Dairy Export : दुधाला चांगला भाव मिळेल; पण सरकारला ‘हे’ करावे लागेल – सोढी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : “भारत जगात दूध उत्पादनात अग्रस्थानी आहे. मात्र दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीत (Dairy Export) भारताचे स्थान खूपच मागे आहे. परिणामी, भारतीय शेतकरी दुधाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन तर करत आहेत. परंतु हे दूध देशाबाहेर जात नसल्याने, शेतकऱ्यांना अगदी कमी दर मिळत आहे. देशातील डेअरी व्यवसायात काही सुधारणा केल्यास त्यात नक्कीच बदल होऊ शकतो.” असे इंडियन डेअरी असोशिएशनचे अध्यक्ष आणि अमूल या नामांकित दूध उत्पादक संघाचे माजी व्यवस्थापकीय संचालक आर.एस. सोढी यांनी म्हटले आहे. एका नामाकिंत वृत्तसमूहाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी डेअरी व्यवसायातील (Dairy Export) समस्यांबाबत प्रदीर्घ चर्चा केली, त्यावेळी ते बोलत होते.

रशियाने थांबवलीये दुग्धजन्य उत्पादने (Dairy Export Milk Will Fetch Good Price)

डेअरी व्यवसायासंदर्भात अशा अनेक गोष्टींच्या समस्या आज शेतकऱ्यांना जाणवत आहेत. या समस्या सोडविल्यास दूध आणि दूध प्रक्रियाकृत उत्पादनांच्या निर्यातीत (Dairy Export) वाढ होऊन, देशातील डेअरी उत्पादनांच्या निर्यातीला बळ मिळेल. असेही त्यांनी म्हटले आहे. सध्याच्या घडीला रशिया हा देश दूध पावडरचा सर्वात मोठा खरेदीदार देश आहे. मात्र, भारतीय दुधाळ जनावरांना होणाऱ्या एफ्लाटॉक्सिन रोगामुळे त्यांनी भारतीय दुग्धजन्य पदार्थांची निर्यात थांबवली आहे. रशियाच्या पशुचिकित्सक नियंत्रण पथकाने भारताच्या दुग्धजन्य पदार्थांची निर्यात मागील काही वर्षांपासून थांबवून ठेवली आहे.

‘या’ देशांकडूनही मिळतोय नकार

याशिवाय भारतात दुधाळ जनावरांना होणाऱ्या लाळ्या-खुरकत रोगामुळे देखील अनेक देशांनी भारतीय दुधजन्य पदार्थांच्या निर्यातीला स्थगिती दिली आहे. विशेष करून दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीच्या बाबतीत अधिक मागणी असलेल्या दक्षिण अफ्रीका, मेक्सिको, व्हेनेझुएला यांसारख्या देशांसोबत देखील भारताचे चांगले संबंध नाहीत. असेही आरएस सोढी यांनी म्हटले आहे. चीन, इंडोनेशिया आणि मलेशिया या देशांसोबत देखील भारतीय दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीसाठी संबंध सुधारण्याची गरज आहे. असेही सोढी यांनी म्हटले आहे.

कोणत्या गोष्टींवर काम करण्याची गरज?

  • निर्यात वाढीसाठी सर्वप्रथम सरकारने देशातील दुधाळ जनावरांच्या रोगांवर नियंत्रण मिळवण्याची गरज आहे.
  • याशिवाय दुसऱ्या देशांसोबत डेअरी व्यवसायाबाबत व्यापारिक संबंध सुधारणे आवश्यक आहे.
  • आपल्या दुग्धजन्य पदार्थांची निर्यात करताना जागतिक मानके पाळली जावीत. अन्यथा आंतरराष्ट्रीय बाजारात नाव खराब होऊन निर्यात वाढीस फटका बसू शकतो.
  • आपल्या दुग्धजन्य पदार्थांच्या निर्याती दरम्यान ब्रॅण्डिंग आणि लेबलिंगवर विशेष भर द्यावा लागेल.
  • शेतकऱ्यांना जातिवंत दुधाळ जनावरांची उपलब्धता करून देणे गरजेचे आहे.
  • शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादन खर्चात कपात करण्यासाठी चाऱ्याचे सुयोग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. ज्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होईल.
  • या आणि आणखी अन्य देखील सुधारणांवर काम करण्याची गरज असल्याचे सोधी यांनी म्हटले आहे.
error: Content is protected !!