Dairy Farming : गायीच्या दुधात होईल 10 टक्के वाढ; करा ‘हे’ सोपे उपाय!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची (Dairy Farming) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. इतकेच नाही तर दूध उत्पादक शेतकरी कालानुरूप हायटेक होताना दिसत आहे. मात्र, राज्यात एक किंवा दोन गायीच्या माध्यमातून डेअरी व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना गायीची धार काढण्यासाठी मिल्किंग मशीन तसे परवडणारे नसते. ज्यामुळे महाराष्ट्रात सध्या तरी हाताने धार काढणारे शेतकरी अधिक आहे. मात्र, धार काढणे ही देखील अनुभवातून जमणारी गोष्ट असते. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने गायीची धार काढत असाल तर तुमच्या दररोजच्या दूध उत्पादनात मोठी घट होऊ शकते. त्यामुळे शक्यतो नवख्या दूध उत्पादकांनी (Dairy Farming) काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. याबाबत आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.

क्षमतेनुसार 2-3 वेळा धार आवश्यक (Dairy Farming Increase Cow Milk)

राज्यात सध्या दूध उत्पादक शेतकऱ्यांकडे (Dairy Farming) सर्वाधिक होलस्टीन फ्रिजियन (एचएफ) या गायी आढळतात. तुमची गाय जर दिवसाला 10 लिटरच्या आत दूध देत असेल. तर अशा गायीची दिवसातुन दोन वेळा धार काढणे आवश्यक असते. काही गायी या दिवसाला 10 लिटरहून अधिक दूध देतात. तेव्हा अशा 10 लिटरहून अधिक दूध देणाऱ्या गायीची 24 तासांमध्ये तीन वेळा धार काढली गेली पाहिजे. ज्यामुळे तुम्हाला दूध उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. अन्यथा अशा गायीचे दूध तीन वेळा न काढले गेल्यास तुम्हाला दूध उत्पादनात दररोज 10 टक्केपर्यंत फटका बसू शकतो. गायीच्या दूध देण्याच्या क्षमतेनुसार ही ट्रिक वापरल्यास तुम्हाला दूध उत्पादनात वाढ दिसून येईल.

ठराविक जागा निश्चित असावी

धार काढण्याचा अनुभव असेल अशा व्यक्तींनीच गाय दुहणे आवश्यक असते. मात्र, तुम्ही नवखे असाल तर काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. जेणेकरून तुमच्या दूध उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. धार काढताना शक्यतो शांत वातावरणात दूध काढावे, आजूबाजूला कोणताही गोंगाट किंवा अन्य जनावराचा त्रास होणार नाही. अशा ठिकाणी गाय दुहने आवश्यक असते. रोजची एक ठराविक जागा निश्चित असावी. या गोष्टीची काळजी घेतल्यास तुम्हाला दूध उत्पादनात वाढ दिसून येईल. तुम्ही धार काढण्याच्या पद्धतीत रोजच्या अनुभवातून सुधारणा करू शकतात.

धार काढताना हाताचा उपयोग

शास्त्रोक्त अर्थात पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीने धार काढताना प्रामुख्याने चार बोटे एका बाजूने आणि अंगठा दुमडलेला असावा. अशा पद्धतीने हाताची रचना ठेऊन धार काढणे आवश्यक असते. ज्यामुळे गायीला दुहताना तिचे वासरू दूध पीत असल्यास अनुभव होतो. ज्यामुळे ती धार काढताना अधिकाधिक दूध बाहेर सोडण्याचा प्रयत्न करते. ज्यामुळे तुम्ही देखील या बारीसारीक गोष्टीची काळजी घेतल्यास तुम्हाला नक्कीच 10 टक्क्यांपर्यंत दूध उत्पादनात वाढ झालेली दिसून येईल.

error: Content is protected !!