Crop Management: हवामान बदलानुसार पुढील आठवड्यात असे करा पीक व्यवस्थापन  

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: वातावरणातील बदलानुसार पिकांचे व्यवस्थापन (Crop Management) करणे गरजेचे असते.हवामान विभागाने मराठवाडयात 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे किमान तापमानात 7 व 8 ‍फेब्रुवारी रोजी 1 ते 2 अंश सेल्सिअसने घट होऊन त्यानंतर किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. अशा वातावरणात वेगवेगळ्या पिकांचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. जाणून घेऊ या पुढील आठवड्यासाठी पिकांचे व्यवस्थापन (Crop Management).

शेतपीक व्यवस्थापन (Crop Management)

 • मराठवाड्यात 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता लक्षात घेता काढणीस तयार असलेल्या तूर पिकाची लवकरात लवकर काढणी करून घ्यावी व मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. 
 • कमाल तापमानात झालेली वाढ व पुढील तीन दिवसात कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज लक्षात घेता, रब्बी ज्वारी पिकास फुलोरा येण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 70 ते 75 दिवस) व कणसात दाणे भरण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 90 ते 95 दिवस) पाणी द्यावे.
 • दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या रब्बी ज्वारी पिकांचे पक्षांपासून संरक्षण करा.
 • कमाल तापमानात झालेली वाढ व पुढील तीन दिवसात कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज लक्षात घेता, गहू पिकास दाण्यात दुधाळ पीक अवस्था (पेरणी नंतर 80 ते 85 दिवस) व दाणे भरताना (पेरणीनंतर 90 ते 95 दिवस) पाणी द्यावे.
 • गव्हाच्या पिकात उंदरांचा प्रादुर्भाव दिसून असल्यास व्यवस्थापनासाठी  झिंक फॉस्फाईड 1 भाग + गूळ 1 भाग + 50 भाग गव्हाचा भरडा व थोडे गोडेतेल मिसळून हे मिश्रण उंदराच्या बिळात टाकून बि‍ळे बंद करावीत. 
 • उन्हाळी भुईमुग पिकाची पेरणी लवकरात लवकर पूर्ण करावी. पेरणीपूर्वी पुढील प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. थायरम 3 ग्रॅम किंवा बाविस्टीन 2 ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम प्रति किलो बियाणे. किंवा  प्रति 10 किलो बियाण्यास रायझोबियम व पी.एस.बी. प्रत्येकी 250 ग्रॅम किंवा द्रव स्वरुपात असेल तर प्रत्येकी 60 मिली.

फळबागा व्यवस्थापन (Fruit Crop Management)

 • कमाल तापमानात झालेली वाढ व पुढील तीन दिवसात कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज लक्षात घेता, केळी, आंबा व द्राक्ष बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. केळी बागेत पोटॅशियम 50 ग्रॅम प्रति झाड खतमात्रा द्यावी.
 • फुलधारणा अवस्थेत असलेल्या आंबा फळ बागेत परागीकरण व्यवस्थित होण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या कीटकनाशकाची फवारणी करू नये.
 • द्राक्ष बागेत फळांचा आकार वाढण्यासाठी द्राक्ष घड जिब्रॅलिक ॲसिड 200 मिली ग्रॅम प्रति 10 लिटर द्रावणात बुडवावे.

भाजीपाला पिके व्यवस्थापन (Vegetable Crop Management

 • भाजीपाला पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.
 • कमाल तापमानात झालेली वाढ  व पुढील तीन दिवसात कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज लक्षात घेता, भाजीपाला पिकास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.
 • काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

फुलशेती व्यवस्थापन (Flower Crop Management)

 • पुढील आठवड्यात असलेल्या व्हॅलेंटाइन्स-डे मुळे बाजार पेठेत गुलाब फुलांना अधिक मागणी असते काढणीस तयार असलेल्या गुलाब फुलांची काढणी टप्प्या टप्प्याने करून बाजारपेठेत पाठवावी.
 • कमाल तापमानात झालेली वाढ व पुढील तीन दिवसात कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज लक्षात घेता, फुल पिकास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.
error: Content is protected !!