Dairy Business : दुबईहून स्वदेशी परतले, 50 गायींपासून सुरुवात; आज आहे 340 गायी, 110 म्हशींचा गोठा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात सध्या डेअरी व्यवसायासोबत जोडल्या गेलेल्या शेतकऱ्यांची संख्या (Dairy Business) मोठ्या प्रमाणात आहे. विशेष म्हणजे या व्यवसायामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आपला चांगलाच जम बसवला असून, काही शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नफा मिळवत आहे. आज आपण अशाच एका उच्चशिक्षित दूध उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा (Dairy Business) पाहणार आहोत.

धरली मायभूमीची वाट (Dairy Business Farmer Success Story)

अजित त्रिपाठी असे या तरुण शेतकऱ्याचे नाव असून, ते उत्तरप्रदेशातील अलाहाबाद येथील रहिवासी आहेत. विशेष म्हणजे अजित त्रिपाठी दुबई या ठिकाणी चांगला व्यवसाय करत होते. मात्र, विदेशात मन रमत नसल्याने, त्यांनी आपल्या मायभूमीची वाट धरली. त्यांनी आपल्या पंडार गावात डेअरी फार्म स्थापन केला. आज संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातही त्यांच्या ‘श्री गंगाधाम गोशाळेच्या प्युअर देसी दुधाची’ चर्चा आहे. त्रिपाठी यांनी दुग्धव्यवसाय या कठीण समजल्या जाणाऱ्या क्षेत्रातील आव्हान स्वीकारले आणि त्यात यशस्वीही होऊन दाखविले.

50 जनावरांसह दुग्ध व्यवसायाला सुरुवात

अजित त्रिपाठी यांनी एमबीए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून, 2013 मध्ये ते काका प्रदीप त्रिपाठी यांच्या दुबईतील मोबाइल व्यवसायात सामील झाले. अजित यांनी मस्कतमध्ये सुमारे तीन वर्षे मोबाइलचा व्यवसाय सांभाळला. शेवटी, अचानक मोबाईल व्यवसायातून दुग्ध व्यवसायाकडे (Dairy Business) उडी घेतली. यावर त्रिपाठी म्हणतात की, 2016 मध्ये जेव्हा ते काकांशी त्यांच्या गावाची आणि घराची चर्चा करत होते. तेव्हा त्यांच्या मनात दुग्ध व्यवसायाची कल्पना सुचली. त्यानुसार त्यांनी 2016 मध्ये पंडारा गावात 50 जनावरांसह ‘श्री गंगाधाम गोशाळेची’ स्थापना केली.

आज 450 जनावरांचा गोठा

अजित त्रिपाठी यांनी 24 बिघा क्षेत्रामध्ये गोठ्याची स्थापना केली आहे. 24 बिघा क्षेत्रात पसरलेल्या या डेअरी फार्ममध्ये आधुनिक सुविधा आणि सुसज्ज मशीन्स आहे. गोशाळेत 8 बिघा परिसरात दोन 250X300 फूट शेड आहेत, जिथे गाई आणि म्हशी ठेवल्या जातात. अवघ्या तीन वर्षात त्यांच्या गोठ्यातील जनावरांची संख्या 50 वरून 450 पर्यंत वाढली आहे. त्यामध्ये 340 गायी आणि 110 म्हशी आहेत. सुरुवातीला सुमारे दीड कोटी रुपये खर्च आला होता. तो आता 10 कोटीहून अधिक झाला आहे. तरीही लवकरच आणखी काही जनावरे वाढवण्याचा विचार केला जात आहे. असे त्यांनी म्हटले आहे.

अत्याधुनिक सुविधांनीयुक्त गोठा

अजित त्रिपाठी यांच्या या आधुनिक डेअरी फार्ममध्ये प्रत्येक व्यवस्था आहे. त्रिपाठी यांनी फक्त गायींना राहण्यासाठी शेडच बांधले नाही, तर त्यामध्ये फॉगर सिस्टीम, पंखे इ. सुविधा आहेत. जनावरांसाठी गोठ्याच्या आत एक मोठा तलावही बांधण्यात आला असून, येथे गाई-म्हशी उन्हाळ्यात तासन् तास अंघोळ करतात. सध्या जनावरांची संख्या वाढल्याने अत्याधुनिक दूध पार्लर उभारण्यात आले आहे. या मिल्क पार्लरमध्ये 40 हून अधिक गायींचे दूध एकाच वेळी काढले जाऊ शकते आणि थेट बीएमसीमध्ये पाईपद्वारे संकलित केले जाते. गोठ्यात प्रत्येकी 1,000 लिटरच्या दोन बीएमसी आहेत.

error: Content is protected !!