हॅलो कृषी ऑनलाईन : मुंबई येथे महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यावेळी राज्य कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी पीकविमा योजनेसंदर्भात माहिती दिली. यावेळी ते म्हणाले “पीकविमा योजनेची जनजागृती ही तळागळापर्यंतच्या झाली आहे. शिवाय शेतकऱ्यांना ह्या योजनेची माहिती झाली आहे. त्यामुळेच यंदा राज्यातील तब्बल 41 लाख शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून योजना राबवली जात असली तरी राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला ही अभिमानास्पद बाब” असल्याचे राज्यकृषि मंत्रा दादा भुसे यांनी स्पष्ट केले आहे.
हिवाळा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांना मदतीबाबत विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असताना उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिलेली आहे.
2300 कोटी रुपये राज्य सरकारकडून विमा कंपन्यांना
यंदाच्या वर्षात नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, योजनेतील जनजागृतीमुळे या योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढत आहे. योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांना होत असला तरी यंदा तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास उशिर झाला होता. शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळावी त्याअनुशंगाने राज्य सरकारने 2 हजार 300 कोटी रुपये विमा कंपनींना देण्यात आले होते. या मदतीमध्ये राज्य सरकारचीही मोठी भूमिका आहे. प्रतिकूल परस्थितीमध्येही राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात विमा कंपनींना रक्कम अदा केली होती.
2 हजार 400 कोटी रुपयांचे वाटप
राज्यातील तब्बल 41 लाख शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग नोंदवला होता. पावसामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याचप्रमाणात शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली आहे. 10 विमा कंपन्यांना राज्य सरकारने 2 हजार 400 कोटी रुपये हे अदा केले आहेत तर त्याचप्रमाणात केंद्र सरकारनेही विमा कंपन्यांना पैसे अदा केले आहेत. त्यामुळेच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई ही मिळालेली आहे.
विमा कंपन्याच्या मनमानी कारभारामुळे विलंब
शेतकऱ्यांना वेळेत पैसे अदा करण्याबाबत राज्य आणि केंद्र सरकारने सुचना केल्या होत्या पण काही विमा कंपन्यांनी आडमुठी भूमिका घेतल्याने विम्याचा परतावा मिळण्यास विलंब झाला होता. दरम्यान, राज्य कृषिमंत्री तसेच कृषी आयुक्त यांनी वेळोवेळी बैठका घेऊन सुचना केल्या होत्या. वेळप्रसंगी केंद्राकडेही याबद्दल तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या 10 दिवसांपासून प्रत्यक्ष नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरवात झाली.