हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशभरात दूध उत्पादक (Dairy Business) शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दुग्ध व्यवसाय करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांची सर्वात मोठी समस्या असते, ती जातिवंत दुधाळ गाय किंवा म्हैस यांची खरेदी करणे होय. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाचा शिरकाव डेअरी व्यवसायामध्ये देखील झाला असून, शेतकऱ्यांना आधुनिक साधनांच्या मदतीने सुरक्षितरित्या सहज दुधाळ जनावरांची खरेदी-विक्री करता येत आहे. आज आपण दिल्ली आयआयटीमधून शिक्षण घेतलेल्या दोन तरुणींच्या यशस्वी ‘ऑनलाईन जनावरे विक्री’ व्यवसायाबद्दल (Dairy Business) जाणून घेणार आहोत.
शिक्षणाचा उपयोग शेतकऱ्यांसाठी (Dairy Business Cows And Buffaloes Purchase)
नीतू यादव आणि कीर्ति जांगडा असे या दोघी तरुणींचे नाव असून, त्यांनी आयआयटी दिल्ली येथून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर या दोघींनी इतर विद्यार्थ्यांप्रमाणे नोकरीच्या मागे न लागता, 2019 साली काहीतरी व्यवसाय (Dairy Business) करावा. असा विचार केला. त्यातूनच शेतकऱ्यांना काहीतरी मदत होईल, या उद्देशाने दोघी मैत्रिणींनी आपल्या शिक्षणाचा वापर करण्याचा निर्धार केला. यासाठी बराच विचार केल्यानंतर ऑगस्ट 2019 मध्ये त्यांनी जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी एक अँप लॉन्च केले.
काय आहे हे अँप?
‘एनिमल’ या नावाने सुरु केलेल्या वेबसाइट आणि अँपच्या मदतीने शेतकऱ्यांना सहज जातिवंत गाय, म्हैस विकत घेता येतात. विशेष म्हणजे नीतू यादव आणि कीर्ति जांगडा या दोघींनी तयार केलेल्या या अँपला अर्थपुरवठा करण्यासाठी आतापर्यंत अनेक नामांकित कंपन्या व संस्था पुढे आल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये सिकोइया, नेक्सस, एसआईजी, ओम्निवोर, बीनेक्स्ट आणि रॉकेटशिप यांचा समावेश आहे.
550 कोटींचा टर्नओव्हर
कर्नाटकातील बंगळुरू येथून या दोघींनी एका छोट्याशा खोलीमधून आपल्या व्यवसायाची सुरुवात केली होती. आज त्यांचा व्यवसाय देशभरात 550 कोटींचा टर्नओव्हर करत आहे. विशेष म्हणजे 2019 मध्ये हे अँप सुरु झाल्यानंतर मागील 5 वर्षात या अँपच्या मदतीने, देशभरात एकूण 4000 कोटी किमतीच्या 8.5 लाख जनावरांची विक्री करण्यात आली आहे.
जोडलेत 80 लाख शेतकरी
सध्याच्या घडीला एनिमल या जनावरे खरेदी-विक्री (Dairy Business) अँपसोबत देशभरातील 80 लाख शेतकरी जोडले गेले आहे. तर आतापर्यंत या अँपच्या माध्यमातून आतापर्यंत 8.5 लाख जनावरांची विक्री करण्यात आली आहे. नीतू यादव आणि कीर्ति जांगडा सांगतात, या अँपची निर्मिती करण्याची प्रेरणा आपल्याला अमेझॉन आणि फ्लिपकार्टमुळे सुचली होती. आपल्या या अँपच्या मदतीने शेतकरी आपल्या जवळच्या 100 किलोमीटरच्या आतील भागातील शेतकऱ्यांची जनावरे खरेदी करू शकतात. विशेष म्हणजे आपण अँपच्या माध्यमातून शेतकरी ते शेतकरी संपर्क ठेवल्याने, यातून शेतकऱ्यांना सुरक्षितता मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले अँप
कीर्ती आणि नीतू या दोघी तरुणी सांगतात, देशातील शेतकऱ्यांच्या (Dairy Business) जीवनात समृद्धी आणण्यासाठी आपण हा व्यवसाय सुरु केला. मात्र, आज तो एका मोठ्या वटवृक्षाच्या स्वरूपात पुढे आला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना आपली जनावरे विक्री करणे सोपे झाले आहे. तर ज्या गरजू शेतकऱ्यांना जातिवंत जनावरांची गरज असते. अशा शेतकऱ्यांना खरेदीसाठी हे अँप वरदान ठरले आहे.