Crop Rotation: जमिनीच्या सुपीकतेसाठी गरजेचे आहे पीक फेरपालट; जाणून घ्या महत्व आणि पद्धती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: एकाच जमिनीत दोन किंवा अधिक पिके (Crop Rotation) एका विशिष्ट क्रमाने घेणे या पध्दतीला पिकांची फेरपालट किंवा बेवड करणे असे म्हणतात. एकाच जमिनीत तेच तेच पीक वर्षानुवर्षे घेतले गेले म्हणजे पीक चांगले येत नाही, किडी आणि रोगाचा प्रादुर्भाव वाढतो, व जमिनीची सुपीकता सुद्धा कमी होते.

रसायने आणि पाण्याचा अनियंत्रित वापर यामुळे जमिनी क्षारपड होत आहेत. यावेळी हिरवळीची खते, शेंगवर्गीय पिके जी जमिनीला नत्र पुरविण्यासाठी सहाय्यक ठरतात अशा पिकांची फेरपालट (Crop Rotation) म्हणून  लागवड शेतात केल्यास जमिनीचे भौतिक रासायनिक गुणधर्म सुधारण्यास मदत होते.

बहुतेक शेतकरी याबाबत जागरूक आहेत परंतु अजूनही बऱ्याच शेतकर्‍यांना पीक फेरपालटीचे महत्व माहित नाही, किंवा कोणत्या पिकासोबत कोणते पीक फेरपालट करावे याबाबत योग्य माहिती उपलब्ध नाही. या लेखात पीक फेरपालट (Crop Rotation) पद्धती याबाबत सविस्तर जाणून घेऊ या.

पीक फेरपालट करण्याचे फायदे ( Advantages of Crop Rotation)

  • शेतात वर्षभर करायच्या कार्याचे संतुलन सुनिश्चित होते.
  • जमिनीतील सेंद्रिय पदार्थ टिकून राहते त्यामुळे मातीची सुपीकता राखली जाते आणि सुधारते.
  • जमिनीची धूप थांबण्यास मदत करते व जमिनीतील ओलावा टिकून राहते.
  • विशिष्ट पिकांवर येणारे हानिकारक रोग, कीड, कीटक, सुत्रकृमी आणि तण यांचे व्यवस्थापन करता येते.  
  • विविध पिकांचे योग्य व्यवस्थापन करता येते. शेतकर्‍यांच्या घरगुती गरजा पूर्ण करता येतात.
  • शेतकर्‍यांकडे उपलब्ध असलेल्या संसाधनांचा योग्य वापर केला जातो.
  • कीड, पतंग आणि रोग यांच्या हल्ल्यापासून पिकांचे संरक्षण होते, त्यामुळे खर्च कमी होऊन जास्त उत्पादन मिळते.

पीक फेरपालटीची तत्त्वे (Principles of Crop Rotation)

शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनीवर पिके अशा क्रमाने घेणे गरजेचे आहे ज्यामुळे पिकांचे उत्पादन तर चांगले येईल सोबतच जमिनीची सुपीकता सुद्धा टिकून राहील. वेगवेगळ्या पिकांसाठी फेरपालट ठरवताना  खालील तत्त्वे लक्षात ठेवावीत

  • खोल मुळे असलेली पिके घेतल्यानंतर कमी खोल मुळे असलेली पिके घेणे गरजेचे आहे, यामुळे मातीच्या वेगवेगळ्या पृष्ठभागावरील पोषक द्रव्ये आणि आर्द्रता पिके शोषून घेऊ शकतात.
  • तृणधान्ये जमिनीतील नायट्रोजन शोषून माती कमकुवत करतात, तर कडधान्य पिकांच्या मुळांमध्ये आढळणारे रायझोबियम जीवाणू यांच्यामार्फत वातावरणातील मुक्त नायट्रोजन जमिनीत स्थिर करून जमिनीची सुपीकता वाढवतात. त्यामुळे कडधान्य पिकांनंतर तृणधान्ये पिके घेतल्यास जमिनीची सुपीकता टिकून राहते.
  • ज्या पिकांना जास्त प्रमाणात खते लागतात अशा पिकांनंतर कमी खताची गरज असणार्‍या पिकांची लागवड करावी. असते. यामुळे जमिनीवर जास्त ताण पडत नाही व सुपीकता टिकते.
  • ज्या पिकांना जास्त पाणी लागते अशा पिकांनंतर कमी पाणी लागणारी पिके घ्यावीत. अधिक पाणी पिणारी पिके सतत घेतल्याने जमिनीत हवेचा संचार थांबते यामुळे मुळांच्या वाढीवर आणि मातीतील जीवाणूंच्या क्रियेवर हानिकारक परिणाम होतो.
  • पीक फेरपालट चक्र ठरवताना त्यात अशा पिकांचा समावेश करावा ज्याद्वारे शेतकर्‍याकडे असलेले मजूर, सिंचन, खते, बियाणे, पैसा इत्यादी संसाधनाचा योग्य वापर करता येईल. शेतकर्‍याला गरजेनुसार धान्य, भाजीपाला, कडधान्ये सोबतच या पिकांच्या विक्रीतून रोख रक्कम सुद्धा मिळेल. शेतकर्‍यांच्या जनावरांसाठी चाऱ्याची सोय होईल अशा पिकांचा अंतर्भाव सुद्धा करावा.  
  • एकाच वर्गाची पिके घेतल्यास अशी पिके एकाच प्रकारचे कीटक, रोग आणि पतंगांना बळी पडतात व त्यांची संख्या सुद्धा वाढते त्यामुळे दरवेळेस भिन्न वर्गाच्या पिकाची लागवड करावी.  
  • पीक फेरपालट चक्र तयार करताना माती आणि हवामान लक्षात घेऊन पिकांची निवड करावी.

पीक फेरपालट प्रकार (Types of Crop Rotation)

एक वर्षाचे पीक फेरपालट

मका – बटाटा – तंबाखू

मका – गहू किंवा बार्ली

ज्वारी – बरसीम

मका – बटाटा – कांदा

ज्वारी – गहू

ज्वारी – गहू – चवळी किंवा मूग

भात – गहू – चवळी किंवा मूग

मका – गहू + हरभरा

ज्वारी – वाटाणा

भात – लाखाची डाळ (लॅथिरस)

ज्वारी – हरभरा

रागी किंवा नाचणी – हरभरा किंवा वाटाणा

दोन वर्षाचे पीक फेरपालट

मका – बटाटा, ऊस

ज्वारी – वाटाणा, ऊस

कापूस – वाटाणा, बाजरी – हरभरा

ज्वारी – हरभरा, मका – गहू

ज्वारी + गवार शेंग – हरभरा, बाजरी – मसूर

भात – वाटाणा, भात – हरभरा

मका – बटाटा, हिरवळीची खते – गहू

गहू – कापूस, ऊस

भात – गहू, मका – बटाटा

तीन वर्षाचे पीक फेरपालट

कापूस – मेथी, ज्वारी – गहू, ऊस

भुईमुग – वाटाणा, ऊस, मूग – गहू

भात – वाटाणा, ताग, ऊस

ज्वारी – तूर – गहू, तीळ – जवस

ज्वारी – वाटाणा, ऊस, खोडवा

चार वर्षाचे पीक फेरपालट

कापूस – मेथी, ऊस, खोडवा, ज्वारी – गहू

error: Content is protected !!