Dairy Farming : जनावरांना होऊ शकतो फऱ्या रोग; वाचा, ‘या’ जीवघेण्या आजारावरील उपाय!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची (Dairy Farming) संख्या मोठी आहे. शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात दुधाचे उत्पादन घेतले जाते. मात्र डेअरी व्यवसाय करताना जनावरांच्या आहारासोबतच त्यांच्या आरोग्याकडे देखील लक्ष देणे तितकेच आवश्यक असते. दुधाळ जनावरांना शेतकरी खूप जपत असतात. मात्र, कधी-कधी जनावरांकडे दुर्लक्ष झाल्यास, ते अनेक आजारांचे शिकार होतात. जनावरांना होणारा ‘फऱ्या रोग’ हा देखील त्यापैकीच एक आहे. ‘फऱ्या रोग’ हा जनावरांना होणारा जीवघेणा आजार असून, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे दुधाळ जनावर (Dairy Farming) दगावण्याची देखील भीती असते. त्यामुळे हा आजार नेमका काय आहे? या आजाराची लक्षणे काय आहेत? आणि या आजारावर नेमके काय उपाय आहेत? याबाबत आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

कसा होतो ‘फऱ्या रोग’? (Dairy Farming Black Quarter Disease Solution)

फऱ्या रोगास प्रामुख्याने अवकाळी पाऊस किंवा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जनावरे बळी पडतात. हा रोग मातीमध्ये असलेल्या क्लोस्ट्रीडियम चाउवोई या जिवाणूमुळे जनावरांना होतो. हा जिवाणू मातीमध्ये वर्षानुवर्षे जिवंत असतो. पाऊस झाल्यानंतर जनावरास शरीरावर किंवा पायांना थोडी जरी जखम होऊन रक्त निघालेले असेल तर मातीमधील हा जिवाणू त्या जखमेच्या ठिकाणाहून जनावरास बाधित करतो. मागील आठवड्यात राज्यातील अनेक भागांमध्ये विशेषतः विदर्भ-मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह जोरदार अवकाळी पाऊस झाला. याशिवाय चालू फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देखील राज्यावर अवकाळी पावसाचे संकट असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अशा अवकाळी पावसाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या दुधाळ जनावरांना (Dairy Farming) जपणे हा त्यावरील सर्वोत्तम उपाय आहे. इतकेच नाही तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये देखील जनावरांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव अधिक असल्याचे पाहायला मिळते.

काय आहेत या रोगाची लक्षणे?

जनावरांना हा फऱ्या रोग झाल्यास त्यांचे शरीराचे तापमान 107 डिग्रीपर्यंत पोहचते. अर्थात जनावरास तीव्र ताप येतो. या आजारात संबंधित जनावर चारा किंवा पाणी पिणे सोडते. याशिवाय हा रोग झालेल्या जनावराचे सर्व मागील पुढील पाय सुजतात. ज्यामुळे संबंधित दुधाळ जनावर हे लंगडत चालते. किंवा मग अशा जनावरास सुजलेल्या पायांमुळे कधी-कधी चालता देखील येत नाही. कारण या आजारामुळे जनावरास सर्वात जास्त त्रास हा पायांना होत असतो. कधी-कधी या फऱ्या रोगामुळे संबंधित जनावराचा दोन किंवा तीन दिवसांमध्ये मृत्यू देखील होतो.

काय आहेत या आजारावरील उपाय?

जनावरांना होणारा फऱ्या हा असा रोग आहे. जो झाल्यास संबंधित जनावरावर उपचार करणे खूप कठीण असते. ज्यामुळे दूध उत्पादकांनी अवकाळी पाऊस किंवा पावसाच्या वातावरणात आपल्या जनावरांची काळजी घेणे हाच त्यावरील सर्वोत्तम उपाय आहे. आणि काळजी घेऊनही या रोगाने जनावरास ग्रासल्यास, लक्षणे दिसताच आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन तात्काळ या रोगाचा इलाज व लसीकरण करून घ्यावे. जेणेकरून अशा जनावरास अधिक त्रास न होता. ते लवकर बरे होण्यास मदत होईल.

error: Content is protected !!