाबीन, मका व बाजरी या पिकांसोबतच कापूस पिकाचा योजनेत समावेश करून, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना देखील पिक विमा योजनेचा लाभ उपलब्ध करून द्यावा, असे निर्देशही भुसे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले आहेत.